ख्यातनाम साहित्यिक शरणकुमार लिंबाळे यांच्या ‘सनातन’ या कादंबरीला प्रतिष्ठेचा सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे, त्यानिमित्ताने त्यांच्याशी संवाद....कलावादाला बांधीलकीची अॅलर्जी असते, पण जीवनवादी साहित्य हे श्रेष्ठ साहित्य असं म्हणता तुम्ही..?दलित साहित्य’ येण्यापूर्वी वि. स. खांडेकर, विभावरी शिरुरकर, गोदावरी परुळेकर अशा अनेकांनी दलितांबद्दलचे प्रश्न जीवनवादी मराठी साहित्यातून मांडलेले आहेत. ‘बळी’, ‘जेव्हा माणूस जागा होतो’ सारखी पुस्तकं वाचून मला अशा लेखकांविषयी प्रचंड आकर्षण निर्माण झालं. ही वरच्या वर्गातली माणसं इतकी बेधडकपणे आपल्या वर्गाशी विद्रोह कशी काय करतात? आमच्यावर इतका अत्याचार होत असताना आम्ही का तो मार्ग घेत नाही, असा झगडा माझ्या मनात चालू झाला. त्याच दरम्यान ‘दलित पँथर’ चळवळ जोमानं वाढू लागली, दलित साहित्य समोर यायला लागलं. ‘तुम्हाला शुद्ध लिहिता येत नाही, तुम्ही आक्रस्ताळे, शिवराळ, प्रचारकी भूमिका घेऊन लिहिता; असं साहित्य कलेच्या मूल्यावर टिकणारं नव्हे,’ अशी ओरड झाली. त्यातून सौंदर्यशास्त्राची चर्चा आली. साहित्य परंपरेला बाधा येता कामा नये असं बजावलं गेलं. दलित साहित्यासाठी वेगळ्या सौंदर्यशास्त्राची गरज आहे, त्यासाठी वेगळे निकष वापरले पाहिजेत ही मांडणी आम्ही करीत होतो. आम्ही कलावादी नव्हे, जीवनवादी लेखक आहोत, असं सांगत होतो. काही पुरोगामी लेखकांनी गुंगी आणणाऱ्या परंपरेकडे पाठ फिरवून दलितांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं व व्यवस्थेचा दरवाजा किलकिला करण्याचं काम केलं. आम्ही तो दरवाजा तोडून आत प्रवेश केला. ‘सनातन’ कादंबरीत इतिहासाने नाकारलेल्या माणसांचं उत्खनन केलंय तुम्ही!प्राथमिक शाळेपासून जो इतिहास मी वाचला त्यात लढाया, सनावळी, तलवारी, स्त्रियांना पळवून नेणं याचे तपशील आहेत; पण माझे आईबाप, शोषण, प्रश्न, वेदना यांचा मागमूस नाही. दलित-आदिवासींच्या शौर्याची दखल नाही. साहित्य व इतिहासात आमचा वापर केवळ नोकर-चाकर, दुय्यम दर्जाची माणसं म्हणून. दलितांमध्येही नायक आहेत, शौर्यवृत्ती आहे, तिचा उच्चार केला जावा. ब्रिटिशांमुळं दलितांना शिकायला मिळालं, सैन्यामध्ये प्रवेश मिळाला, बंदर, रेल्वे नि पोस्ट ऑफिसात नोकऱ्या मिळाल्या. दलितांची म्हणून पारंपरिक कामं सोडून आधुनिक व्यवस्थेमधल्या कामात त्यांचा मार्ग तयार झाला. दलित समाज दुबळा, लाचार का आहे याचा मागोवा घेताना रामायणातला शंबुक आठवला. कोरेगाव-भीमा लढा आठवला. बिरसा मुंडा आठवला. इतिहासानं नाकारलेल्या या माणसांची कहाणी ‘सनातन’ सांगते. कोरेगाव-भीमात पाचशे महार सैनिकांनी केलेला पराक्रम, मंगल पांडेबरोबर फाशी गेलेला व त्याला काडतुसाची पहिली खबर देणारा मातादिन भंगी, झाशीच्या राणीसोबत सावलीसारखी वावरलेली झिलकारी बाई अशा नायकांना ही कादंबरी पुढे आणते. शोषित, पीडित स्वाभिमानी शूर होते हे सांगते.