काळाचा महिमा, तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले एकनाथराव खडसे, सव्वा वर्षांपासून मंत्रिमंडळाबाहेर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2017 03:46 AM2017-08-29T03:46:52+5:302017-08-29T03:47:32+5:30
तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले एकनाथराव खडसे, सव्वा वर्षांपासून मंत्रिमंडळाबाहेर आहेत. विधिमंडळ, पक्षाच्या बैठका, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यातून त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी वेळोवेळी नाराजी आणि अन्यायाचा सूर लावला.
तीन वर्षापूर्वी मुख्यमंत्रिपदाचे दावेदार असलेले एकनाथराव खडसे, सव्वा वर्षांपासून मंत्रिमंडळाबाहेर आहेत. विधिमंडळ, पक्षाच्या बैठका, प्रसारमाध्यमे, समाजमाध्यमे यातून त्यांनी व त्यांच्या समर्थकांनी वेळोवेळी नाराजी आणि अन्यायाचा सूर लावला. परंतु पक्षश्रेष्ठी ‘योग्य वेळे’चे पालुपद सोडायला तयार नाहीत. त्यांचे पुनर्वसन करा आणि त्यांना मंत्रिमंडळात स्थान द्या, असा ठराव त्यांच्या समर्थकांनी जळगावच्या पक्ष बैठकीत केला. या बैठकीत जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्याविषयी खडसे समर्थकांनी नाराजी व्यक्त केली. ही समर्थकांची भावना अस्थानी असल्याचे खडसे जाणून आहेत आणि त्यांनी ते बैठकीत बोलूनही दाखविले. माझ्या मंत्रिमंडळ प्रवेशाचा निर्णय जिल्हा वा राज्य पातळीवर होणारा नसून तो केंद्रीय पातळीवर होणार आहे, हे कार्यकर्त्यांना समजावून सांगत असताना खडसे भावनेच्या भरात पक्षश्रेष्ठींविषयी कठोरपणे बोलले. पक्षात नवीन लोक येत आहेत, जबाबदारी घेत आहेत. आम्ही आता मार्गदर्शकाच्या भूमिकेत आहोत. अडवाणींची काय स्थिती आहे, असे खडसे म्हणाले. हे भाजपामधील वास्तव असले तरी ती पक्षश्रेष्ठींवर थेट टीका आहे. वाजपेयी-अडवाणींच्या काळातील भाजपा आता राहिलेला नाही. मोदी-शहांचा भाजपा वेगळा आहे, याचा अनुभव स्वत: खडसे घेत असतानाही अशी वक्तव्ये नैराश्यातून येत आहेत, असेच म्हणावे लागेल. पक्ष उभारणीत त्यांचे योगदान आहेच, ते नाकारता येणार नाही. परंतु इतरांनीही पक्षाचा व्यापक विस्तार केला, हे नजरेआड करून कसे चालेल. अगदी खडसे यांच्या जळगाव जिल्ह्याचा विचार केला तरी या सव्वा वर्षात खडसे नाराज असतानाही गिरीश महाजन, चंद्रकांत पाटील या मंत्रिद्वयांनी विधान परिषद, नगरपालिका व जिल्हा परिषद निवडणुकीत भाजपाला घवघवीत यश मिळवून दिलेच ना! काँग्रेस, राष्टÑवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या मातब्बरांना भाजपामध्ये आणून ‘शतप्रतिशत’चा संकल्प ही जोडगोळी पूर्ण करीत आहे. पूर्वी खडसे जी कामगिरी जळगाव जिल्ह्यात करून दाखवायचे ती किंवा त्यापेक्षा अधिक आता होत आहे. बहुदा खडसे यांच्या उद्वेगाचे हे देखील एक कारण असावे. पण हा काळाचा महिमा आहे. काळ कुणासाठी थांबत नसतो. उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची संस्कृती असल्याने खडसे नसले तर महाजन-पाटील आहेत, हे कार्यकर्ते जाणतात. पक्षात ‘इनकमिंग’ इतके वाढले आहे की, पक्षश्रेष्ठी जुन्यांची सशर्त जबाबदारी स्वीकारण्याच्या मानसिकतेत नाही. त्यामुळे खडसे आणि त्यांच्या समर्थकांनी ‘श्रध्दा आणि सबुरी’ हे तत्त्व अंगिकारणे आवश्यक आहेत. परंतु सत्तासुंदरीचा मोह भल्याभल्यांना सोडवत नाही, तिथे खडसे तरी कसे अपवाद ठरतील? त्यामुळे गोंधळ, ठरावासारखे प्रकार घडत असावेत.