हे का शुद्धोदक?
By admin | Published: December 23, 2016 11:56 PM2016-12-23T23:56:40+5:302016-12-23T23:56:40+5:30
मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यासह स्मारकाचा आज होणारा भूमिपूजन
मुंबई नजीकच्या अरबी समुद्रात उभारण्यात येणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यासह स्मारकाचा आज होणारा भूमिपूजन समारोहदेखील राजकारणरहित राहू नये आणि येथेही विविध पक्ष-संघटना आणि खुद्द सत्तारुढ युतीमधीलच दोन्ही पक्षांमध्ये श्रेयवाद उफाळून यावा हे घसरलेल्या राजकीय संस्कृतीचे तर लक्षण आहेच पण ज्या स्मारकापासून महाराष्ट्राच्या रयतेने स्फूर्ती आणि प्रेरणा घ्यावी अशी अपेक्षा आहे त्या अपेक्षेबाबत हे सारे श्रेयवादी भर समुद्रामध्येही कसे कोरडे राहू इच्छितात याचेही निदर्शक आहे. शिवरायांच्या राज्याभिषेकासाठी त्या काली जसे सप्त सिंधूंचे जल मागविण्यात आले होते, त्याच धर्तीवर आजच्या समारोहासाठीदेखील महाराष्ट्रातील विविध नद्यांमधले पाणी आणि गड किल्ल्यांवरील मृत्तिका नेली जाणार आहे. कल्पना तशी वाईट नसली तरी तिथेही श्रेयवाद कोणी टाळलेला नाही. श्रेयवादाच्या याच झुंझीमधून भाजपाने मुसंडी मारुन नाशिकमधील रामकुंड व त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त येथील गोदावरीच्या जलाच्या कावडी म्हणे भरुन घेतल्या. केवळ तितकेच नव्हे तर त्या वाजत गाजत मुंबईकडे मार्गस्थ करण्याचे नियोजनदेखील केले. छत्रपती शिवाजी महाराजांना हिंदवी स्वराज्याचे संस्थापक म्हणूनही आदराने संबोधले जात असल्याने त्यांच्या नियोजित स्मारकाचा भूमिपूजन समारोह यथासांग आणि हिन्दू धर्मशास्त्रसंमत अशाच रितीने केला जावा आणि तसा आग्रह धरला जावा हेदेखील तसे रास्तच. परंतु प्रश्न जेव्हां धर्मसंमत रितीने कार्य सिद्धीस नेण्याचा मनसुबा रचला जातो, तेव्हां या रितीमध्ये कोणतीही तडजोड क्षम्य ठरत नाही. सप्तसिंधूंचे किंवा महाराष्ट्र प्रांतातील नद्यांचे नेले जाणारे उदक हे शुद्धोदकच असणे मग अनिवार्य ठरते. नाशकातील ज्या रामकुंडातले जल बेगडी शिवभक्तांनी संकलित केले आहे त्या रामकुंडात भले गोदावरी वाहून (अर्थात गंगापूर धरणातून विसर्ग घेतल्यावरच) येत असली तरी रामकुंडाची ख्याती शुद्ध कर्मासाठी नव्हे तर अशुद्ध कर्मासाठी आहे. तिथे श्राद्धादि संस्कार होत असतात. खुद्द रामचन्द्राने त्याचा पिता दशरथ याचे तर्पण याच रामकुंडात केल्याची आख्यायिका आहे. त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तामध्ये मुळात गोदावरीचेच जल असते की त्याच गावातल्या एका सरोवरातील पाणी पंप लावून आणविलेले असते, याविषयी कोणीही खात्रीशीरपणे सांगू शकत नाही. याचा अर्थ स्मारकाच्या भूमिपूजनासाठी जे उदक वाजतगाजत नाशकातून अरबी समुद्रात नेले जाईल ते शुद्धोदकच असेल याची शाश्वती नाही. किंबहुना ते शुद्धोदक नसेल याचीच अधिक शक्यता. अर्थात भूमिपूजनाचे यजमानत्व आणि पौरोहित्यदेखील हिंन्दुत्वनिष्ठांच्याच हाती असल्याने हा इतका उहापोह करायचा इतकेच!