‘डॉल्बी’ आणखी किती जणांचा बळी घेणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:20 AM2018-02-21T05:20:55+5:302018-02-21T05:21:00+5:30

डॉल्बीमुक्त अन् गुलालमुक्त उत्सव साजरे व्हावेत यासाठी सर्वत्र आदर्शाची बीजे रोवली जात असताना जाणूनबुजून त्याला गालबोेट लावणे किंवा हटवादीपणापासून दूर जायला आपण तयार नाही

How many more will people take 'Dolby'? | ‘डॉल्बी’ आणखी किती जणांचा बळी घेणार

‘डॉल्बी’ आणखी किती जणांचा बळी घेणार

googlenewsNext

डॉल्बीमुक्त अन् गुलालमुक्त उत्सव साजरे व्हावेत यासाठी सर्वत्र आदर्शाची बीजे रोवली जात असताना जाणूनबुजून त्याला गालबोेट लावणे किंवा हटवादीपणापासून दूर जायला आपण तयार नाही. गुलालाची उधळण अन् डॉल्बीच्या तालावर बेधुंद थिरकणे यालाच आजची तरुणाई उत्सव समजू लागली आहे. आपण कुणासाठी आणि किती थिरकतो याचे भान राहात नसल्याने त्यातील दुष्परिणामाचा विचार करायलाही आपल्याला वेळ नाही. आपली मानसिकताही बोथट झाली आहे. गुलालाची उधळण कधीकधी धािर्मक तेढ निर्माण करण्यास कळीचा मुद्दा ठरल्याची उदाहरणे आहेत. असे असले तरी गुलालामुळे श्वसनाचे विकार व डोळ्याला इजा होतात ही गंभीर बाब समोर आली आहे.
डॉल्बी नावाचा धांगडधिंगा हा बेधुंद होण्यास अन् आपण किती उत्साही आहोत हे दाखविण्यासाठीचा केवळ केविलवाणा प्रयत्न आहे. धांगडधिंगा अन् टिपेला पोहोचलेला उत्साह जीवघेणाही ठरू शकतो हे वैद्यकशास्त्राने अनेकवेळा पटवून दिले आहे. मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे सोमवारी घडलेला प्रकार हे त्याचे ताजे उदाहरण आहे. मंगळवेढा तालुक्यातील भोसे येथे डॉल्बीसह निघालेल्या शिवजयंती मिरवणुकीत नाचणाºया अनिल ताटे या ३० वर्षीय तरुणाला अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्याचा प्राण गेला. त्यामुळे डॉल्बी आणि अतिउत्साह हा जीवाला घातकच आहे हे ध्यानात घेतले पाहिजे. डॉल्बीची कंपने ही हृदयास अपायकारक आहेत. झोपलेली बालके दचकून उठतात. विशेषत: ज्यांचा रक्तदाब अनियमित आहे अशांसाठी डॉल्बी घातक आहे, हे डॉक्टरांनी अनेक वेळा पोटतिडकीने सांगितले आहे. काही सामाजिक संघटनांनीही याबाबत जनजागृती केली आहे. एवढेच नव्हे तर मिरवणुकीत ‘डॉल्बीला फाटा’ हा संदेशही काही संघटनांनी प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. तरीही आपण डॉल्बीपासून दूर जायला तयार नाही आहोत. राज्यात डॉल्बीबर कायद्याने बंदी असली तरी केवळ कोल्हापूरवगळता कोणत्याही जिल्ह्याने हा विषय गांभीर्याने घेतला नाही.
उत्सवानंतर आवाजाची मर्यादा ओलांडल्याबद्दल पोलीस गुन्हे दाखल करतात अन् कारवाई सुरू होते. पण यांच्या डॉल्बीची अन् आवाजाची शिक्षा अवघे शहर अगोदरच भोगून बसलेले असते. डॉल्बीचा किती त्रास होतो हे हृदयरुग्णांंना किंवा वृध्दांना विचारले तर ते आपली व्यथा जरूर सांगतील. पण एकदा जीव गेल्यावर विचारणार कुणाला? सोलापूर हे उत्सवाचे शहर म्हणून अवघ्या राज्यात ख्यात आहे. सोलापुरात विविध जातीधर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहतात. इथे नेहमीच कोणत्या ना कोणत्या महापुरुषांची मिरवणूक ही निघत असते. काही मिरवणुका या डॉल्बीशिवाय निघतच नाहीत. मिरवणुकांमध्ये डॉल्बीचा वापर वाढू लागला आहे. डॉल्बी आणि मिरवणुका हा अवघ्या राज्याचा विषय असला तरी सोलापूरकरांनी तो गांभीर्याने घेण्याची गरज आहे. डॉल्बी हे वाद्य हृदयासाठी तर गुलाल हा श्वसनविकाराच्या दृष्टीने घातक असल्याने त्यावर कायमची बंदी आणण्यासाठी समाजप्रबोधन सुरू असताना आपण अजूनही गुलालाची उधळण आणि डॉल्बीच्या तालावरच थिरकताना कायदा वा सामाजहित पायदळी तुडवणार असाल तर ती आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे, असेच म्हणावे लागेल.
- बाळासाहेब बोचरे

Web Title: How many more will people take 'Dolby'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.