गल्लोगल्लीचे दहशतवादी

By admin | Published: June 22, 2016 11:36 PM2016-06-22T23:36:52+5:302016-06-22T23:37:38+5:30

कुत्रा हा इमानी प्राणी मानला जातो. त्याच्या इमानदारीच्या कथा अनेकजण सांगत असतात. त्याच्यावर अनेक चित्रपटही निघाले आहेत. हे झाले पाळीव कुत्र्यांच्या बाबतीत

Gallgli terrorist | गल्लोगल्लीचे दहशतवादी

गल्लोगल्लीचे दहशतवादी

Next

कुत्रा हा इमानी प्राणी मानला जातो. त्याच्या इमानदारीच्या कथा अनेकजण सांगत असतात. त्याच्यावर अनेक चित्रपटही निघाले आहेत. हे झाले पाळीव कुत्र्यांच्या बाबतीत; पण मोकाट कुत्र्यांबाबत बोलायचे झाले तर ते गल्लोगल्लीचे दहशतवादीच म्हणावे लागतील. कारण मोकाट कुत्री कधी कुणावर हल्ला करतील याचा नेम नसतो. त्यामुळे शहरांबरोबरच कोणत्याही गावात रात्रीचा प्रवास करताना जीव मुठीत धरूनच जावे लागते.
हे सर्व आता सांगायचे कारण म्हणजे गेल्या महिनाभरात सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्यांत मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला आहे. यातील पिसाळलेल्या कुत्र्यांनी सव्वाशेहून अधिक लोकांचे लचके तोडले आहेत. गेल्या महिन्यात सांगलीतील विश्रामबाग येथील उद्योग भवनच्यामागे प्रातर्विधीसाठी गेलेल्या सहा वर्षाच्या चिमुरडीवर मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून तिला ठार मारले. रविवारी तर सांगलीतीलच संजयनगरमध्ये एका घरात घुसून तीन महिन्याच्या बालकाचे लचके तोडले, त्याला पळवून नेण्याचा प्रयत्न केला. यावरून ही मोकाट कुत्री किती बेताल झाली आहेत याची कल्पना यावी.
मोकाट कुत्र्यांची ही समस्या केवळ काही शहरांतच नव्हे, तर महाराष्ट्राबरोबरच देशभरात आहे. देशभरात सुमारे तीन कोटी मोकाट कुत्री आहेत. देशात दरवर्षी २० हजारांहून अधिक लोकांचा पिसाळलेले कुत्रे चावल्याने रेबीजची लागण होऊन मृत्यू होतो. जगातल्या अन्य कोणत्याही देशापेक्षा रेबिजमुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या ३५ टक्क्यांहून अधिक आहे, असल्याचे ‘ग्लोबल अलायन्स फॉर रेबिज कंट्रोल’ने आपल्या अहवालात म्हटले आहे. मोकाट कुत्र्यांची हत्त्या करण्याला देशात बंदी आहे. त्यामुळे या कुत्र्यांना आवर घालण्यासाठी त्यांचे निर्बिजीकरण करणे, हा उपाय योजला जातो. केंद्र सरकार स्थानिक स्वराज्य संस्थांना यासाठी सुमारे ५० टक्के अनुदानही देते. स्थानिक स्वराज्य संस्थांना यासाठी होणाऱ्या खर्चातील उर्वरित भार उचलावा लागतो. मोकाट कुत्र्यांचे निर्बिजीकरण करण्याची मोहीम नियमित राबविणाऱ्यांमध्ये मुंबई, पुण्यासह राज्यातील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच महापालिका किंवा नगरपालिका आहेत. अद्याप तेथेही मोकाट कुत्र्यांचा प्रश्न पूर्णपणे संपलेला नाही. मुंबईजवळच्याच ठाणे जिल्ह्यात तर ५० हजारांवर मोकाट कुत्री असल्याचे सांगण्यात येते. ही कुत्री कचराकोंडाळ्यातील अन्न खात असतात. झुंडाने ती फिरत असतात. अस्वच्छतेत राहाणे आणि अस्वच्छ खाणे यामुळे यातीलच एखाद्याला रेबीजची लागण होते आणि तो पिसाळतो, बेभान होतो. दिसेल त्याचा चावत सुटतो. माणसांबरोबरच जनावरेही त्याच्या तावडीतून सुटत नाहीत.
कुत्रा चावल्यानंतर अँटीरेबिजची लस दिली जाते. शासकीय रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये ती उपलब्ध असते. प्रत्यक्षात या लसींचा बहुतांश वेळा तुटवडाच असतो. रुग्णांना त्यासाठी खासगी रुग्णालयांचाच आधार घ्यावा लागतो. सारेच सर्प जसे विषारी नसतात तसेच कुत्र्यांच्या बाबतीतही असते. पाळीव कुत्रा चावल्यानंतर त्याच्या लाळेत रेबिजचे विषाणू असतातच असे नाही. तरीही खबरदारीचा उपाय म्हणून अँटीरेबिजची लस घ्यावी लागते. पिसाळलेल्या कुत्र्यांच्या लाळेत मात्र रेबीजचे विषाणू हमखास असतात. त्यामुळे पिसाळलेल्या कुत्र्याला ठार मारणे हाच या रोगाचा फैलाव रोखण्याचा एकमेव उपाय आहे. अँटीरेबिजच्या लसीवर शासनाचा प्रचंड खर्च होतो.
कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाला औषधासाठी मिळणाऱ्या रकमेतील १८ टक्क्यांहून अधिक रक्कम अँटीरेबिजच्या लसीवर खर्च होते. हा खर्च टाळायचा असेल, मोकाट कुत्र्यांची ही दहशत संपवायची असेल, तर त्यांच्या निर्बिजीकरणाची मोहीम प्रत्येक शहरात राबवायला हवी. त्यासाठी कायमस्वरूपी केंद्रे स्थापन करायला हवीत. राजस्थानमधील जयपूरसारख्या शहराने हे साध्य केले आहे.
- चंद्रकांत कित्तुरे

Web Title: Gallgli terrorist

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.