आधी वंदू तूज मोरया - श्रीगणेश नामजपाचे महत्त्व !

By दा. कृ. सोमण | Published: September 1, 2017 07:00 AM2017-09-01T07:00:00+5:302017-09-01T07:00:00+5:30

श्रीगणेशाला एक हजार नावांनी ओळखले जाते. श्रीगणेशसहस्रनामावली गणेशपूजा पुस्तकात दिलेली असते. काही उपासक गणेशाच्या १०८ नावांचा जप करतात तर काही उपासक श्रीगणेशाच्या एक हजार नावांचा जप करतात.

First of all, the significance of Shree Ganesh Namajpa! | आधी वंदू तूज मोरया - श्रीगणेश नामजपाचे महत्त्व !

आधी वंदू तूज मोरया - श्रीगणेश नामजपाचे महत्त्व !

Next
ठळक मुद्देक्षिप्त,मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरोधक अशा चित्ताच्या पाच भूमिका आहेत.त्यांना प्रकाशित करणारा तो. चिंतामणी ! एकदंत म्हणजे एक दात असलेला ! श्रीगणेशाचा एक दात कसा तुटला याविषयी गणेश पुराणात कथा आहेत.

                  श्रीगणेशाला एक हजार नावांनी ओळखले जाते. श्रीगणेशसहस्रनामावली गणेशपूजा पुस्तकात दिलेली असते. काही उपासक गणेशाच्या १०८ नावांचा जप करतात तर काही उपासक श्रीगणेशाच्या एक हजार नावांचा जप करतात. विशेष म्हणजे श्रीगणेशाचे प्रत्येक नाव अर्थपूर्ण आहे. 'वक्रतुण्ड ' याचा अर्थ दोन प्रकारे सांगितला जातो. ' वक्रान् तुण्डयति' म्हणजे वाईट मार्गाने  जाणार्या माणसाचा नाश करतो. किंवा दुसरा अर्थ असा सांगितला जातो की, ' वाकडी सोंड असलेला ' ! भालचंद्र म्हणजे ज्याच्या डोक्यावर चंद्र आहे तो भालचंद्र ! गणेशाचे चिंतामणी हे नावही सार्थ आहे. क्षिप्त,मूढ, विक्षिप्त, एकाग्र आणि निरोधक अशा चित्ताच्या पाच भूमिका आहेत. त्यांना प्रकाशित करणारा तो. चिंतामणी ! एकदंत म्हणजे एक दात असलेला ! श्रीगणेशाचा एक दात कसा तुटला याविषयी गणेश पुराणात कथा आहेत. 
             नामजप हा नवविधा भक्तीतला तिसरा प्रकार आहे. याला नामस्मरण असेही म्हणतात. ईश्वर प्राप्तीचे सुलभ साधन म्हणचे नामस्मरण आहे. चित्ताचा म्हणजे मनाची प्रवाह आत्म्याकडे वळविण्याची जी अनेक साधने आहेत त्यांत नामस्मरणाचे स्थान मोठे आहे. चित्ताला म्हणजे मनाला ज्याचे ज्ञान होते, त्याचा आकार ते घेते असा सिद्धांत आहे. याचे उदाहरणही देतां येईल. चित्ताचा म्हणजे मनाचा प्रवाह विषयवासनेकडे वळला तर मन विषयाकार होते. त्यामुळे दु:ख व पाप यांची विषवल्ली फोफावते आणि देहबुद्धी  प्रबळ होते. पण तोच प्रवाह ईश्वराकडे वळवला तर ईश्वरानेच चिंतन सुरू झाले की देहबुद्धी गळून आत्मबुद्धी प्रभावी होते. त्याआत्मबुद्धीने आत्मानंदाची अमृतवल्ली वाढीस लागते.
              केवळ गणेशोत्सवातच नव्हे तर दररोज आपण जर थोडा वेळ देऊन नामजप केले तर त्याचा आपणास खूप फायदा होतो.  मग काही काल गेल्यानंतर त्या नामजपात सुख वाटू लागते. आनंदप्राप्ती होऊ लागते. हे सुख व आनंद विषयेंद्रियसंयोगातून उत्पन्न होणार्या सुखापेक्षा श्रेष्ठ प्रतीचे असते. मग आत्मसुखाचीच ओढ वाटू लागते. मग साधकाच्याहातून नामस्मरण अधिक आस्थेने होऊ लागते. 
