संस्कार म्हणजे गुणांचा गुणाकार आणि दोषांचा भागाकार. गुणांचा गुणाकार म्हणजे स्वत:मधील गुण वाढवायचे आणि दोषांचा भागाकार म्हणज स्वत:मधील दोष कमी करायचे. पण, हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा या संस्कारांची पायाभरणी पूर्ण क्षमतेनी झालेली असेल. त्यात जर आधुनिकतेच्या नावाखाली कुचराई केली गेली तर विध्वंस थांबविणे कठीण आहे. संस्कारावरची ही चर्चा पुन्हा नव्याने करण्याचे कारण याच आधुनिकतेच्या नादात तरुणाईने स्वीकारलेली आंधळी व्यसनाधीनता आहे. ही व्यसनाधीनता या तरुणाईला कशी विध्वंसाच्या दिशेने घेऊन चालली आहे, याची दाहक प्रचिती सोमवारी नागपूरकर पालकांना आली. गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पाच हुक्का पार्लरवर छापे घातले. यातल्या एका ठिकाणचे चित्र पाहून तर पोलिसांची डोकीही गरगरायला लागली. हे ठिकाण होते भारतनगर चौक. या चौकातल्या एका अर्पाटमेंटमध्ये पोलिसांचा ताफा शिरला तेव्हा नऊ अल्पवयीन मुले चक्क हुक्क्याचा धूर हवेत उडवत होते. ही तीच मुले होती जी शाळेच्या नावावर घरून निघाली होती आणि त्यांच्या पालकांच्या लेखी ती शाळेत विद्यार्जन करीत होती. पॉकेटमनीच्या नावावर मिळणारा बक्कळ पैसा, या पैशांचे ही मुले करतात काय हे बघायलाही वेळ नसलेले व्यस्त पालक, सोशल मीडियावरून सातत्याने शेअर होणारा व्यसनांचा थरार आणि हा थरार आपल्याला अंधकाराकडे घेऊन जातोय हे अजिबातच कळू नये इतके कोवळे वय, अशा अनेक कारणांमुळे हुक्क्याची ही काजळी अनेकांचे बालपण काळवंडून टाकत आहे. नागपुरात अनेक हुक्का पार्लर बिनबोभाट सुरू आहेत आणि तेथे अल्पवयीन मुलामुलींच्या उड्या पडत आहेत. पण, हा समाज दूषित करणारा व्यवसाय थांबविण्याची जबाबदारी ज्यांच्या खांद्यावर आहे ते पोलीस आणि या पोलिसांना पगार देणारे सरकार दोघेही डोळयावर पट्टी बांधून बसले आहेत. मुंबईच्या कमला मिल आगीच्या घटनेनंतर ही पट्टी काही अंशी सैल झाली असेल आणि गुजरातच्या धर्तीवर महाराष्ट्रातही हुक्का पार्लरवर संपूर्ण बंदी आणण्याचा निर्णय राज्य सरकार घेईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. पण, ही अपेक्षाही फोल ठरली आहे. या हुक्क्यामुळे भारताच्या भावी नागरिकांचे आयुष्य असे काळवंडत असताना तिकडे पर्यावरणही धोक्यात आले आहे. हुक्क्यामुळे तयार होणारे रासायनिक द्रव्य फेकून दिल्याने नदी व नाल्यांमध्ये प्रदूषणाची मात्रा वाढत आहे. हे वास्तव समोर असतानाही सरकार मात्र महसुलाच्या आकड्यांची जोडतोड करण्यातच व्यस्त आहे. ही सरकारी मानसिकता एका रात्रीत बदलणार नाही. पालकांनीही ती बदलण्याची वाट पाहू नये. त्यांनी उभी केलेली संस्कारांची भिंत सक्षम असेल तर हुक्क्याचा धूर त्यांच्या मुलांपर्यंत पोहचूच शकणार नाही.
हुक्क्याची काजळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 04, 2018 12:39 AM