जहाज बुडू लागले की त्यातील उंदीर सर्वात आधी पळायला लागतात असे म्हणतात. आम्ही जहाज बुडताना कधी पाहिले नाही. मात्र आताच्या राजकारणात काँग्रेस, राष्ट्रवादी वा इतर पक्षांचे तारवे जरा पाण्याखाली जात असताना त्यातील उंदीर कशी पळापळ करत आहेत आणि भाजप व सेनेची बिळे कशी जवळ करताहेत ते आपण सारेच पाहत आहोत. बुडायला लागलेल्या पक्षातील हे उंदीर लहान वा दुबळे नाहीत. चांगले मोठे आहेत. त्यातील काही घुशीएवढे मोठे, काही आक्रमक म्हणावे एवढे मुजोर, काही लहान तर काही अगदीच पोरवयाचे, या उंदरांत माजी मंत्री आहेत. उपमुख्यमंत्री आहेत, सभापती, आमदार व खासदार राहिलेले आहेत. त्या साऱ्यांनी त्यांचे बुडते पक्ष सोडून तरू शकणारे पक्ष गाठायची स्पर्धा चालविली आहे. ही स्पर्धाही अशी की भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले, आम्ही आमच्या पक्षाची दारे खुली केली तर एकटे पवार आणि चव्हाण सोडले तर सारेच उंदीर आमच्याकडे येतील. मात्र त्यांच्या त्या उद्गारांची जराही लाज या उंदरांना वाटली नाही.
परवा नागपूरच्या एका कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, ‘हे उंदीर कोणत्याही कामाचे नाहीत. ते पूर्वी होते तेथेही ते निकामीच होते आणि आमच्यात आले तरी ते तसेच राहणार आहेत.’ उंदरांना त्याचीही लाज वाटल्याचे दिसले नाही. काहींनी भाजपचा आसरा घेतला आहे, तर काहींना सोबत घेण्यासाठी शिवसेनेनेही दरवाजे उघडले आहेत. अकलुजचे माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते त्यांच्या खासदार चिरंजीवासह गेले, नारायण राणे गेले, उदयनराजे, शिवेंद्र राजे आणि रामराजे हे तीन राजेही गेले. सारी राष्ट्रवादी काँग्रेसच रिकामी झाली. मदन भोसले कधीचेच गेले. वाघ गेले, मेंढरे गेली, शेळ्या गेल्या. आणखी काही जाण्याच्या मार्गावर आहेत. त्यांच्या अटी-शर्ती, वाटाघाटी सुरू आहेत. भाजपचे जहाज यांच्या वजनानेच बुडते की काय या चिंतेने संघाएवढेच अण्णा हजारेंनाही ग्रासले आहे. विदर्भातील एक माजी मंत्री व खासदार तर सत्तांतर झाले की केवळ पक्षच बदलत नाहीत, नेता बदलला की आपली निष्ठा बदलवतात. जो कोणी मुख्यमंत्री होईल त्याच्या पायात मी आपल्या कातड्याचे जोडे घालीन, असे ते दरवेळी म्हणतात. असे तीनदा तरी त्यांनी त्यांच्या कातड्याचे जोडे मुख्यमंत्र्यांच्या वा सत्ताधाऱ्यांच्या पायात घातले आहेत. त्या भाग्यवान सत्ताधाºयांत पवार आहेत, देशमुख होते आणि आता गडकरी आहेत. दुसरे एक काँग्रेसचे माजी पक्षाध्यक्ष आपल्या एका मुलाला भाजपमध्ये व दुसºयाला राष्ट्रवादीत पाठवून स्वत: काँग्रेसमध्ये राहिले आहेत. मनोहर नाईक आणि त्यांचा परिवार जाता जाता राहिला आहे, तर विखे पाटील आपल्या घराण्यांची तीन पिढ्यांची प्रतिष्ठा व इतिहास विसरून भाजपमध्ये गेले आहेत. विखे होते म्हणून त्यांना तत्काळ मंत्रीपद मिळाले. बाकीचे रांगेत उभे आहेत आणि ते तेथेच राहतील, याची शक्यता मोठी आहे.
भाजपमध्ये गेलेले एक माजी आमदार खासगीत म्हणाले होते, ‘फार बेइमान लोक आहेत हो हे. येईपर्यंत यांनी मनधरणी केली. आता आम्हाला यांच्या पायपोसापाशीही जागा नाही.’ नुसतेच घरापुढच्या रस्त्यावर उभे असतो. त्यांचा अनुभव दयनीय व अपवादभूत नसावा. यांनी निष्ठा बदलल्या, स्वत:ची सोय पाहिली. पण ज्या उंदरांनी एवढ्यात नवी बिळे धरली त्यांचीही अवस्था फारशी आदरणीय राहिली नाही. त्यांच्या पाठीवर कुणी हात ठेवत नाहीत. मुख्यमंत्री विचारीत नाहीत आणि पक्षातील इतर पुढारी त्यांच्याविषयी चेष्टेखेरीज बोलत नाहीत, पक्षातील लोक सोडा, त्यांच्या जवळ वावरणारे त्यांचे आजवरचे मतदार व चाहतेही त्यांची पाठ फिरताच त्यांना हसण्यावारी नेतात. पक्ष अशा माणसांपुढे मोठा होतो, मात्र मजबूत होत नाही. ही माणसे पुन: केव्हा नवे घरठाव करतील याचा नेम नाही. त्यामुळे ते ज्यांच्यात गेले तेही संशयाने पाहणारे आणि ते पुन: परततील म्हणून त्यांचे जुने सहकारीही त्यांना काही एक न म्हणणारे. काही का असेना उंदरांच्या या पळापळीने महाराष्ट्राची मात्र फार मोठी करमणूक केली आहे. त्यासाठी त्यांना धन्यवाद! त्यांची नवी बिळे त्यांना सुखाची लाभावी, ही सदिच्छा.
जहाज बुडू लागलेकी उंदीर आधी पळू लागतात. सध्या काँग्रेस, राष्ट्रवादीची तारवे पाण्याखाली जात असताना त्यातील पळापळीने उंदरांची अवस्था आदरणीय राहिलेली नाही. त्यातून सर्वांची फक्त करमणूक होते आहे.