भाजपचे कल्याण पूर्वचे आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेनेचे शहरप्रमुख महेश गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर पोलिस ठाण्यातच केलेला गोळीबार राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाचे दाहक उदाहरण आहे. आ. गायकवाड धाडधाड गोळ्या चालवत असल्याचे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहेच. निर्ढावलेपणाचा कळस म्हणजे आमदार महाशयांनी या गोळीबाराचे समर्थन केले आहे. स्वसंरक्षणार्थ गोळीबार केल्याचा दावा त्यांनी केला असला तरी तशी परिस्थिती त्या ठिकाणी उद्भवली होती हे प्रथमदर्शनी तरी दिसत नाही. हे आमदार भाजपचे आणि ज्यांना गोळ्या झाडल्या ते महेश गायकवाड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेचे. कायदा व सुव्यवस्था स्थिती राखण्याची जबाबदारी सरकारची असते आणि आमदार या नात्याने त्या सरकारचा भाग असलेला एक नेता थेट पोलिस ठाण्यात गोळ्या चालवतो याला राजकारणातील माफियागिरी नाही म्हणायची तर काय म्हणायचे?
गायकवाडविरुद्ध गायकवाड या वैमनस्याला जमिनीच्या वादाची किनार आहेच; पण त्यामागे राजकीय दुश्मनीही आहे. कल्याणच्या सुभेदारीवरून घडलेला हा संघर्ष आहे. सध्या राज्यात अनेक ठिकाणी भूमाफियांचे पेव फुटले आहे. वाढते शहरीकरण, त्यातून जमिनींना आलेला सोन्याचा भाव आणि त्यातून भूमाफियांचा झालेला सुळसुळाट हा सार्वत्रिक चिंतेचा विषय! कायदा हातात घेतला तरी आपले काहीही बिघडत नाही ही बेदरकारवृत्ती वाढीला लागली असून, तिला वेळीच वेसण घालण्याची आवश्यकता आहे आणि ही जबाबदारी राज्य सरकारची व गृहखात्याची आहे. ड्रग माफियांचे साम्राज्य उद्ध्वस्त करण्याची भूमिका घेत अलीकडे गृहखात्याने अनेक ठिकाणी मोठ्या कारवाया केल्या. राजकारणाच्या गुन्हेगारीकरणाविरोधातही तशीच ठाम भूमिका घेण्याची आवश्यकता आहे. त्यात सरकारमधील लोकांना अनेक ठिकाणी ‘आपल्या’ माणसांचा बंदोबस्त करावा लागेल. सामान्य माणसांना भयमुक्त आणि कायद्याने चालणारे रामराज्य द्यायचे असेल तर असा बंदोबस्त केल्याशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राची ओळख एक पुरोगामी, सुसंस्कृत आणि सभ्य राज्य अशी आहे. ती ओळख पुसू पाहणारे असभ्य, उर्मट, उन्मादी लोक कितीही मोठे असले तरी त्यांना वेसण घालणे गरजेचे झाले आहे. प्रश्न सरकारच्या मानसिकतेचा आहे. ‘आपला’ माणूस म्हणून अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांना अभय दिले जाणार असेल तर सर्वच क्षेत्रांत माफियागिरी हातपाय पसरेल आणि एकदिवस सुसंस्कृत महाराष्ट्राला अशा अपप्रवृत्तींचा विळखा पडेल. त्यावेळी सगळे काही हाताबाहेर गेलेले असेल.
आधी राजकारणात या ना त्या मार्गाने प्राबल्य मिळवायचे, मग सत्तेतून पैसा आणि पैश्यांतून पुन्हा सत्ता हस्तगत करण्यासाठी वाट्टेल ते मार्ग अवलंबायचे हा बऱ्याच राजकारण्यांचा धंदा झाला आहे. सारेच तसे आहेत असे मुळीच नाही; पण टगेगिरी, भाईगिरीचे वाढते विश्व हे राज्याच्या दृष्टीने चिंताजनक आहे. त्यामुळेच कोणताही आपपरभाव न ठेवता गुंडांच्या नांग्या ठेचणे गरजेचे झाले आहे. गोळीबाराच्या निमित्ताने भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेत मिठाचा मोठा खडा पडला आहे. आ. गायकवाड यांनी मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर काही गंभीर आरोप केले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर घडलेल्या या घटनेने दोन पक्षांमधील विशेषत: ठाणे- कल्याण- पालघर पट्ट्यातील दुरावा वाढू शकतो. या गोळीबाराच्या घटनेला दोन दिवस उलटून गेले तरी आ. गायकवाड यांच्यावर निलंबनाची कारवाईदेखील भाजपने केलेली नाही. उलट गायकवाड यांनी त्यांच्या जीवावर बेतले म्हणून गोळीबार केल्याचे दिसते, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हणणे हे अतार्किक आहे आणि त्यातून गायकवाड यांना पाठीशी घालण्याचा हेतू डोकावतो. हे असे (म्हणजे गोळीबार वगैरे) काही करण्याचा आपला संस्कार नाही, पक्षाची त्यातून बदनामी होते अशी पुस्ती बावनकुळे एकीकडे जोडतात; पण पक्ष म्हणून त्यांच्याच नेतृत्वातील भाजप गायकवाड यांच्यावर कारवाई करत नाही ही भूमिका परस्परविरोधी आहे.
गणपत गायकवाड आणि त्यांनी ज्यांच्यावर गोळ्या झाडल्या ते महेश गायकवाड यांनी आपसातील वाद वाढवू नये, असा आदेशवजा सल्ला दोन्ही पक्षांच्या वरिष्ठ नेत्यांनी त्यांना दिलेला होता; पण त्याचा काहीएक परिणाम झाला नाही आणि वादाचे पर्यवसान गोळीबारात झाले. जिल्ह्याजिल्ह्यातील महायुतीची घरातली भांडणे सोडविण्यात शीर्षस्थ नेतृत्वाला आलेले अपयशदेखील यानिमित्ताने अधोरेखित झाले आहे.