अन्वयार्थ - दिवाळीत आनंद मिळावा; डोळे आणि कानांना इजा नको!

By संजय पाठक | Published: November 4, 2023 10:07 AM2023-11-04T10:07:36+5:302023-11-04T10:08:06+5:30

सण-समारंभात लेझर शो, डीजे, फटाक्यांच्या त्रासाने डोळे, कान, आरोग्याच्या समस्या अनेकांच्या वाट्याला येतात. उत्सवातली ‘शांतता’ आपण पाळणार का?

Happy Diwali; Do not harm the eyes and ears! | अन्वयार्थ - दिवाळीत आनंद मिळावा; डोळे आणि कानांना इजा नको!

अन्वयार्थ - दिवाळीत आनंद मिळावा; डोळे आणि कानांना इजा नको!

संजय पाठक

गणेशोत्सव आणि नवरात्र पार पडत नाही तोच दिवाळीचे वेध लागतात. वातावरण उत्सवी आणि उत्साही असते.  आनंद साजरा तर व्हायलाच हवा. मात्र, या उत्साहाचे अतिउत्साहात रूपांतर महागात पडते. गणेशोत्सव मिरवणुकीत डीजेला बंदी असतानाही ते अनेक ठिकाणी वाजवण्यात आले. त्यापेक्षा भयंकर म्हणजे या डीजे-डॉल्बीला जोडून वापरण्यात आलेल्या लेझर लाइट्समुळे अनेकांच्या डोळ्यांना दुखापत झाली. नाशिक, मुंबई, पुणे, धुळे आणि नंदुरबार यासारख्या ठिकाणी या घटना प्रामुख्याने निदर्शनास आल्या.

आता दिवाळीतही फटाक्यांच्या वेळी-अवेळी होणाऱ्या कानठळी आवाजामुळे आरोग्याचा आणि प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. सणावारात किंवा उत्सव साजरा करण्यास कोणाचीच ना नसते. मात्र, बऱ्याचदा कानठळ्या बसवणारे डीजे किंवा फटाक्यांचे आवाज अनेकांना त्रासदायक ठरतात. त्याबाबत बालके, वृद्ध, रुग्ण, समाज किंवा पशू-पक्ष्यांना, प्राण्यांना त्रास होऊ नये, अशी भूमिका मांडली की त्याचा सकारात्मक विचार होण्यापेक्षा त्याला विशिष्ट समुदायविरोधी ठरवले जाते. त्यात मग आरोग्याचा विचार केला जात नाही की माणुसकीचा!

कानठळ्या बसवणाऱ्या डीजेचा त्रास नवा नाहीच, त्यामुळे यासंदर्भात कानाला त्रास झालेले अनेक रुग्णही ईएनटी स्पेशालिस्ट्सकडे गेले. त्यांनी ते जाहीर केले नाही इतकेच! २०२२ मध्ये सर्वप्रथम कोल्हापूर येथे लेझर शोमुळे ६३ जणांच्या डोळ्यांना त्रास झाल्याचे उघड झाले हेाते. त्यानंतर आता नाशिक, पुणे, मुंबई, धुळे आणि नंदुरबार या ठिकाणी आता हा विषय चर्चेत आला. खरे तर यासंदर्भात नेत्ररोगतज्ज्ञांनी अशा प्रकारचा त्रास होऊ शकतो म्हणून जनहितार्थ माहिती आधीच दिली. मात्र, त्यानंतर घडले भलतेच. यंत्रणेकडून नेत्ररोगतज्ज्ञांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करण्यात आले. सर्वोच्च न्यायालयानेही डीजेच्या वापरावर निर्बंध घातले आहेत. त्यामुळे पोलिस यंत्रणा गणेश विसर्जन मिरवणुकीस परवानगी देताना डीजेचा वापर करता येणार नाही, अशी अट घालते. मात्र, मिरवणुकीत पोलिसांच्या उपस्थितीतच सर्रास डीजे डॉल्बीचा वापर होतो. त्यावेळी पोलिस कोणतीही भूमिका घेत नाहीत. नंतर गुन्हे दाखल केले जातात. याचे कारण बहुतांश मंडळे राजकीय नेत्यांची असतात. त्यातच त्यांनी उत्सवासाठी अन्य स्थानिक कार्यकर्त्याला मंडळाचे अध्यक्ष केले असल्याने गुन्हे दाखल करताना असे नेते सहजपणे सुटतात.

नाशिकमध्ये लेझर शोमुळे झालेल्या त्रासानंतर जनजागृतीच्या भूमिकेत असलेल्या नेत्ररोगतज्ज्ञांनाच आरोपीच्या पिंजऱ्यात उभे करून पोलिस यंत्रणेने प्रश्नांची सरबत्ती केली. विशेष म्हणजे पोलिस, त्यांचे सीसीटीव्ही कॅमेरे आणि ड्रोन कॅमेरे असतानाही लेझरच्या बाबतीत नेत्ररोगतज्ज्ञांकडेच रुग्णांची नावे आणि पुरावे मागण्यात आले. मुळात लेझर किरणांचा डीजेबरोबरचा वापर अलीकडेच सुरू झाला. त्याआधी केवळ लाइट्स वापरले जात. नाशिकमधील एका जाणकार नेत्ररोगतज्ज्ञाने दिलेल्या माहितीनुसार औद्येागिक क्षेत्रात लोखंड किंवा स्टील कापण्यासाठी ज्या तीव्रतेचे लेझर किरण वापरले जातात, त्याचाच बिनदिक्कतपणे मिरवणुकीत वापर केला जातो!

थेट गर्दीवर लेझर फोकस केला जातो. लेझरचा हा स्राेत थेट डोळ्यांत गेल्यामुळे डोळ्यांना मोठ्या प्रमाणात इजा होऊ शकते. मिरवणकीतील डीजेची ध्वनी पातळी राज्यात अनेक ठिकाणी ६५ डेसिबलऐवजी थेट ८० ते ८५ डेसिबलपर्यंत जाते, असेही काही तज्ज्ञांचे म्हणणे आहे. इतकेच नव्हे, लग्न समारंभांतील आवाजामुळेही अनेकांना बहिरेपणा आल्याची आणि त्यांना रुग्णालयांत दाखल केल्याची वस्तुस्थिती आहे. मध्यंतरी धुळ्यातील एका डॉक्टरांनी डीजेमुळे होणाऱ्या त्रासाबद्दल एक लेख माध्यमात लिहिला तर त्यांनाही धमक्या दिल्या गेल्या. असे प्रकार अनेक ठिकाणी कमी-अधिक प्रमाणात घडले आहेत. अशा प्रकारांकडे वेळीच गांभीर्याने पाहिले गेले पाहिजे.

लेखक लोकमत नाशिक आवृत्तीचे वृत्त संपादक, आहेत
sanjay.pathak@lokmat.com

Web Title: Happy Diwali; Do not harm the eyes and ears!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.