ऐतिहासिक वारसा हा अनमोल खजिन्यासारखा असतो. सर्व शहरे किंवा परिसराला हे भाग्य मिळत नाही. औरंगाबाद शहर आणि परिसर हा त्यासाठी समृद्ध आहे. अगदी सातवाहनांपासून हा वारसा या परिसराला लाभलेला आहे. यादवांची राजधानीच देवगिरी होती. वेरुळ, अजिंठा ही जागतिक ओळख आहे. सोबत औरंगाबाद शहरही त्या दृष्टीने समृद्धच म्हणावे लागेल. ४०० वर्षांपूर्वी मलिकअंबरने ते नावारूपाला आणले. पुढे मोगल, निझाम यांच्यासाठी हे शहर महत्त्वाचे होते. मोगलांचा दख्खन सुभा असल्याने औरंगजेबाचे वास्तव्य, अशा वेगवेगळ्या राजवटीच्या खुणा पावलोपावली आज शहरात दिसतात. बुलंद दरवाजे, इमारतींच्या रूपाने आजही शहराची शान वाढवतात. शे-दोनशे वर्षे उन्हाळे-पावसाळे सोसूनही त्या तग धरून आहेत. या शहराच्या ऐतिहासिक वारशांबाबत प्रशासन कमालीचे बेफिकीर असल्यामुळे यातील काही तटबंदी इमारती पडल्या. काही लोकांनी पाडल्या. तरीही प्रशासनाने त्याकडे लक्ष दिले नाही.आपल्या देदीप्यमान ऐतिहासिक वारशाची परंपरा सांगत जनमत वळवण्याचा आणि मतपेटी वाढवण्याचा हा काळ; पण मतांसाठी इतिहासाचा जागर करणारे तो जतन करीत नाहीत हा आजवरचा अनुभव आहे. औरंगाबाद हिस्ट्री सोसायटीने या शहराचा इतिहास जतन करण्यासाठी उभी केलेली लोकचळवळ हा अलीकडच्या काळात सुस्त पडलेल्या औरंगाबाद शहरासाठी अतिशय सुखद असा अनुभव आहे. अशाच चळवळीतून इतिहासाचे जतन होत असते. औरंगाबादेत या माध्यमातून ही चळवळ सुरू झाली आहे. प्रशासन ते प्रशासनच. सर्वसामान्य लोकांमध्ये तर या वारशांबाबत कुठे आपुलकी आहे? लोकांमध्येही या वारशांबाबत कमालीची अनास्था आहे. जोपर्यंत लोक पुढे येणार नाहीत तोपर्यंत त्याचे संरक्षण व संवर्धन होणार नाही, हे तितकेच खरे. म्हणून इतिहासाविषयी लोकजागृती आवश्यक असते. हे काम ‘औरंगाबाद हिस्ट्री सोसायटी’ जाणीवपूर्वक पार पाडत आहे. डॉ. वि.ल. धारूरकर, डॉ. बिना सेंगर, डॉ. दुलारी कुरेशी, रफत कुरेशी, अॅड. स्वप्निल जोशी, चंद्रशेखर बोर्डे, निखिल भालेराव आदी इतिहासतज्ज्ञ आणि इतिहासप्रेमी मंडळी एकत्र आली आणि त्यांनी हा लोकजागर सुरू केला. शहराचे ऐतिहासिक महत्त्व जपण्यासाठी सुरू केलेला हेरिटेज वॉक हा उपक्रम महत्त्वाचा ठरला. इतिहास लोकांना सांगणे, तो जतन करण्यासाठी सतत प्रयत्न करणे तसेच संवर्धनासाठी प्रशासनाकडे आग्रह धरणे यासोबतच सामान्य माणसाला शहराचे ऐतिहासिक महत्त्व समजावे यासाठी हा वॉक घेतला जातो. ऐतिहासिक वास्तूला भेट देऊन त्यांचे महत्त्व, तेथे घडलेल्या महत्त्वाच्या घडामोडी याची माहिती लोकांना दिली जाते. यातून जागृती निर्माण केली जाते. त्याला शहरातून प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. शेकडो लोक या हेरिटेज वॉकमध्ये सहभागी होत आहेत. या इतिहासप्रेमींना संवर्धनाच्या कामात सक्रिय सहभागी करून घेण्यासाठी अशा जुन्या इमारतींची स्वच्छता करणे, या वास्तूंचे नकाशा मापन करणे, त्यांची चित्रे काढून घेणे यासोबत शहरात ऐतिहासिक विषयांवर कार्यशाळा आयोजित करणे, आंतरराष्ट्रीय परिषदा भरवून देशोदेशीचे इतिहासतज्ज्ञ बोलविणे असे वेगवेगळे उपक्रम या माध्यमातून राबविले जातात. केवळ इतिहासपे्रमींच्या बळावर हे आयोजन केले जाते. प्रशासनाच्या अनास्थेमुळे दमडीमहल, खासगेटसारख्या वास्तू पाडण्यात आल्या. त्याचा निषेध करण्यासाठी मेणबत्ती मोर्चा काढून प्रशासनाला चुकींची जाणीव करून दिलीच शिवाय लोकांचा सहभागही वाढविला. असे एक ना अनेक उपक्रम ही संस्था राबविते.
इतिहासाचे रखवालदार! ऐतिहासिक वारशांबाबत प्रशासन कमालीचे बेफिकीर
By सुधीर महाजन | Published: September 27, 2017 3:24 AM