हे अपयश कुणाचे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:05 AM2018-04-20T00:05:32+5:302018-04-20T00:05:32+5:30
सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. गत दोन वर्षांपासून संत्रा बागायतदार अशा एका कीटकनाशकाची मोठ्या प्रमाणात फवारणी करू लागले आहेत
गतवर्षी विदर्भातील कापूस उत्पादक पट्ट्यात कीटकनाशक फवारणीने मोठ्या प्रमाणात शेतकरी-शेतमजुरांचे बळी घेतले. वेळीच लक्ष दिले नाही, तर संत्रा उत्पादक पट्ट्यात त्याची पुनरावृत्ती होऊ शकते, असा इशारा कृषी संशोधक देऊ लागले आहेत. विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला व बुलडाणा या जिल्ह्यांमधील सातपुडा पर्वतरांगेच्या पायथ्याशी वसलेल्या भागांमध्ये मोठ्या प्रमाणात संत्रा बागा आहेत. गत दोन वर्षांपासून संत्रा बागायतदार अशा एका कीटकनाशकाची मोठ्या प्रमाणात फवारणी करू लागले आहेत, ज्याची संत्रा पिकासाठी शिफारसच करण्यात आलेली नाही. या कीटकनाशकाचा वापर अव्याहत सुरूच राहिल्यास, निकट भविष्यात केवळ संत्रा पिकालाच नव्हे, तर शेतकरी-शेतमजुरांच्या आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होऊ शकतो, असा इशारा कृषी संशोधकांनी दिला आहे. तो गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. कपाशीवरील फवारणीने मोठ्या प्रमाणात बळी घेतल्यावर, त्यामागील कारणांचा शोध घेण्यात आला. त्यामध्ये असे आढळून आले, की इतर पिकांसाठी शिफारस करण्यात आलेल्या कीटकनाशकांचा कपाशीवरील फवारणीसाठी झालेला वापर, मृत्यूंसाठी प्रामुख्याने कारणीभूत ठरला. कपाशी उत्पादकांनी केलेली चूक आता संत्रा उत्पादकही करू लागले असल्याने वेळीच सावध होणे गरजेचे आहे. गत काही वर्षांपासून कृषी क्षेत्रात कार्यरत कंपन्या खूप आक्रमकरीत्या मार्केटिंग करू लागल्या आहेत. बियाणे, खते, कीटकनाशके तसेच संजीवकांचे उत्पादन करणाऱ्या कंपन्यांच्या नफ्याचे प्रमाण प्रचंड आहे. त्याचा लाभ घेत, सदर कंपन्या कृषी सेवा केंद्र चालकांना आकर्षक भेटवस्तू, विदेशवारी यासारखी आमिषे दाखवतात आणि आवश्यक नसलेल्या निविष्ठांची प्रमाणाबाहेर विक्री करण्यास भाग पाडतात. यामध्ये कंपनी व विक्रेत्यांची चंगळ होते; पण पुरेसे ज्ञान नसलेल्या शेतकºयांची फसगत होते. सर्व कृषी विद्यापीठांमध्ये स्वतंत्र विस्तार विभाग आहेत. विद्यापीठांमध्ये झालेल्या संशोधनाची माहिती शेतकºयांपर्यंत पोहचविणे, त्यांचे उद्बोधन-प्रबोधन करणे, हे विस्तार विभागांचे काम असते. त्यामध्ये ते कमी पडल्यानेच शेतकºयांची फसवणूक करण्याची संधी उत्पादक व विक्रेत्यांना मिळते. मनुष्यासाठीची औषधे डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय विकता येत नाहीत. त्या स्वरूपाची व्यवस्था कीटकनाशके, खते, संजीवके यासाठी करण्याची शक्यता सरकारने पडताळून बघायला हवी. तसे होऊ शकल्यास, केवळ नफा कमावण्यासाठी गरज नसलेल्या निविष्ठा शेतकºयांच्या माथी मारण्याच्या प्रवृत्तीस आळा बसू शकतो.