             ईश्वराचे एक नाव अनेकवेळा एकाग्र चित्ताने म्हटले तरी नामजप फलद्रुप होतो  किंवा एकाच देवाची अनेक नावे मनापासून शांतचित्ताने उच्चारूनही नामजप करता येतो. किती वेळ नामजप करता याबरोबरच किती मनापासून आणि किती एकाग्र चित्ताने नामजप करता यांवर हे आत्मसुख अवलंबून असते. विशेषत: ज्येष्ठ नागरिकांना वेळ असतो. परंतु त्यांना मन:शांती नसते. त्यांनी हा प्रयोग करून पहावयास हरकत नाही. नामजप केला की मन:स्वास्थ्य मिळते. मनांत वाईट विचार येत नाहीत. मनांत सात्त्विक विचार कायम वास्तव्य करतात.  चिंता - काळजी वाटत नाही. मन समाधानी व शांत राहते. कामात व जीवन जगण्यात उत्साह वाटू लागतो. मनातील नैराश्य व विनाकारण वाटणारी भीती दूर होते. 
          " वैरी न चिंती ते मन चिंती ! " असे जे म्हणतात ना, तेअगदी खरे आहे. म्हणून चित्तशुद्धीसाठी नामजप करणे आवश्यक आहे. मन रिकामे न ठेवतां ते नामजपात गुंतवून ठेवणे चांगले ! सर्व संतांनी नामजपाचा पुरस्कार केला आहे. श्रीगणेश नामजपाचे मंत्र --(१) एकाक्षरी -ॐ (२) पंचाक्षरी - गजाननाय           
(३) षडक्षरी- ॐ गजाननाय (४) सप्ताक्षरी--ॐगणेशाय नम: (५) अष्टाक्षरी - ॐगजाननाय नम: (६) इतर -- श्रीगजानन जय गजानन । जय जय गजानन मोरया ।।
यापैकी कोणताही मंत्र किंवा श्रीगणेश अष्टोत्तर नामावली किंवा श्रीगणेश सहस्र नामावली घ्यावी.
                                                 दुर्वांकुराचा महिमा
              आपण श्रीगणेशाला पूजेमध्ये दुर्वा वाहतो. श्रीगणेशाला दूर्वा अतिशय प्रिय आहेत. म्हणूनच आपण पूजेमध्ये दूर्वा वापरतो . अनलासूर राक्षस सज्जन माणसांना त्रास देत होता. तेव्हा अनलासूर राक्षसापासून रक्षण करण्याकरिता सर्व देव श्रीगणेशाकडे गेले आणि त्यांनी त्याची प्रार्थना केली. तेव्हा बालरूप धारण करून गणेश त्यांच्यासमोर आला आणि म्हणाला ,
" मला तुम्ही त्या राक्षसापुढे नेऊन सोडा. " लगेच त्या सर्व  देवांनी बालगणेशाला नेऊन अनलासूर राक्षसापुढे उभे केले. बालगणेशाचे लहान रूप पाहून अनलासूर राक्षस हसू  लागला. तो बालगणेशावर हल्ला करणार तेव्हढ्यात बालगणेशाने पर्वतप्राय रूप धारण केले.  त्या पर्वतप्राय गणेशाने अनलासूर राक्षसाला हातात पकडून तोंडावाटे गिळून टाकले. गणेशाच्या उदरात दाह होऊ लागला. मग गणेशाने विचार केला की,  आपल्या उदरात असलेला हा अनलासूर राक्षस त्रिभुवनालाच जाळून टाकील.तेव्हा गणेशाच्या शांतीसाठी प्रत्येक देवाने काहीतरी दिले. इंद्राने चंद्र दिला. ब्रह्मदेवाने दोन मानसकन्या दिल्या. विष्णूने कमळ दिले. वरूणाने जल दिले. भगवान शंकराने सहस्र फळांचा नाग दिला. इतके मिळवून सुद्धा गणेशाच्या उदरातील अग्नी शांत झाला नाही. मग तेथे असलेल्या ऐंशी हजार ऋषीनी प्रत्येकी एकवीस दूर्वा गणेशाच्या मस्तकावर ठेवल्या. तेव्हा कुठे गणेश शांत झाला. म्हणूनच गणेशपूजनात नेहमी २१ दूर्वां वापरतात. 
