बी. व्ही. जोंधळेसमता, शांती, बंधुभाव, प्रज्ञा, शील, करुणा नि विवेकबुद्धीचा शाश्वत मार्ग मानवजातीला दाखविणाऱ्या म. गौतम बुद्धांची आज २५६४ वी जयंती आहे. आज जगातील अब्जावधी लोक बौद्ध आहेत. विश्वातील प्रभावशाली अशा शंभर महामानवांत बुद्धाचे स्थान पहिले आहे. बुद्ध हा धर्मक्षेत्रातील वैज्ञानिक आहे, असे मत आचार्य रजनीशांनी व्यक्त केले आहे, तर बौद्ध तत्त्वज्ञान ही विज्ञानपूर्व युगाची पहाट आहे, असे गेल आॅम्वेट या विदूषीने म्हटले आहे. अमर्त्य सेन यांच्या मते, बौद्ध तत्त्वज्ञानाने वैज्ञानिक दृष्टिकोन रुजविला आहे, तर बुद्धाचा हजारावा अंश जर माझ्यात असता, तर मी स्वत:स धन्य समजलो असतो, असे स्वामी विवेकानंदांनी म्हटले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या मते बौद्ध धर्म हा भारतीय संस्कृतीचाच एक भाग असून, तो केवळ धर्म नसून, जीवन जगण्याचा एक महान सिद्धांत आहे. बाबासाहेबांनी १९५६ मध्ये बौद्ध धम्म स्वीकारून भारतात बौद्ध धम्माचे पुनरुज्जीवन केले हे खरे; पण जातिव्यवस्थेचा पुरस्कार करणाºया भारतीय समाजाने पूर्वग्रहित दृष्टिकोनामुळे मानवी जीवनाला उन्नत करणाºया बुद्ध विचारांचा स्वीकार केला नाही. असो.
म. गौतम बुद्धांची विशेषत: अशी की, बुद्ध हे एक इहवादी तत्त्वज्ञ होते. बुद्धांनी ईश्वराला तत्त्वज्ञानाचा विषय न करता माणसाला तत्त्वज्ञानाचा विषय केले. बुद्ध हे मूलतत्त्ववादी नव्हे, तर मुक्ततावादी होते. उज्ज्वल भविष्यासाठी माणसाने स्वतंत्रपणे विचार करायला शिकले पाहिजे, हा दृष्टिकोन स्वीकारूनच त्यांनी अनित्यवादाचा सिद्धांत मांडला. अनित्यवाद म्हणजे बदल, तर नित्यवाद म्हणजे स्थितीवाद. बुद्धांचा अनित्यवाद सर्व तºहेच्या स्थितीवादी वर्चस्वाला जसा नकार देतो, तसाच तो परिवर्तनाचाही स्वीकार करतो. विवेकशीलता, चिकित्सा, लवचिकता, मध्यममार्ग ही बौद्ध तत्त्वज्ञानाची विशेषता आहे.
भारतात वैदिक धर्मव्यवस्थेने ईश्वर, परलोक, कर्मवाद सांगून माणसाला परावलंबी केले. बुद्ध मात्र पारलौकिक जीवन, आत्मा, परमात्म्याचा काथ्याकूट करीत बसत नाहीत वा कर्मकांडातही रमत नाहीत. सुखी जीवनासाठी अन्यायाचा, भेदाभेदांचा, उच्च-नीचतेचा त्याग करून नैतिक, नीतिसंपन्न मार्गाचा अवलंब करावा, असा बुद्धांचा मानवजातीस थोर संदेश आहे. जन्माने कुणीही मोठा होत नाही, या नैसर्गिक मानवी मूल्यावर बुद्धांचा अपार विश्वास होता नि आहे. बुद्धांनी म्हणूनच जातिव्यवस्थेवर हल्ला करताना सर्व प्राणिजात, स्त्री-पुरुषांना समान लेखले.
