‘नमामि गोदा’ची गोदा-वारी !
By ऑनलाइन लोकमत | Published: August 24, 2017 07:57 AM2017-08-24T07:57:20+5:302017-08-24T07:57:49+5:30
शासनाची जबाबदारी म्हणून कोणत्याही बाबतीत केवळ यंत्रणांकडून अपेक्षा बाळगून बसले गेले तर कालापव्ययाखेरीज फारसे काही हाती लागत नाही, कारण यंत्रणांच्या आपल्या काही मर्यादा असतात.
- किरण अग्रवाल
शासनाची जबाबदारी म्हणून कोणत्याही बाबतीत केवळ यंत्रणांकडून अपेक्षा बाळगून बसले गेले तर कालापव्ययाखेरीज फारसे काही हाती लागत नाही, कारण यंत्रणांच्या आपल्या काही मर्यादा असतात. त्यात नदीच्या प्रदूषणमुक्तीसारखा मोठा विषय असेल तर विचारायलाच नको. नमामि गोदा फाउण्डेशनसारख्या संस्थांनी नागरी सहभाग मिळवून गोदावरीच्या निर्मळतेसाठी चालविलेले प्रयत्न म्हणूनच कौतुकास्पद तसेच अनुकरणीय ठरणारे आहेत.
देशात गंगेनंतर दुसºया क्रमांकाची लांब नदी म्हणून ‘गोदावरी’कडे बघितले जाते. नाशिक जिल्ह्याच्या त्र्यंबकेश्वरातील ब्रह्मगिरीमधील उगमापासून ते आंध्रातील राजमुंद्री येथे बंगालच्या उपसागराला जाऊन मिळण्यापर्यंत, सुमारे १४७५ किलोमीटरचा दीर्घ पल्ला गाठणाºया गोदावरीचे खोरे सहा राज्यांत पसरले आहे. महाराष्ट्रात नांदेडपर्यंत तिचा प्रवास असून, ‘तुटी’चे खोरे म्हणून गोदा खोºयाकडे पाहिले जाते. राज्यातील दुष्काळाचा फटका बसणारा अधिकतर भूभाग याच खोºयातील आहे. त्यामुळे शासनाचा नदीजोड प्रकल्प साकारून ही ‘तुटी’ची स्थिती बदलेल तेव्हा बदलेल, तोपर्यंत ठिकठिकाणी लुप्त झालेली गोदा प्रवाहित करतानाच तिला निर्मळ व प्रदूषणमुक्त राखण्याच्या दृष्टीने काय करता येऊ शकेल, यादृष्टीने विचार केला जाऊ लागला आहे ही निश्चितच आश्वासक ठरणारी बाब आहे. जागोजागचे पर्यावरणप्रेमी यासाठी पुढाकार घेताना दिसत असून, अतिक्रमण तसेच प्रदूषणामुळे अस्तित्वहीन ठरू पाहणाºया गोदेच्या पुनरावतरणासाठी शासन व स्थानिक स्वराज्य संस्थांना न्यायालयात खेचण्यापासून ते लोकांमध्ये नदी बचावबाबत जाणीव जागृती करण्याचे कार्य करीत आहेत. त्यामुळे अशा गैरशासकीय प्रयत्नांना लोकांचे पाठबळ लाभणे गरजेचे आहे.
उत्तरेत गंगेच्या प्रदूषणमुक्तीसाठी खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘नमामि गंगा’ उपक्रम हाती घेतला आहे, तर मध्य प्रदेशात तेथील मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी ‘नमामि नर्मदा’ची घोषणा करीत नर्मदाकाठची परिक्रमा करून यासंदर्भातले गांभीर्य दर्शवून दिले आहे. त्याच धर्तीवर नाशिकच्या गोदावरीचा कोंडला गेलेला श्वास मोकळा करण्यासाठी व तिचे पावित्र्य जपतानाच तिला प्रदूषणमुक्त राखण्याकरिता ‘नमामि गोदा’ मोहीम हाती घेण्याच्या मागणीचा ‘लोकमत’ने सातत्याने पाठपुरावा केला आहे. नाशिक दत्तक घेतल्याची घोषणा केलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून यासंदर्भात सकारात्मक प्रतिसाद अपेक्षिित आहे; परंतु तत्पूर्वी पर्यावरणप्रेमींनी एकत्र येत ‘नमामि गोदा फाउण्डेशन’ची स्थापना करीत यासंदर्भात पुढे पाऊल टाकले आहे. शासनाच्या प्रयत्नांखेरीज गोदेच्या प्रदूषणमुक्ती व संवर्धनासाठी पुढाकार घेणाºया या फाउण्डेशनसह सर्व संबंधितांनी यादृष्टीने चालविलेली धडपड खरेच कौतुकास्पद आहे.
