कामचुकारपणावर बोट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 05:08 AM2018-06-19T05:08:14+5:302018-06-19T05:08:14+5:30

कमला मिलमधील दोन रेस्टोपबच्या आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने पालिकेच्या तीन विभागांनी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे.

Finger on the soldier | कामचुकारपणावर बोट

कामचुकारपणावर बोट

googlenewsNext

कमला मिलमधील दोन रेस्टोपबच्या आगीबाबत मुंबई उच्च न्यायालयाने नेमलेल्या समितीने पालिकेच्या तीन विभागांनी जबाबदारी योग्य पद्धतीने पार पाडली नसल्याचा निष्कर्ष काढून त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवले आहे. ‘वन अबव्ह’ आणि ‘मोजोस बिस्ट्रो’मध्ये ज्या पद्धतीने ही आग भडकली होती आणि बाहेर पडता न आल्याने होरपळून, गुदमरून ग्राहकांचा बळी गेला होता; ते पाहता सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवल्याचे स्पष्ट दिसत होते. त्यावर खरे तर पालिकेनेच कठोर कारवाई करणे अपेक्षित होते. पण न्यायालयाच्या समितीने इमारत प्रस्ताव, अग्निशमन आणि आरोग्य विभागावर बोट ठेवत त्यांनी पुरेशी खातरजमा न करता परवाने दिल्याचा निष्कर्ष काढला. आधी जे परवाने दिले होते त्यातील त्रुटी दूर झाल्याची खात्री न करता परवान्यांचे नूतनीकरण करण्यात आले. इमारत प्रस्ताव विभागाच्या परवानगीपूर्वीच उपाहारगृहाला परवानगी देण्यात आली; आवारातील बांधकाम वाढवणे - तेथे बदल करण्यास मुभा देण्यात आल्याबद्दल समितीने स्पष्टीकरण मागवले आहे. कळीचा मुद्दा म्हणजे आग लागल्यास बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा आहे की नाही, आगीची सूचना देणाऱ्या यंत्रणा बसवल्या आहेत की नाही याची खातरजमाही केली नसल्याकडे समितीने वेधलेले लक्ष. मूलभूत बाबींची पूर्तता नसतानाही परवाने का, कसे, कोणत्या परिस्थितीत, कुणाच्या सांगण्यावरून दिले गेले याचे उत्तर या विभागांना द्यावे लागेल आणि त्यासाठी मुदतवाढ मिळणार नाही, म्हणजेच वेळकाढूपणा करता येणार नाही, हे महत्त्वाचे. या आगीत १४ जणांचा बळी गेल्यानंतरही दोषी स्पष्ट होत नव्हते किंवा होऊ दिले जात नव्हते. त्यामुळे या समितीपुढील चौकशीत जबाबदारी निश्चित होईल आणि पालिकेतील विभागांना फार काळ परस्परांवर जबाबदारी ढकलण्याचा खेळ खेळता येणार नाही, हेही दिलासादायक आहे. या रेस्टोपबमधील आगीची दुर्घटना ही मुंबईतील पहिली घटना नव्हे. यापूर्वीही वेगवेगळ्या दुर्घटनांत यंत्रणांची हलगर्जी उघड झाली होती. अनेक उपाहारगृहे नियम धाब्यावर बसवून उभी असल्याचे या दुर्घटनेनंतर पालिकेने मान्य केले, काही काळ कारवाई झाली; त्यानंतर जैसे थे परिस्थिती राहिली. यात अनेकांचे हात गुंतलेले असल्याने जबाबदारी निश्चित करून संबंधितांना दोषी ठरवण्यात कायमच चालढकल केली गेली. तीच मुंबईकरांच्या जिवावर बेतते आहे. या प्रकरणातून दोषी कोण ते स्पष्ट होण्याबरोबरच पुन्हा या पद्धतीने कुणाचा जीव जाणार नाही, यासाठी नियम पाळण्यावर भर दिला; तरी आजवर जे जे आगीत होरपळले त्यांच्या जखमेवर हलकीशी फुंकर मारली जाईल.

Web Title: Finger on the soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.