पण हळूहळू दलित साहित्याचा सूर बदलत गेला?सुरुवातीचं दलित साहित्य ‘आम्हीही माणसं आहोत, आम्हालाही तुमच्यासारखे दोन डोळे आहेत, तुमचं रक्त लाल तसं आमचं रक्त लाल आहे, मग असं वगळणं का?’ अशी याचना करणारं होतं. आक्रोश करणारं, वेदना मांडणारं होतं. या टप्प्यात आमच्याकडे दुर्लक्ष होत गेलं. मग लक्षात आलं, वेदना मांडण्यापेक्षा दुसरी भूमिका घ्यायला हवी. त्यातून नकाराची भूमिका आली. आम्ही ईश्वर, धर्म, संस्कृती नाकारायला लागलो. यातून धक्के बसलेला मुख्य प्रवाह म्हणाला, ‘तुम्ही वेगळी चूल निर्माण करू नका. वेगळी भाषा बोलू नका. आपण एकत्र असलं पाहिजे.’ मग आम्हाला वाटलं, या लोकांना अजून भीती दाखवली पाहिजे. नंतर विद्रोहाची भूमिका घेतली गेली. त्यातून दलित साहित्याला एक वेगळी ओळख मिळाली. मराठीतल्या दलित साहित्याची राष्ट्रीय स्तरावर चर्चा होऊ लागली. भाषांतरामुळं अन्य राज्यांत व देशाबाहेर ही व्यथा पोहोचली. मराठी भाषेची स्वातंत्र्योत्तर काळामध्ये जी चर्चा झाली ती केवळ दलित साहित्यामुळं झालेली आहे. हक्क व अधिकार हवेत, दया नको! तुमच्या सहानुभूतीची आम्हाला घृणा वाटते, आम्हाला मानवाधिकार पाहिजेत अशी विद्रोही भूमिका घेण्यातून राजकीय भूमिका घडली. आज दलित साहित्य याच्यापुढं गेलेलं आहे. केवळ दलित म्हणून लादल्या गेलेल्या अनुभवांचं साहित्य, वेदनांचा हुंकार, विषमताविरोधी चळवळ अशा चौकटीत हे साहित्य जोखणं मला चुकीचं वाटतं. सामान्य माणूस निर्भयपणे जगला पाहिजे ही या साहित्याची आच आहे.मग दलित साहित्याच्या मूल्यमापनासाठी रूढ निकष वापरता येणार नाहीत हे तुमचं म्हणणं कायम आहे का?दलित हे जगभरात आहेत. वैश्विकीकरणामुळे सगळे एकत्र येताहेत. इथल्या गावकुसातला दलित हा अमेरिका, आफ्रिकेतल्या कृष्णवर्णियाशी नातं सांगू शकतो ते वेदनेचं आहे. अशा नाकारलेल्यांचं साहित्य जगभरात लिहिलं जातंय. हे सगळे परिघावर ढकललं जाण्याचा विरोध करताहेत. अशा विराट पटलावर दलित साहित्याची समीक्षा केली जावी, असं मला वाटतं. कलेच्या कसोटीवर हे साहित्य जोखणं फार संकुचित ठरेल. वाचक जोवर जातीव्यवस्था, भेदभाव नि शोषणाच्या पद्धती समजून घेत नाही तोवर हे साहित्य त्याला कळणार नाही. मैफिलीत गाण्याला दाद द्यावी तशी ती यातील वेदनेला देणं कुचेष्टा होईल. तो स्वातंत्र्यासाठीचा विद्रोह आहे. स्वातंत्र्य हे असं मूल्य आहे की, त्यासाठी समाज कुठलीही किंमत द्यायला तयार होतो. मला सांगा, सौंदर्यासाठी अशा कुठल्या क्रांती झाल्यात का? कुणी फासावर गेलं आहे का? म्हणूनच सौंदर्यापेक्षा श्रेष्ठ मूल्य स्वातंत्र्य आहे. दलित साहित्य स्वातंत्र्यासाठी, भयमुक्त जगता यावं म्हणून लिहिलं जातं. स्वातंत्र्य हे सौंदर्यमूल्य म्हणून पाहाता यायला हवं. - मुलाखत : सोनाली नवांगुळ
सौंदर्यासाठी कधी कुणी फासावर गेलंय का?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 03, 2021 4:40 AM