              दूर्वा महिमा वर्णन करणारी आणखी एक कथा आहे. एकदा कौंडिन्यानी पत्नी आश्रेयाला सांगितले की " हा एक दूर्वांकूर घेऊन इंद्राकडे जा आणि तो तोलून तेवढे सोने आण ." त्याप्रमाणे आश्रया दूर्वांकूर घेऊन इंद्राकडे गेली. आश्रया इंद्राला म्हणाली , " या दूर्वांकुराएवढे सोने तोलून मला द्या. जास्तनको. किंवा कमी नको. " इंद्राने तिला दूताबरोबर कुबेराकडे पाठवले. कुबेराला दूर्वांकूराएवढे सोने मागितल्याचे आश्चर्य वाटले. त्याने दूर्वांकूर तोलण्यास प्रारंभ केला. आणि काय आश्चर्य ! त्याचा सारा सुवर्क्णसाठा एका पारड्यात घातला तरी दूर्वांकुराएवढ्या वजनाचा होईना. शेवटी कुबेराने स्वत:ला आणि मग आपल्या नगरीला एका पारड्यात घालून ब्रह्मादिकांचे स्मरण केले तरीही दूर्वांकुराचे पार्ले जडच राहिले. तेव्हा कुठे दूर्वांकुराचा महिमा इंद्राने, कुबेराने आणि आश्रयेने जाणला. नंतर आश्रया तो दूर्वांकुर घेऊन आश्रमात परतली. तिने मनोभावे श्रीगणेशाची पूजा केली आणि तो दूर्वांकूर त्याला वाहिला. या कथेवरून एकच गोष्ट ध्यानीं घ्यावयाची ती म्हणजे दूर्वांकुराचा महिमा महान आहे. आयुर्वेदिक शास्त्रानुसार दूर्वा औषधी वनस्पती आहे.
             दूर्वांचे महत्व सांगणारी आणखी एक कथा गणेशपुराणात दिलेली आहे.एकदा नारदानी गणेशाला सांगितले की " मिथिल देशांतील  जनक राजा स्वत:लाच ईश्वर मानू लागला आहे. त्याचे हे म्हणणे योग्य नाही. तर ते गर्वमूलक आहे. मी ते तुला पटवून देईन असे सांगून आलो आहे."  नारद निघून गेल्यानंतर गणेशाने एका वृद्ध माणसाचे रूप घेतले आणि तो मिथिला नगरीत आला. जनक राजाच्या दारात तो गेला आणि म्हणाला-" मी भुकेलेला गरीब वृद्ध आहे. " राजाने त्या वृद्ध रूपी गणेशाला भोजनास बसविले. भोजन वाढले परंतु गणेशाचे पोट काही भरेना ! स्वयंपाकघरातील सर्व अन्न संपले.राजवाड्यातील  सर्व धान्य संपले. नगरीतील सर्व धान्यही संपले,  जनक राजाच्याघरून अतृप्त कसे जायचे ? एव्हढ्यात राजा जे समजायचे ते समजला, त्याने वृद्ध रूपी गणेशाला नगरीतील विरोचना आणि त्रिशिरस यांच्या घरी नेले. त्याच्या घरी देण्यासाठी काहीच नव्हते. फक्त एक दूर्वांकूर शिल्लक होता. तो दूर्वांकूर त्या पतिपत्नीनी या वृद्धास खाण्यासाठी दिला. तेव्हा त्या वृद्धरूपी गणेशाचा जठराग्नी शांत झाला. श्री गणेशाने आपले खरे रूप प्रकट केले. जनक राजाने श्रीगणेशाला नमस्कार करून क्षमा मागितली. या कथेवरूनही दूर्वांचे माहात्म्य लक्षांत येते.
            गणेशपूजनाचा आजचा आठवा दिवस आहे. घरात प्रसन्न वातावरण निर्माण झाले आहे. म्हणूया -- 
           " गणपती बाप्पा मोरया ! "
(दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल आयडी dakrusoman@gmail.com)

Web Title: First of all, the significance of Shree Ganesh Namajpa!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.