यहाँ के हम सिकंदर !
By गजानन दिवाण | Published: August 31, 2018 01:41 PM2018-08-31T13:41:45+5:302018-08-31T13:43:09+5:30
अधिकारी असो वा राजकारणी, या शहरात काहीही केले तर चालते, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. हे सर्व जण स्वत:ला या शहराचे जणू ‘सिकंदर’ समजू लागले आहेत.
औरंगाबाद शहराचे सर्वांत मोठे दु:ख काय असेल, तर या शहराचे स्वत:चे आपले म्हणून असे कोणीच नाही. सर्वसामान्य नागरिक, राजकारणी आणि प्रशासकीय अधिकारी यातील कोणालाही या शहराबद्दल आपलेपण नाही. त्यामुळे शहरातील कुठल्याच समस्येवर कायमचा तोडगा निघत नाही. राजकारणी स्वत:चे हित पाहतात. अधिकाऱ्यांना तीन वर्षे काढायची असतात आणि सर्वसामान्यांना स्वत:च्या जगण्यापलीकडे काहीच दिसत नाही.
अनेक महिन्यांपासून कच-याचा प्रश्न मार्गी न लागल्याने शहराची अक्षरश: कचराकुंडी झाली आहे. आता या कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी ब्लॅक लिस्टेड कंपनीची निवड झाली आहे. ‘समांतर’चा घोळ अनेक वर्षांपासून सुरू असून, जायकवाडीत साठा असतानाही औरंगाबादकरांना वेळेवर पाणी मिळत नाही. या योजनेनंतर हा प्रश्न मिटेल, असे गृहीत धरले तरी नागरिकांना प्रचंड मोठी पाणीपट्टी मोजावी लागणार आहे. इन मीन दोन मोठे रस्ते असलेल्या या स्मार्ट सिटीत सुरळीतपणे साधी शहर बस धावत नाही. प्रत्येक समस्येचे हे असेच आहे. स्वत:चे हित जिथे दिसते तोच प्रश्न राजकारण्यांकडून उचलला जातो. सत्ताधारी आणि विरोधक दोघेही सारखेच. विरोध कशाला आणि समर्थन कशाचे याचेही गणित ठरलेले असते. दोघांचाही उद्देश एकच. शहराच्या विकासाला हा मोठा अडसर आहेच. त्याहीपेक्षा मोठा धोका येथील सर्वसामान्य मानसिकतेचा आहे. कितीही-काहीही झाले तरी फार-फार तर सोशल मीडियावर व्यक्त होण्यापलीकडे औरंगाबादकर काहीच करीत नाहीत.
अधिकारी असो वा राजकारणी, या शहरात काहीही केले तर चालते, हे त्यांना चांगले ठाऊक आहे. हे सर्व जण स्वत:ला या शहराचे जणू ‘सिकंदर’ समजू लागले आहेत. गणपती बाप्पाचे आगमन १५ दिवसांवर आले आहे. शहरातील सर्व खड्डे तोपर्यंत बुजविले जातील, असे आश्वासन पालिकेने दिले आहे. ते बुजविले तरी आम्ही गणेशोत्सव दणक्यात साजरा करू आणि नाही बुजविले तरी दणक्यातच करू; पण पालिकेला जाब विचारण्याचे कष्ट घेणार नाही.
सहा महिन्यांपूर्वीच झोननिहाय डागडुजीच्या निविदा काढून साडेचार कोटी रुपये उधळण्यात आले. मोठा पाऊस होण्याआधीच पुन्हा खड्डे पडले. गेल्यावर्षीही पावसाळ्यात शहरभर खड्डे पडले होते. मनपा पदाधिका-यांनी प्रत्येक झोनमध्ये ५० लाख रुपयांच्या निविदा काढण्यास प्रशासनाला भाग पाडले. संपूर्ण शहरात केवळ ३० ते ४० टक्केच काम झाले. गेल्या पाच वर्षांत महापालिकेने केवळ खड्डे बुजविण्याच्या नावाखाली २० कोटींहून अधिक रकमेची उधळपट्टी केली. आता पुन्हा नव्याने निविदा काढली जाईल. आपल्या माणसाला काम दिले जाईल. थातूरमातूर काम करून गणेशोत्सवापुरते खड्डे बुजतीलही. एक पाऊस होताच पुन्हा खड्डे दिसू लागतील. गेल्या अनेक वर्षांपासून हे असेच सुरू आहे. ते करतील तीच पूर्व दिशा. तेच या शहराचे सिकंदर. कोण विचारेल जाब त्यांना?