कलाशिक्षण सक्षम व्हाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 04:47 AM2019-10-07T04:47:07+5:302019-10-07T04:47:39+5:30
वसाहतवादाच्या काळात जगभर युरोपियन पद्धतीच्या दृश्यमूल्यांचा प्रचार झाला.
- प्राचार्य अजेय दळवीे
मूळातच दृश्यकला, चित्रकला आणि मूर्तिकलेकडे पाहण्याचा आपला असा एक खास दृष्टिकोन आहे. इस्तंबूलपासून पूर्वेकडे इराण, पर्शिया, चीन, अफगाणिस्तान, जपान आणि भारत या भागांत परंपरेनेच दृश्यविषयक दृष्टिकोन हा डेकोरेटिव्ह आकाराला आलंकारिक पद्धतीने मांडणारा आपण अनुभवू शकतो. भारतातील अजिंठा, वेरूळ येथील भित्तिचित्रे, भारतीय मंदिरातील मूर्ती या वास्तवापेक्षा एका आलंकारिक प्रक्रियेतून मांडलेल्या आपण पाहतो, तेव्हा हे स्पष्ट होते.
वसाहतवादाच्या काळात जगभर युरोपियन पद्धतीच्या दृश्यमूल्यांचा प्रचार झाला. इंग्रजांनी भारतामध्ये कलाशाळेच्या (आर्टस्कूल) माध्यमातून युरोपियन चित्र-शिल्प शैलीचे तंत्र रुजविले. यामधून भारतीय पद्धतीच्या चित्र-शिल्पांचे मोठ्या प्रमाणात पाश्चिमात्यीकरण झाले. त्याचा प्रभाव महाराष्ट्रातील चित्रशिल्पांवरही पडला. इंग्रजांनी स्थापन केलेल्या कला संचालनालयाच्या माध्यमातून स्वातंत्र्यपूर्व काळात व नंतरही अनेक पातळ्यांवर कलाशिक्षण क्षेत्रात मौलिक काम झाले आहे. तसेच राष्ट्रीय पातळीवरही कला व सांस्कृतिकदृष्ट्या ललित कला अकादमीच्या माध्यमातून ठोस कार्य सुरू असले तरी अकादमीच्या क्षमतेची आर्थिक तरतूद महाराष्ट्रातील कला संचालनालयाला केल्यास कलेतील स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम यांमध्ये कला संचालनालय मोठे कार्य करू शकते.
जबरदस्त इंग्रज कला शिक्षणाचा प्रभाव पचवून आबालाल रहिमान, रावबहादूर धुरंदर, ए. ए. अलमेडकर, द. ग. गोडसे, माधव अवचट, टी. ए. धोंड, बाबूराव सडवेलकर, दत्तोबा दळवी, माधवराव बागल, संभाजी कदम यांसारख्या महाराष्ट्रातील चित्रकारांनी कलेमधून भारतीयत्व जपण्याचा प्रयत्न केला. कलासंचालनालयाच्या माध्यमातून महाराष्ट्रात अनेक चांगल्या कलाशाळा (आर्ट स्कूल) आपल्या पारंगत व समर्पित अध्यापकांच्या बळावर या क्षेत्रात मोलाचे काम करीत आहेत. महाराष्ट्राबाहेरील विद्यार्थ्यांना आज त्या-त्या राज्यांच्या ललितकला अकादमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात शिष्यवृत्ती देण्यात येतात, त्या पद्धतीच्या शिष्यवृत्ती नवोदित कलाकारांना मिळाव्यात, यासाठी शासनाकडून कलासंचालनालयास आर्थिकदृष्ट्या पाठबळ मिळणे गरजेचे आहे.
जाहिरात कला, सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी आवश्यक अभिजात चित्र आणि शिल्पकला या क्षेत्रांत कला संचालनालय मोलाचे कार्य करीत आहे. जगभरातील दृक्श्राव्य क्रांतीमुळे शिक्षण-प्रशिक्षण, करमणूक क्षेत्रांत दृक्श्राव्य माध्यमाचा पराकोटीचा वापर सुरू आहे. त्या बनविण्याचा अॅनिमेशन, व्हीएफएक्स क्षेत्रात कलाकारांचा प्रचंड तुटवडा आहे. महाराष्ट्रातील कलेचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना खरे तर शासनातर्फे मोफत पुरविण्यात येणाºया स्मॉल स्किलच्या माध्यमातून फोटोशॉप, फ्लॅश, कोरल, आॅटोकॅड, टू-डी आणि थ्री-डी अॅनिमेशन तंत्रज्ञानाच्या प्रशिक्षणाचा फायदा होऊ शकतो. त्यासाठी कलाशिक्षणाला सक्षम करणे गरजेचे आहे.
अलीकडे दर्जेदार मराठी सिनेमे आणि मालिकांमधून स्थानिक बाज, आशय पकडलेला आहे. चित्रशिल्प कलेच्या क्षेत्रात पाश्चिमात्य तंत्राचा वापर करताना असे स्थानिक विषय येत गेल्यास व त्यास भारतीय विविधता म्हणून स्वीकारले गेल्यास कलेचा निश्चित विकास होऊ शकतो. भारतीय कला जागतिक नकाशावर आपले श्रेष्ठत्व दर्शवू शकेल. भारतीय इतिहास, पुराणकथा, कथावाङ्मय, संतसाहित्य हे सर्व कलेसाठी संदर्भ म्हणून मोठे भांडार ठरू शकते.
(लेखक कलाक्षेत्रातील अभ्यासक आहेत.)