खेळखंडोबा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 22, 2019 06:12 PM2019-01-22T18:12:26+5:302019-01-22T18:13:16+5:30
क्रीडासंस्कृतीचा अभाव
मिलिंद कुलकर्णी
क्रीडा क्षेत्राच्या महत्त्वाविषयी अधून मधून सरकार, विचारवंत, समाज बोलत असतो, लिहित असतो. अधून मधून म्हणजे आॅलिम्पिक, राष्टÑकुल, आशियाई स्पर्धा झाल्या की, आम्हाला भारताची १२५ कोटींहून अधिक लोकसंख्या, त्या तुलनेत मिळालेली पदके, आपल्याकडे क्रीडासंस्कृतीचा असलेला अभाव, सरकार आणि पालक यांचा असलेला उदासीन दृष्टीकोन याविषयी काथ्याकुट होतो. चार दिवस चर्चा चालते आणि नवीन चर्चित विषय समोर आला की, ही चर्चा मागे पडते. विस्मरणात जाते.
आता ‘खेलो इंडिया’ या राष्टÑीय पातळीवरील स्पर्धा पुण्यात झाल्या. त्यात महाराष्टÑाने अव्वल क्रमांक मिळविला. सरकारने स्वत:ची पाठ थोपटून घेतली. मग असा निकाल आशियाई, राष्टÑकुल आणि आॅलिम्पिक स्पर्धेत का येत नाही, असा प्रश्न उपस्थित होतोच. विशेष म्हणजे, केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या स्पर्धेच्या समारोप कार्यक्रमात घोषणा केली की, प्रत्येक शाळेत आता एक तास खेळासाठी राखून ठेवण्यात येईल. क्रीडा क्षेत्राविषयी सरकार किती जागरुक आहे, खेळाडूंच्या भवितव्याविषयी, जडणघडणीविषयी सरकार किती सतर्क, सजग आणि संवेदनशील आहे, असेच मंत्रिमहोदयांच्या विधानावरुन वाटतेय कि नाही? पण वास्तव वेगळेच आहे.
आपल्या गाव किंवा शहरातील एखाद्या खाजगी, पालिका किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत जाऊन बघा. या शाळांना मैदान आहे का, हा पहिला प्रश्न तुम्ही विचाराल. पालिका आणि जिल्हा परिषदेच्या शाळेभोवती अतिक्रमण, कुठे गोठे, तर कुठे उकीरडा, कुठे सांडपाण्याचे डबके दिसून येईल. मैदानाचा उपयोग खेळण्यापेक्षा पार्किंग म्हणून केला जातो. प्रवासी वाहनांचे पार्किंग त्याठिकाणी असते. कधी जुगाऱ्यांचा अड्डा बिनबोभाट सुरु असतो. लग्नांसाठी मैदान हमखास वापरले जाते. विवाहसोहळ्यानंतर त्याची साफसफाई करायची असते, हे कुणाच्या गावी नसते. ही झाली मैदानाची अवस्था..
शालेय वेळापत्रकात क्रीडा विषयाची तासिका असते आणि क्रीडा शिक्षक नियुक्तीला असेल तर मुलांना मैदानावर ‘सोडले’ जाते. अर्धा वा पाऊण तास ही मुले कैदेतून सुटल्याप्रमाणे मनसोक्तपणे हुंदडतात. मस्ती करतात. याला ‘क्रीडा’, ‘खेळ’ असे म्हणतात, बरं का! कोणत्याही क्रीडा साहित्याशिवाय होणारी ही क्रीडा विषयाची तासिका बहुसंख्य शाळांमध्ये दिसते. खाजगी, इंग्रजी, मराठी, पालिका, जिल्हा परिषद अशा सर्वच शाळांमध्ये ही स्थिती कायम असते. फरक इतकाच की खाजगी, इंग्रजी शाळांमध्ये ‘कलर हाऊसेस’ असतात, मुले त्या रंगाची वेशभूषा करुन येतात. म्हणून छान वाटते, एवढेच. गंमत म्हणजे, क्रीडा शिक्षक हे पँट, इन केलेला शर्ट, टाय आणि फॉर्मल शूज घालून मुलांची ही तासिका घेत असतात. पूर्वीच्या काळी ‘एनडीएस’ झालेले शिक्षक विद्यार्थ्यांना शिकवित, तेही पांढºया टी शर्ट आणि पँटमध्ये असत. स्पोर्टस् शूज तेव्हा नसले तरी कॅनव्हासचे शूज घालत असत. टाय आणि फॉर्मल शूज घातलेले क्रीडा शिक्षक पाहिल्यावर हसावे की, रडावे असा प्रश्न पडतो.
क्रीडा प्रकार आणि साहित्य हा आणखी गंभीर विषय आहे. शाळांच्या माहिती पुस्तकांमध्ये केवळ आणि केवळ या क्रीडा प्रकारांची माहिती, एखाद्या सामन्याचे छायाचित्र, पदके मिळविलेली समूह छायाचित्रे, त्यातही मुले दोन आणि खुर्च्यांवर बसलेली संस्थाचालक, मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापक, पर्यवेक्षक, क्रीडा शिक्षक यांची संख्या अधिक अशी स्थिती असते. क्रिकेट आणि फुटबॉल या दोन क्रीडा प्रकारांचे साहित्य सढळपणे विद्यार्थ्यांना दिले जाते. त्याचे प्रशिक्षण, टीम तयार करणे असे काही घडत नाही. क्रीडाधिकारी कार्यालयाच्या परिपत्रकानुसार होणाºया स्पर्धांसाठी विद्यार्थ्यांचा कोटा पूर्ण करण्याकडे क्रीडा शिक्षक आणि मुख्याध्यापकांनाचा कल असतो.बहुतांश शाळांमध्ये ही स्थिती असताना क्रीडा विषयात आपली मुले कशी प्रगती करतील? एक तास रोज दिला तरी काय फरक पडणार आहे, याचा गांभीर्याने विचार करायला हवा.
पालकांना उदाहरण म्हणून सचिन तेंडुलकर, विराट कोहली, चित्रपटातून मिल्खा सिंग, मेरी कोम यांच्याविषयी आकर्षण वाटते. पण तरीही आपले पाल्य अभियंता, डॉक्टरच व्हावा, यावर एकमत असते. शेवटी काय, चर्चा करत राहुया. फलनिष्पत्तीचा का विचार करायचा? नाही का?