देवांना साथीचे आजार...!

By अतुल कुलकर्णी | Published: June 20, 2018 12:25 AM2018-06-20T00:25:50+5:302018-06-21T00:51:56+5:30

सगळे देव एकत्र जमले आणि त्यांनी देवांचे देव इंद्रदेवाच्या दरबारावर शिष्टमंडळ नेण्याचे ठरवले.

Goddess pandemic ...! | देवांना साथीचे आजार...!

देवांना साथीचे आजार...!

Next

सगळे देव एकत्र जमले आणि त्यांनी देवांचे देव इंद्रदेवाच्या दरबारावर शिष्टमंडळ नेण्याचे ठरवले. काहीकरून देवलोकात आलेल्या साथीच्या आजाराला रोखण्यासाठी तातडीची बैठक घ्या, असे निवेदनही तयार करण्यात आले. दरबार भरला, सगळे एकत्र आलेले पाहून इंद्रदेवही चिंतेत पडले. आपल्या आसनाला तर धोका नाही ना, याची खात्री करण्याचे काम त्यांनी देवलोकांचे आयबी प्रमुख नारदांवर सोपावून ते सभागृहात दाखल झाले. दरबारावर एक नजर टाकली आणि इंद्रदेवांना आर्श्चय वाटले, अरेच्च्या हे काय पाहतोय आपण...? कुणी डोक्याला मफलर गुंडाळलेला तर कुणी स्वेटर घालून आलाय. कुणी कपाळाला बाम लावलाय, तर कुणी व्हिक्स वेपोरब नाकाला लावून बसलेला. मध्येच कुणी शिंकतोय, कुणी खोकलतोय... इंद्रदेव हे दृश्य पाहून काळजीत पडले. असे कसे सगळे देव एकदम आजारी पडले...? त्यांनी काही देवांकडे जाऊन त्यांची आस्थेने चौकशी केली. तेवढ्यात नारदही सभागृहात हजर झाले...
नारायण... नारायण... म्हणत त्यांनी इंद्रदेवांना इशारा केला. त्याबरोबर इंद्रदेव दरबाराला लागूनच असणाऱ्या अ‍ॅन्टी चेंबरमध्ये आले आणि एका पाठोपाठ एक त्यांनी नारदावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. बोला, काय खबर आणलीय. ही काय अवस्था झालीय माझ्या दरबाराची...? कुणी केलंय हे सगळं, यामागे घातपात तर नाही ना... की परग्रहावरून कुणी अज्ञात शक्ती काम करते आहे... मला सगळा अहवाल तातडीने द्या... मी काळजीत पडलोय...
देवा, देवा, जरा धीर धरा... इतकेही काही गंभीर प्रकरण नाही. विषय जरा वेगळा आहे. त्याचा संबंध थेट भूलोकाशी आहे.
इंद्रदेव भडकले, भूलोकी आपले राज्य असताना त्यांच्यामुळे आपला सगळा दरबार कसा काय आजारी पडू शकतो...?
महाराज, तेथे आता इंद्रदेवाची फारशी चालत नाही. सध्या तेथे दोन नवीन देव आले आहेत... तेच काय ते ठरवतात. कुणाला काय करायचे, त्यांच्याच हाती सध्या अनेकांचे भविष्य आहे. ते काय लिहितील ते प्रत्यक्ष ब्रह्मदेवही सांगू शकत नाही असा दावा आता भूलोकीचे लोक करू लागले आहेत.
वैतागून इंद्रदेव म्हणतात, हा काय प्रकार आहे. कोण आहेत तरी कोण हे लोक...?
देवा, एकाचे नाव नरेंद्र आणि दुसºयाचे नाव देवेंद्र. अवघे भूलोक त्यांना घाबरते. कुणाला उगाच झोपेत असतानाच आपली चौकशी सुरू झाल्याचे भास होऊ लागतात तर कुणाला मंत्रिपद मिळणार की नाही याचा घोर लागलेला...
त्याचा आपल्या दरबाराशी काय संबंध?
देवा, अहो, कुणाला चौकशी नकोय, कुणाला स्वत:चे मंत्रिपद टिकवायचे आहे तर कुणाला नव्याने मंत्रिपद हवे आहे, कुणाला महामंडळ हवे आहे तर कुणाला साधेच पण विशेष कार्यकारी अधिकारी पदाचा शिक्का हवायं. त्यामुळे अशा सगळ्यांनी त्यांच्या त्यांच्या श्रध्दा असणारे देव पाण्यात बुडवून ठेवले आहेत. पण हे नरेंद्र, देवेंद्र कुणाला बधतच नाहीत. इकडे देव पाण्यातून बाहेर पडेनात म्हणून त्यांना सर्दी, खोकला, पडसे, ताप असे आजार झाले आहेत. जोपर्यंत भूलोकीचे देव पाण्याबाहेर येणार नाहीत तोपर्यंत आपल्याकडची आजाराची साथ दूर होणार नाही... नारायण... नारायण...
 

Web Title: Goddess pandemic ...!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.