पुरुष सावजांना हेरणारे ‘मधाचे सापळे’, पण या सगळ्यातून वाचायचे कसे?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2021 09:04 AM2021-11-25T09:04:59+5:302021-11-25T09:08:16+5:30

सायबर हनी ट्रॅप लावून पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या सध्या सक्रिय आहेत. या उच्छादापासून वाचायचं असेल, तर एकच पर्याय - सायबर पोलिसांकडे या!

Honey traps for men | पुरुष सावजांना हेरणारे ‘मधाचे सापळे’, पण या सगळ्यातून वाचायचे कसे?

पुरुष सावजांना हेरणारे ‘मधाचे सापळे’, पण या सगळ्यातून वाचायचे कसे?

Next

डॉ रश्मी करंदीकर, पोलीस उपायुक्त, सायबर गुन्हे शाखा, मुंबई -

स्मार्टफोन्समुळे लोकांचं आयुष्य आमूलाग्र बदलून गेलं.  डॉक्टरच्या वेटिंग रूमपासून ते प्रवासापर्यंत वेळ मिळेल तिथे माणसं फेसबुक, इन्स्टाग्राम, स्नॅपचॅट, व्हाॅट्सॲप यावर वेळ घालवू लागली. जुने शाळेतील मित्र, कॉलेजमधले नोकरीनिमित्त परदेशी स्थायिक झालेले मित्र, लग्न होऊन दुसऱ्या राज्यात नवऱ्याबरोबर रहायला गेलेल्या मैत्रिणी या सगळ्यांशी व्हर्च्युअल संवाद व्हायला लागला. कधी चेहरा ओळखीचा म्हणून, तर कधी आकर्षक म्हणून. कधीही न भेटलेले लोक थेट मित्र यादीत येऊ लागले. आणि मग हळूहळू या मित्र यादीत सुंदर चेहऱ्याच्या तरुण मुलींचा समावेश होऊ लागला.

एखादी तरुण, सुंदर चेहऱ्याची मुलगी  फ्रेंड रिक्वेस्ट पाठवते. चॅट बॉक्समध्ये  अत्यंत ओळखीने बोलते. आपल्याला ती आठवत नाही; पण तिला मात्र आपण आठवत असतो. आपल्या आयुष्यातल्या अनेक घटना, आपले नातेवाइक, मित्र हे सगळं तिला माहिती असतं. शेवटी छान छान बोलून ती आपला मोबाइल नंबर घेते. वर म्हणते ‘एकदा व्हाॅट्सॲप व्हिडिओ कॉलवर बोलू म्हणजे तुम्हाला आठवेल आपली भेट कधी झाली होती ते!”... उत्सुकतेने आपण तिला आपला नंबर देतो. ती आपल्याला व्हिडिओ कॉल करते.  अर्धा- एक मिनिट तिच्याशी बोलतो; पण आपल्याला तरीही ती मुलगी आठवत नाही. शेवटी आपण फोन ठेवून देतो. ती मुलगी आपल्याला आठवली नाही म्हणून नाराज होइल किंवा तिचा काही तरी गैरसमज झाला असेल; यापलीकडे सामान्य नागरिक म्हणून आपल्याला कुठलीच शक्यता सुचत नाही. 

- आणि आपल्याशी प्रत्यक्ष व्हिडिओ कॉलवर बोललेली मुलगी ही खरोखरची मुलगी नसून एक मुलगा आहे आणि त्यागे सायबर हनी ट्रॅपची प्रशिक्षित टोळी आहे अशी शक्यताही आपल्या मनाला शिवत नाही; पण दुर्दैवाने हे सध्या फार मोठ्या प्रमाणात घडतं आहे. राजस्थान, उत्तर प्रदेश आणि हरियाणाच्या सीमावर्ती भागात अशा सायबर हनी ट्रॅप लावून पैसे उकळणाऱ्या अनेक टोळ्या तयार झालेल्या आहेत. या टोळ्यांमध्ये आठवी ते बारावी पास मुलांना घेतलं जातं आणि त्यांना हे गुन्हे करण्याचं रीतसर प्रशिक्षण दिलं जातं. इतके दिवस फक्त अतिश्रीमंत लोकांपुरता मर्यादित असलेला हनी ट्रॅपचा धंदा सोशल मीडियामुळे सर्वसामान्य माणसांच्या घरापर्यंत येऊन पोहोचलेला आहे.