बुद्धांनी मानवी कर्तृत्वावर जो विश्वास दाखविला, तो इतका चिरंतन ठरला आहे की, जग आज त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेत आहे. कोरोनाच्या संकटाने जग सध्या हवालदिल झालेले असताना आज मानवी कर्तृत्वच कोरोनाचा पराभव करायला सिद्ध झाले आहे. डॉक्टर, परिचारिका, पोलीस हे सारेच जण माणसातील देव जागृत करून कोरोनास तोंड देत आहेत. कोरोनाच्या विरुद्ध अखेर माणूसच विजयी होणार आहे. या पार्श्वभूमीवर बुद्धांनी मानवी कर्तृत्वावर जो विश्वास दर्शविला, त्याचे चिरंतनत्व परत-परत वेगळे सांगण्याची खरोखरच काही गरज आहे काय?
दु:ख, दु:खाचे कारण, दु:ख निवारण आणि दु:ख निवारणाचे जे मार्ग बुद्धांनी सांगितले, ते आध्यात्मिक स्वरूपाचे नाहीत, तर भौतिक स्वरूपाचे आहेत. विषमता, दारिद्र्य, शोषण, उच्च-नीचता हीच दु:खाची खरी कारणे असून, ती संपवायची तर नीतिपूर्ण अहिंसक मार्गाचाच अवलंब करावा लागेल, असे बुद्धांनी निक्षून सांगितले. तृष्णेचा त्याग करा म्हणजे इच्छांचा नाश करा, असे बुद्धांनी म्हटले नाही, तर इच्छांवर नियंत्रण ठेवा, असे बुद्धांनी सांगितले. तृष्णेवर नियंत्रण ठेवायचे, तर मानवाच्या मूलभूत गरजाही भागल्या पाहिजेत; अन्यथा माणूस अनाचाराकडे वळेल, हे बुद्ध जाणून असल्यामुळे त्यांनी राज्यव्यवस्थेसाठीही आदर्श दंडक घालून दिले. नीतिमान समाज निर्माण करण्यासाठी राज्यव्यवस्थासुद्धा नीतीवर आधारित असली पाहिजे व तिने लोकांचे मूलभूत प्रश्न सोडविले पाहिजेत, हा बुद्धविचार आजही सार्वकालिक सत्य म्हणून स्वीकारावा लागतो.
बुद्धांनी मानवी जीवन सुखी करण्यासाठी मनाच्या शुद्धतेचा, नैतिक वर्तणुकीचा विशेषत्वाने आग्रह धरला. अहिंसा, चौर्यकर्म न करणे, खोटे न बोलणे, व्यभिचार आणि मादक द्रव्यापासून दूर राहणे, हे बुद्धांचे पंचशील म्हणजे आदर्श समाजनिर्मितीचा मूलभूत पाया आहे. रागावर मात करण्यासाठी दयाळूपणा अंगीकारा, क्रूरतेवर मात करण्यासाठी करुणेचा अवलंब करा. पूर्वग्रहावर मात करण्यासाठी समतोल दृष्टी ठेवा, हा बुद्ध तत्त्वज्ञानाचा गाभा आहे. प्रश्न असा आहे की, बुद्धांनी दाखविलेल्या मार्गाचे अनुसरण आपण करतो काय? डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे बौद्धानुयायी आपण हिंदू धर्म का नाकारला, हे सांगत असतात. प्रसंगोपात ते सांगायलाही हवे; पण आपण बुद्ध धम्मापासून काय घेतले, याची मात्र फारशा गांभीर्याने चर्चा करताना दिसत नाहीत. दुसरीकडे बहुजन समाजातील विचारवंत बौद्ध धर्माचे गोडवे गातात. मात्र, आपल्या समाजाला बौद्ध धम्माचे महत्त्व मात्र पटवून देत नाहीत. हा सारा विरोधाभास संपून सामाजिक समतेचे मूल्य रुजविण्यासाठी बुद्ध विचार कृतिशीलपणे तळागाळात नेण्याची गरज आहे, अशी अपेक्षा आजच्या बुद्ध जयंतीदिनी व्यक्त केली, तर ती अनाठायी ठरू नये.
(लेखक दलित चळवळीचे अभ्यासक आहेत)