महत्त्वाचे म्हणजे, २०१२ मध्ये गोदावरी नदीतील पाणवेलीत गुरफटून तीन म्हशींचा मृत्यू झाला होता. त्यातून नदीच्या प्रदूषणाचा मुद्दा प्रकर्षाने पुढे येऊन उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ‘गोदा बबचाव’ मोहिमेला खºया अर्थाने गती आलेली दिसत आहे. गोदावरी गटारीकरण विरोधी मंच, गोदाप्रेमी नागरी सेवा समिती, निर्मल गोदा यांसारख्या संस्था तसेच राजेश पंडित, देवांग जानी व निशिकांत पगारे आदींनी त्यासाठी चालविलेले प्रयत्न वाखाणण्याजोगे आहेत.‘निरी’नेही यासंदर्भात गोदावरीच्या उगमापासून म्हणजे ब्रह्मगिरीपासून ते नांदेडपर्यंत गोदावरी टास्क फोर्स नेमण्याची सूचना केली आहे. पर्यावरण मंत्रालयाकडे ती फाईल धूळ खात पडून आहे. नाशिक व नांदेड या दोन्ही शहरांच्या मध्यवस्तीतून गोदावरी वाहात असल्याने अतिक्रमणापासून प्रदूषणापर्यंतचे अनेक प्रश्न यात आहेत; पण त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले जात नाही. काही पर्यावरणप्रेमींनी उच्च न्यायालयात केलेल्या जनहित याचिकांमुळे अलीकडे सरकारी यंत्रणा काहीशी हलली आहे हे खरे, पण ते पुरेसे नाही. शिवाय, अनेकविध मर्यादाही त्यात आहेत. त्यामुळे जे टाळणे आपल्या हाती आहे, त्यासाठी नागरिकांचा सहभाग मिळवून प्रयत्न केले जाणे गरजेचे आहे. ‘नमामि गोदा’ फाउण्डेशनने ‘वारी गगोदावरी’च्या माध्यमातून तेच आरंभिले आहे.
राजेश पंडित यांच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या या फाउण्डेशनमध्ये मराठी अभिनेते चिन्मय उद्गीरकर, धनश्री क्षीरसागर यासारख्या कलावंतांचाही सहभाग असून, विशेष म्हणजे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जलतज्ज्ञ डॉ. राजेंद्रसिंह यांचे मार्गदर्शन त्यांना लाभत आहे. नुकतेच या फाउण्डेशनच्या घोषणेच्या कार्यक्रमात राजेंद्रसिंह यांनी उपस्थित राहून विविध शाळकरी विद्यार्थ्यांना ‘गोदा सेवक’ बनण्याची व नदी स्वच्छ राखण्याची सुरुवात स्वत:पासून करण्याची शपथ देवविली. तसेच पहिल्या टप्प्यात ब्रह्मगिरीपासून नाशिकच्या रामकुंडापर्यंत ‘वारी गोदावरी’ नामक जनजागरणात्मक फेरी काढण्यात आली. यात विविध महाविद्यालयांचा व एकूणच तरुणांचा सहभाग लक्षणीय राहिला. जनस्थान ग्रुप, प्रयास फाउण्डेशन, सवंगडी, राजसारथी, संवर्धन बहुद्देशीय संस्था यासह नाशकातील ढोल पथकेही या ‘वारी’त सहभागी झाली. चांगल्या प्रयत्नांना जनतेचे व तरुणाईचे पाठबळ लाभत असल्याचे यातून दिसून आले. आता गणेशोत्सव आला आहे. गोदावरीचे प्रदूषण टाळण्याच्या भावनेतून गेल्यावेळी नाशकात सुमारे अडीच लाख गणेशमूर्तींचे नदीपात्रात विसर्जन न करता या मूर्ती महापालिका व स्वयंसेवी संसस्थांकडे सोपविल्या गेल्या होत्या. सुमारे १७० मेट्रिक टन निर्माल्य नदीत प्रवाहित न करता तेही या यंत्रणांकडे दिले गेले होते. यंदा हे प्रमाण यापेक्षा अधिक राहण्याची अपेक्षा आहे. गोदावरी ही आपला परिसर सुजलाम्, सुफलाम् करणारी जीवनदायिनी माता आहे, ती निर्मल-अविरत राहिली पाहिजे अशा भावनेतूनच हे होणे शक्य आहे. त्यासाठी सर्वांचेच प्रयत्न वाढीस लागले आहेत, हेच मोठे दिलासादायी आहे. मनाच्या व नदीच्याही निर्मलतेचा संदेश आणि आनंद देणारी ही ‘वारी’ सुफळ, संपूर्ण व्हावी इतकेच यानिमित्ताने.
(लेखक लोकमतच्या नाशिक आवृत्तीचे निवासी संपादक आहेत.)