पूर्वी एखाद्या माणसाची पर्सनल माहिती काढण्यासाठी गुन्हेगारांना बराच आटापिटा करावा लागायचा. आता मात्र समाजमाध्यमांवर आपण अशी बरीच माहिती सर्रास टाकत असतो. आपण कुठे राहतो, नातेवाइक कोण, बायको-मुलांची नावं, आपले मित्र-मैत्रिणी, आपण केलेल्या सहली, साजरे केलेले कौटुंबिक प्रसंग, आपल्या आवडीनिवडी, आपली शाळा, आपलं कॉलेज, शिक्षण, नोकरीधंद्याचं स्वरूप आणि ठिकाण अशा सर्व गोष्टी आपण समाजमाध्यमांवर टाकत असतो. आणि हीच माहिती एकत्र करून हे सायबर गुन्हेगार सर्वसामान्य माणसांना टार्गेट करतात. त्यांची कार्यपद्धतीदेखील त्याप्रमाणे विचारपूर्वक तयार केलेली असते.

सगळ्यात आधी ते एखाद्या तरुण सुंदर मुलीचा डीपी असलेल्या अकाऊंटवरून फ्रेंड रिक्वेस्ट पाठवतात. ती मान्य केली की गोड बोलून चॅटिंग करतात. हे टेक्स्टवर केलेलं चॅटिंग असतं त्याचा स्क्रीनशॉट मारून त्यापैकी तुमचं चॅट एडिट करतात. किंवा तुमच्याशी केलेला व्हिडिओ कॉल मॉर्फ करतात. बरं, यात सगळेच जण इतक्या निरागसपणे अडकतात असंही नसतं. सुंदर तरुण मुलीचा फोटो बघून तिच्याशी थोडंफार चॅटही अनेक जण करतात. आणि मग हे गुन्हेगारही मॉर्फ/ एडिट केलेली क्लिप किंवा चॅटचे स्क्रीनशॉट्स तुम्हाला पाठवतात आणि ते व्हायरल करण्याची, तुमच्या ओळखीच्या लोकांना, बायकोला पाठवण्याची धमकी देतात. तुमच्या व्हाॅट्सॲपमध्ये असलेल्या कॉन्टॅक्ट लिस्टमधल्या सगळ्यांपर्यंत तो व्हिडिओ पोहोचविण्याची धमकी देतात. सुरुवातीला हे टाळण्यासाठी अगदी पाच-दहा हजार इतपत रक्कम मागितली जाते. एकदा ती रक्कम दिली की पुन्हा पुन्हा पैशांची मागणी केली जाते. काही वेळा एक टोळी तुमच्याकडून असे थोडे थोडे करून बरेच पैसे उकळते आणि मग तुमचा हा व्हिडिओ दुसऱ्या टोळीला विकते. मग पुन्हा ती दुसरी टोळी तुम्हाला त्यावरून ब्लॅकमेल करते. त्यातही काही वेळा तुम्हाला ‘सायबर पोलीस किंवा सीबीआयमधून बोलतोय, तुम्ही सायबर गुन्हा केला आहे.’ असं सांगून पोलिसांच्या नावाने पैसे मागणारेही फोन येतात. हे फोन ज्या नंबर्सवरून येतात, ते नंबर्स ट्रू कॉलरसारख्या ॲपवर सायबर पोलीस, पोलीस ऑफिसर अशा नावाने सेव्ह केलेले असतात. आपली समाजात बदनामी होइल किंवा यामुळे आपल्या घरात भांडणं होतील याला घाबरून बहुतेक लोक पैसे देऊन या गुन्हेगारांपासून पिच्छा सोडवून घेण्याचा प्रयत्न करतात. आणि त्या ट्रॅपमध्ये अधिकाधिक अडकत जातात.

पण मग या सगळ्यातून वाचण्याचा मार्ग काय ? तर मुंबई पोलिसांच्या सायबर ब्रँचने केलेलं आवाहन असं, की मुळात आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंट्सची सेटिंग्ज प्रायव्हेट ठेवा. समाजमाध्यमांवर अनोळखी लोकांच्या फ्रेंड रिक्वेस्ट स्वीकारू नका. त्यातही अनोळखी, सुंदर आणि तरुण मुलींचा फोटो असलेल्या अकाऊंटपासून विशेष सावध राहा. त्यांच्याशी पर्सनल चॅट बॉक्समध्ये चॅटिंग करू नका. अनोळखी नंबरवरून आलेला व्हॉट्सॲप व्हिडिओ कॉल स्वीकारू नका. तो नंबर लगेच ब्लॉक करा. आणि एवढं करूनही जर तुम्हाला कोणी बदनामीची भीती घालून ब्लॅकमेल करत असेल तर पोलिसांकडे तक्रार करा. कारण जोवर गुन्हा घडलाय हे पोलिसांना कळत नाही तोवर ते गुन्हेगारांचा बंदोबस्त करू शकत नाहीत. आपण गप्प बसण्याने फक्त गुन्हेगारांचाच फायदा होतो!

Web Title: Honey traps for men

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.