इतिहासाची उजळणी

By admin | Published: October 11, 2015 10:09 PM2015-10-11T22:09:02+5:302015-10-11T22:09:02+5:30

असं म्हणतात की, इतिहासात घडून गेलेल्या काही घटना विशिष्ट कालावधीनंतर पुनरावृत्त होत असतात. अर्थात अशा घटनांमधील तपशील भिन्न असतो पण सार मात्र एकसमान असते.

History revision | इतिहासाची उजळणी

इतिहासाची उजळणी

Next

असं म्हणतात की, इतिहासात घडून गेलेल्या काही घटना विशिष्ट कालावधीनंतर पुनरावृत्त होत असतात. अर्थात अशा घटनांमधील तपशील भिन्न असतो पण सार मात्र एकसमान असते. यातील एक घटना १९८७ सालातली. पंतप्रधान राजीव गांधी यांची पत्रकार परिषद सुरू होती. देशी-विदेशी पत्रकार खच्चून भरले होते. परिषदेचे थेट प्रक्षेपणही सुरू होते. आणि अचानक राजीव गांधी यांनी परराष्ट्र सचिव ए. पी. व्यंकटेश्वरम यांची तिथल्या तिथे उचलबांगडी जाहीर केली. व्यंकटेश्वरम यांनी इस्लामाबाद आणि न्यूयॉर्क येथे केलेल्या काही वक्तव्यांपायी पंतप्रधान अडचणीत आले होते, असे तेव्हा जाहीर केले गेले. अर्थात पंतप्रधानांच्या त्या निर्णयावर बरीच टीकाही झाली होती. दुसरा प्रसंग ए. आर. अंतुले राज्याचे मुख्यमंत्री असतानाचा म्हणजे १९८० सालातला. रात्री ते दिल्लीहून परत आले आणि येतानाच त्यांच्या सचिवांनी पत्रकारांना घाईने वर्षावर बोलावून घेतले. ‘शालिनी पाटील यांनी माझा विश्वास गमावला असल्याने त्या आता माझ्या मंत्रिमंडळाच्या सदस्य नाहीत’ इतकीच घोषणा त्यांनी केली व परिषद आटोपती घेतली. आता त्यानंतरची घटना गेल्या शुक्रवारची. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी अशीच घाईगर्दीत एक पत्रकार परिषद पाचारण केली आणि त्यांचेच एक सहकारी व दिल्लीचे अन्न तसेच पर्यावरण मंत्री असीम अहमद खान यांना मंत्रिमंडळातून बडतर्फ केल्याची घोषणा त्यांनी केली. आसीम खान यांनी त्यांच्या मातिया महल मतदारसंघातील एका बिल्डरला मदत करण्यासाठी सहा लाखांची लाच मागितल्यावरून ही कारवाई केली गेल्याचे सांगतानाच भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या आपल्या मंत्र्यालाही आपण पाठीशी घालीत नाही हे आवर्जून सांगितले. त्याचबरोबर आता पंतप्रधानांनीही वसुंधराराजे व शिवराजसिंह चौहान यांना डच्चू देऊन दाखवावे असे आव्हान करताना केजरीवालांनी राजकारणही साधून घेतले. गेल्या आठ महिन्यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या कारकिर्दीतील बडतर्फ होणारे असीम खान हे दुसरे मंत्री. याआधी शैक्षणिक पात्रतेची बनावट प्रमाणपत्रे सादर केल्याबद्दल जितेन्द्रसिंह तोमर यांना घरी जावे लागले होते. थेट पत्रकारांच्या पुढ्यात आपल्याच एका मंत्र्याला घरी पाठविण्याची घोषणा करून आपण सत्कृत्य केले असे जरी केजरीवालांना वाटत असले तरी मूलत: आपली माणसे निवडतानाच कुठेतरी गफलत झाल्याचे त्यांनाही मान्य करावेच लागेल.

Web Title: History revision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.