भारनियमनाचा ‘खेळ’, उद्योजक आणि शेतकरी भरडून निघणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2017 02:56 AM2017-10-07T02:56:35+5:302017-10-07T02:56:46+5:30
भीषण वीजटंचाईमुळे राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू झाल्याने सामान्य नागरिक, उद्योजक आणि शेतकरी असे सारेचजण भरडून निघणार आहेत.
भीषण वीजटंचाईमुळे राज्यातील सर्वच भागात मोठ्या प्रमाणावर भारनियमन सुरू झाल्याने सामान्य नागरिक, उद्योजक आणि शेतकरी असे सारेचजण भरडून निघणार आहेत. या भारनियमनामुळे शहरी भागात तीन तास आणि ग्रामीण भागात नऊ तासापर्यंत सध्या भारनियमन करण्यात येत आहे. ग्रामीण भागात तर वर्षभर भारनियमन सुरू असते. त्यामुळे या भारनियमनाबाबत नवलाई राहिलेली नाही. ज्या दिवशी वीज असते त्या दिवशी खेड्यात दिवाळी असते. एकीकडे शेतक-यांना सरकारने कर्जमाफी जाहीर केली. यावर्षी विदर्भात समाधानकारक पाऊस झाला नाही. दुसरीकडे कृषिपंपांना वीजपुरवठा करण्याचे आश्वासन सरकारने दिले होते. पण आता कृषिपंपांचाच वीजपुरवठा भारनियमनामुळे खंडित होणार असल्यामुळे खरीप व रब्बी पिके संकटात सापडणार आहेत. महावितरण आणि महानिर्मिती या दोन वीज कंपन्यांमधील निष्काळजीपणा या भीषण संकटाला सर्वस्वी कारणीभूत आहे. राज्यातील ३० औष्णिक केंद्रापैकी १३ युनिट सध्या बंद आहेत. त्यामागे कोळशाचा तुटवडा हे कारण असले तरी या कंपन्यांमधील समन्वयाचा अभाव हेही एक प्रमुख कारण आहे. उरण येथून रिलायन्सच्या माध्यमातून महानिर्मितीला गॅसपुरवठा होतो. परंतु, या गॅसचे दर अवाढव्य वाढवल्याने स्वाभाविकच महानिर्मितीने या प्रकल्पातील वीजेच्या उत्पादनात हात आखडता घेतला आहे. महाजेनकोने कोळशाची कमतरता हे एक कारण समोर केले आहे. ते खरेही आहे. परंतु,पावसाळ््यात कोळसा ओला होत असेल तर याला दोषी कोण? महाजेनकोने तशी पूर्व खबरदारी का घेतली नाही, हा गंभीर प्रश्नसुद्धा यानिमित्ताने पुढे आला आहे. राज्याचे ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी राज्यात वीज सरप्लस असल्याचा दावा काही दिवसापूर्वीच केला होता. पण या वीज कंपन्यांनी आपल्या ऊर्जामंत्र्यांनाच तोंडघशी पाडले आहे. विदर्भ सध्या विविध कारणांनी संकटग्रस्त आहे. कीटकनाशक फवारणीने शेतकºयांचे बळी जात आहेत. दुसरीकडे विजेअभावी शेतपिकांना पाणी देणे कठीण झाले आहे. वीजेची ही समस्या कायम राहिल्यास शेतकºयांचा रब्बी हंगामही संकटात येण्याची शक्यता आहे. स्वाईन फ्लू, डेंग्यूने थैमान घातले आहे आणि आता हे वीजेचे संकट ओढवले आहे. मुख्यमंत्री आणि ऊर्जामंत्र्यांच्या नागपुरात आठ वर्षानंतर पहिल्यांदाच ‘बत्ती गूल’ होणार आहे. हे या दोघांसाठीही फार भूषणावह नाही. दिवाळीपूर्वी या भारनियमनाच्या संकटातून राज्याला मुक्त करून सामान्य माणूस, उद्योजक आणि शेतक-यांची दिवाळी ख-या अर्थाने आनंददायी करावी, हीच जनतेची अपेक्षा आहे.