गणराज रंगी...चार दशकांचा पुण्यातील सुरेल प्रवास!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2017 02:39 PM2017-08-31T14:39:08+5:302017-08-31T14:49:40+5:30
पुण्यात आमच्या गल्लीतल्या गणपतीपाशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. आमचा निंबाळकर तालमीचा जुना गणपती उत्सव गजाननराव वाटवे, मालती पांडे, बबनराव नावडीकरांच्या भावगीतांनी रंगत वाढवायचा. तर एके वर्षी चक्क बिस्मिल्लाखॉंसाहेबांनी रस्त्यावर सनई वादन केले होते.
- सुधीर गाडगीळ
गणपती जवळ आले की, आमच्या जुन्या वाड्यातल्या अंधारलेल्या देवघरात 'दिवा' लावला जायचा. गणरायाची प्रसन्न मूर्ती सर्व वेळ स्वच्छ दिसायला हवी, हा त्यामागे उद्देश होता. पहाटे पहाटे गुरुजी यायचे. साग्रसंगीत पूजा-आरती मग मोदकाचा नैवेद्य झाला की मगच वाड्यातला-गल्लीतला गणपती पाहायला जायची मुभा होती. वाड्यातल्या गणपतीसाठी दोनदा एकेका बिऱ्हाडांचा नैवेद्य असायचा. त्या लहान वयात त्याची उत्सुकता असायची.
पुण्यात आमच्या गल्लीतल्या गणपतीपाशी सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल असे. आमचा निंबाळकर तालमीचा जुना गणपती उत्सव गजाननराव वाटवे, मालती पांडे, बबनराव नावडीकरांच्या भावगीतांनी रंगत वाढवायचा. तर एके वर्षी चक्क बिस्मिल्लाखॉंसाहेबांनी रस्त्यावर सनई वादन केले होते. अलिकडे सांस्कृतिक कार्यक्रमांपेक्षा लायटिंग-सजावट-देखावे यावरच भर दिला जातो. मी स्वतः सांस्कृतिक कार्यक्रमांचं सादरीकरण-आयोजन-निवेदन करायला लागल्यावर मला तर गणपतीच्या दहा दिवसांपैकी सात-आठ दिवस गावोगावी शोसाठी जावं लागे. माडगूळकर-बाबूजी यांच्या गाण्यांनी नटलेलं 'चैत्रबन' घेऊन आम्ही महाराष्ट्राच्या गावोगावी गणपतीमुळेच जाऊन आलेलो आहोत. गिरगाव, डोंबिवली, दादर, पार्ले, माटुंगा, कल्याण, ठाणे या मुंबई परिसरात ठरलेले रसिक श्रोते भेटत. गायक गाण्याची ओळ विसरले तर समोर बसलेले रसिक गाण्याच्या ओळी खालून ओरडून सांगत. इतकं त्यांचं गाण्याशी-आम्हा कलावंतांशी जिव्हाळ्याचं नातं होतं. हृदयनाथ मंगेशकर, अरुण दाते यांचे कार्यक्रमही आम्ही त्याकाळी गणेशोत्सवातच केले आहेत.
विशेष म्हणजे तेव्हा आम्ही सर्वच कलावंत 'नोकरी' करत होतो. त्यामुळे रात्री कार्यक्रम करुन, उत्तररात्री जेवून, प्रवास करुन पहाटे पुण्यात पोहोचायचो आणि सकाळी फ्रेश होऊन, नोकरीवर जाऊन, संध्याकाळी त्या दिवशीच्या शोची तारिख ज्या गावी असेल तिकडे जाण्यासाठी मॅटेडोर पकडायचो. सलग आठ दिवस नोकरी-कार्यक्रम-प्रवास करुन सुद्धा कणमात्र कंटाळा येत नसे. त्या गणपती शाेजची वेगळीच झिंग चढत असे. एक संध्याकाळ मात्र पुण्यातच शो करावा लागे कारण त्या दिवशी घरी होणारा मंत्रजागर टाळता येत नसे. समोरासमोर दहा-दहा गुरुजी बसून आरोह-अवरोहात मंत्रोच्चाराची स्पर्धा लागे. 'म....हे..' कोरसमध्ये वरच्या पट्टीत ऐकायला मजा येत असे.
दगडुशेठच्या शंभरीला पंचवीस वर्षांपुर्वी मी सारसबाग मैदानावर गजानन वाटवे, मालती पांडे, बाबूजी, ज्योत्स्ना भोळे, बबनराव नावडीकर, अरुण दाते, श्रीधर फटके, रवी साठे असे भावगीतातले तीन पिढ्यांतले गायक पेश केले होते. छोट्या गावांमध्ये सिनेमे दाखवण्यावर भर असे. उलट्या बाजूने सिनेमा कसा दिसतो, हे पाहण्याची पोरांना उत्सुकता असे. 'गणपती' आले की मला हा चाळीस वर्षांचा कार्यक्रमांचा सुरेल प्रवासच आठवतो.