Editorial: संपादकीय: कर्नाटकाचे विभाजन कशाला?
By ऑनलाइन लोकमत | Published: November 1, 2021 09:22 AM2021-11-01T09:22:07+5:302021-11-01T09:23:26+5:30
धर्मावरून अतिरेक करणारे धर्मांध काही जण असतात, तसे भाषेवर भाषांध होण्यात मोठेपणा नाही. कित्तूर राणी चन्नम्मा किंवा महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी इतर राज्यांतही प्रचंड आदर आहे.
कर्नाटक राज्याचा आज (१ नोव्हेंबर, १९५६) स्थापना दिन! पासष्ठ वर्षांपूर्वी प्रांतरचना करताना मुंबई प्रांताचे, तसेच हैदराबाद प्रांताचे विभाजन करण्यात आले. विदर्भ महाराष्ट्रात सामील झाला. द्विभाषिक विशाल महाराष्ट्राची स्थापनाही याच दिवशी झाली. पुढे द्विभाषिक विशाल महाराष्ट्राचे विभाजन करून १ मे, १९६० रोजी महाराष्ट्र आणि गुजरात राज्यांची निर्मिती करण्यात आली. भाषावर प्रांतरचना करताना वेगवेगळ्या प्रांतांत विभागल्या गेलेल्या विभागांचा समावेश एका राज्यात करण्यात आला. कर्नाटकाची निर्मिती करीत असताना, म्हैसूर, मद्रास, हैदराबाद आणि मुंबई प्रांतातील कानडी भाषिकांना एकत्र करण्यात आले. त्यापैकी मद्रास प्रांताचा वाटा खूपच कमी होता.
उत्तर कर्नाटकातील कारवार, बेळगाव, धारवाड, हावेरी, विजापूर, बागलकोट, जमखंडी हा भाग मुंबई प्रांतातून कर्नाटकाला देण्यात आला. बीदर, गुलबर्गा, रायचूर, कोप्पल आदी भाग हैदराबादमधून कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला. उर्वरित कानडी भाषिकांचा भाग म्हैसूर प्रांतात होता. कर्नाटकाची स्थापना १९५६ मध्ये जरी झाली असली, तरी १९७३ पर्यंत या राज्याचे नाव म्हैसूर स्टेट असेच होते, शिवाय ज्या प्रांतातून जो भाग कर्नाटकात आला आहे, त्याला त्या नावाने ओळखले जात होते. विशेषत: इंग्रजी वृत्तपत्रातून म्हैसूर कर्नाटका, बॉम्बे कर्नाटका आणि हैदराबाद कर्नाटका असा वारंवार उल्लेख होत असतो. आता अशी विभागणीवार ओळख पुसून टाकण्याचा निर्णय कर्नाटक सरकार घेत आहे. महात्मा बसवेश्वर यांचा जन्म बाराव्या शतकात बसव कल्याण येथे झाला. हा हैदराबाद कर्नाटका म्हणून ओळखला जात होता. त्याचे नाव आता महात्मा बसवेश्वर यांच्या जन्मगावावरून कल्याण-कर्नाटका असे करण्यात आले. बी.एस. येडीयुराप्पा मुख्यमंत्री असताना हा निर्णय घेण्यात आला.
मुंबई कर्नाटकाचेही नामांतर करण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळात लवकरच घेण्यात येणार आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी बेळगाव जिल्ह्यातील कित्तूर येथे नुकतीच केली आहे. बेळगाव-धारवाड महामार्गावर कित्तूर हे तालुक्याचे ठिकाण आहे. भारतावर ब्रिटिशांचे राज्य स्थापन होण्यापूर्वी कित्तूरच्या संस्थानावर राणी चन्नम्मा यांचे राज्य होते. त्यांचा उल्लेख कित्तूर राणी चन्नम्मा असाच केला जातो. ब्रिटिशांविरुद्ध त्यांनी प्रखर संघर्ष केला. उत्तर कर्नाटकात त्यांचे नाव आदराने घेतले जाते. त्यांचे स्मरण म्हणून बॉम्बे कर्नाटकास कित्तूर-कर्नाटका असे नाव देण्याचा प्रस्ताव मंत्रिमंडळासमोर मांडला जाणार आहे, अशी घोषणा बसवराज बोम्मई यांनी केली आहे. कर्नाटकातील भाषांध असलेल्या संघटनांच्या मागणीवरून हा बदल करण्यात येत आहे. वास्तविक कर्नाटकाची स्थापना करताना, बेळगावसह आठशे गावांत बहुसंख्य मराठी भाषिक जनता असताना, हा सीमावर्ती भाग कर्नाटकात समाविष्ट करण्यात आला. तो बॉम्बे प्रांतातून आला. त्याला अप्रत्यक्षपणे विरोध करण्यासाठी ही टूम काढण्यात आली आहे. वास्तविक अशा प्रकारच्या तीन कर्नाटकांचे आता अस्तित्वच नाही. जो प्रांत कर्नाटक म्हणून ओळखला जातो, त्यातील उपविभाग संपुुष्टात आणून संयुक्त कर्नाटक असायला हवा. नामांतराद्वारे कर्नाटकाचे विभाजन करून इतिहास थोडाच बदलता येणार आहे? कर्नाटकात अलीकडच्या काळात भाषिक दर्प खूप वाढला आहे. भाषेचा अभिमान जरूर असावा, ती भाषा समृद्ध करण्यासाठी उत्तम प्रयत्न करण्यात यावेत. विविध भाषा आणि संस्कृती ही आपली महानता आहे. कल्याण आणि कित्तूर या गावांना इतिहास आहे. त्याविषयीही दुमत असण्याचा प्रश्न उपस्थित होत नाही, पण जुनी विभाजनवादी नावे आहेत, म्हणून त्यांचा द्वेष करून दुसऱ्या नावाने पुन्हा कर्नाटकाचे विभाजन आहे, असा आभास निर्माण करण्याचा अट्टहास कशासाठी? हैदराबाद किंवा बॉम्बे नावामुळे तेलंगणा, तसेच महाराष्ट्र या संपूर्ण विभागावर थोडाच हक्क सांगणार आहे? ही नावे आता न वापरता (हैदराबाद व बॉम्बे) संपूर्ण कर्नाटक एकत्र आहे. तो प्रदेश कानडी भाषिकांचा आहे. अशी भूमिका घेत, जुन्या इतिहासावरून कोणत्याही प्रांताचा, तसेच भाषेचा दुस्वास करणे सोडून दिले पाहिजे.
धर्मावरून अतिरेक करणारे धर्मांध काही जण असतात, तसे भाषेवर भाषांध होण्यात मोठेपणा नाही. कित्तूर राणी चन्नम्मा किंवा महात्मा बसवेश्वर यांच्याविषयी इतर राज्यांतही प्रचंड आदर आहे. पुण्यातील बालगंधर्व नाट्यमंदिर चौकात महात्मा बसवेश्वर यांचा दिमाखदार अश्वारूढ पुतळा मराठी माणसांनीच उभारला आहे. त्याला भाषिक वाद आणण्याचे कारणच नाही, तेव्हा कर्नाटकाने संयुक्त कर्नाटक स्थापनेमागील भूमिका स्वीकारून भाषेवरून द्वेष करण्याचे सोडले पाहिजे, शिवाय अशा नामांतराने एका संपन्न राज्याचे विभाजन करून दाखविण्याची गरज नाही.