- अनंत गाडगीळ (काँग्रेसचे ज्येष्ठ नेते)
‘डोक्यावर बर्फ व जिभेवर साखर ! राजकारणात शिरल्यावर पत्रकारांशी जेव्हा संबंध येईल तेव्हा ही एक गोष्ट लक्षात ठेव!’ - पंचवीस-तीस वर्षांपूर्वी माझ्या वडिलांनी- विठ्ठलराव गाडगीळ यांनी मला दिलेला हा कानमंत्र. या गोष्टीचे आज स्मरण होण्याचे कारण काय?- काही इंग्रजी चॅनल्स बघताना अँकरच्याच डोक्यावर बर्फ ठेवावा काय? असे वाटण्यापर्यंत बिघडलेली परिस्थिती! जे काय? चालले आहे ते बघून मी अस्वस्थ आहे.
३० वर्षांपूर्वी, वडील स्वतः जेव्हा काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते झाले, त्यावेळच्या चौथ्या स्तंभात वर्तमानपत्र हा एकमेव शिलेदार होता. याउलट आज देशात ७००हून अधिक टीव्ही चॅनल्स, फेसबुक, ट्विटरचे लाखो वापरकर्ते असे प्रसार माध्यमांचे स्वरूप झाले आहे. ‘आमच्याच चॅनलवर सर्वात प्रथम’ या स्पर्धेमध्ये घिसडघाईत दाखविलेल्या विविध चॅनल्सवरील गेल्या महिन्याभरातील बातम्यांची धक्कादायक शीर्षके पाहिल्यावर तारतम्याला संपूर्ण तीलांजली दिली जात आहे याची प्रचिती येते. ‘एकही रुग्ण कोरोनापासून वंचित राहू नये यासाठी अभियान सुरू’, ‘सुशांत के पती के वकील का बडा बयान’.. या चॅनल्सनी सारे अशक्य ते शक्य करून दाखविले आहे.
ऑस्ट्रेलियन पत्रकार सॅली जॅक्सननी, पूर्वीच्या प्रिंट व आताच्या इलेक्ट्रॉनिक पत्रकारितेतील फरक २४ x ७ विरुद्ध २४, असा गमतीशीरपणे मांडला आहे. थोडक्यात, पूर्वी पत्रकार एखाद्या बातमीचा २४ तास सखोल अभ्यास करून बातमी देत. परिणामी ७ दिवस बातमीची चर्चा चाले. म्हणून २४ x ७. मात्र आताच्या इलेक्ट्रॉनिक माध्यम युगात ब्रेकिंग न्यूजच्या स्पर्धेत दर २४ मिनिटाला नवीन बातमी पाहिजे. हल्ली बातमी किती दर्जेदार व अचूक यापेक्षा ती चॅनलवर किती वेगाने दाखवली गेली यातच कौशल्याचे मूल्यमापन. ब्रिटिश पत्रकार निक डेव्हीस यांच्या सर्वेक्षणानुसार, ब्रिटिश वर्तमानपत्रे व चॅनल्सवरील सध्याच्या ८० टक्के बातम्या, या कुणाच्या तरी ट्विटर-फेसबुक किंवा रॉइटर-एपीआयवरील लिखाणाआधारे बनविलेल्या निघाल्या. निक्सन - वॉटरगेट प्रकरण चव्हाट्यावर आणणारे पत्रकार कार्ल बर्नस्टाईन यांच्या मते - बातमी भले खोटी असो, पण सनसनाटी बातमीचा पत्रकाराला सुगावा न लागणे हा सध्याच्या पत्रकारितेतील एक गुन्हा झाला आहे. प्रस्तुत लेखकाच्या शब्दात ही ‘इन्स्टंट रेडी मिक्स पत्रकारिता’ आहे
समर्पित पत्रकारिता हे महाराष्ट्रात पूर्वीच्या जमान्यातील एक वैशिष्ट होते. १९७२ साली महाराष्ट्र काँग्रेसचे बोर्डीला शिबिर झाले होते. पत्रकारांना शिबिर परिसराभोवतीसुद्धा प्रवेश नव्हता. तरीही वर्तमानपत्रात मोठाल्या बातम्या यायच्या. कालांतराने हे कोडे उलगडले. शिबिर मंडपापासून दूरवर उभारलेल्या शौचालयाच्या बाहेर दिनू रणदिवे व जगन फडणीस हे पत्रकार दिवसभर उभे राहायचे व तिथे येणाऱ्या प्रत्येक काँग्रेस नेत्याशी मिनिटभर बोलून त्यातून दुसरे दिवशी बातम्या तयार करायचे. अनेकदा प्रसारमाध्यमे एखाद्या राजकीय नेत्याला लक्ष्य करीत त्याच्या विरुद्ध टीकेचा भडिमार करतात. २०१७ साली, प्रसार माध्यमे जाणूनबुजून आपल्या विरुद्ध आगपाखड करीत असल्याचा निषेध म्हणून डोनाल्ड ट्रम्प स्वतःच व्हाइट हाऊसमधील पत्रकार जेवणाला गैरहजर राहिले. म्हणजे यजमानच गायब!
ट्रम्प यांचे पत्रकारांसोबत संबंध बिघडताच, ठरावीक पत्रकारांशी ते फटकळपणे वागू लागले. व्हाइट हाऊस वार्तालापात प्रश्न विचारण्यासाठीची क्रमवारी ट्रम्प यांनी बदलली. पहिला मान न्यू यॉर्क पोस्टच्या प्रतिनिधीस दिला, ख्रिश्चन ब्रॉडकास्टिंग लाइव्हला दुसरा, तर स्पॅनिश चॅनल युनिवीसनला तिसरा मान देण्यात आला. थोडक्यात सारे ट्रम्प समर्थक. दुसरीकडे सीएनएन चॅनलचे ज्येष्ठ पत्रकार? जिम अकोस्टिनना तर ट्रम्पनी पार शेवटच्या रांगेत पाठवले. कोरोनाचा फटका बसलेल्या ट्रम्प यांना, निवडणुकीत शेवटच्या क्रमांकावर पाठवून जनता फटका देते की पत्रकार, याचे उत्तर मिळेलच!