जिवंत माणूस ‘रिप्लेस’ कसा करणार?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 2, 2021 12:34 AM2021-01-02T00:34:36+5:302021-01-02T00:34:41+5:30
ख्यातनाम संतूरवादक पं. सतीश व्यास नुकतेच प्रतिष्ठित ‘तानसेन’ पुरस्काराने सन्मानित झाले. त्यांनी टिपलेल्या ‘अवघड काळाच्या नोंदीं’बाबत गप्पा..
ख्यातनाम संतूरवादक पं. सतीश व्यास नुकतेच प्रतिष्ठित ‘तानसेन’ पुरस्काराने सन्मानित झाले. त्यांनी टिपलेल्या ‘अवघड काळाच्या नोंदीं’बाबत गप्पा..
गेलं वर्ष कठीण होतं सगळ्यांसाठी. तुम्ही कसं निभावलंत हे अनपेक्षित संकट?
जगभरात काय चाललंय याकडं माझं लक्ष असतं, त्यामुळं एका नवीन विषाणूचं संकट पुढ्यात येऊन ठाकतं आहे याचा अंदाज मला आला होता. मार्चमध्ये आपल्याकडे लॉकडाऊननंतर महत्त्वाचा संगीत सोहळा रद्द झाल्यावर पहिला धक्का बसला. लॉकडाऊननंतर माझे सहकारी रजेवर गेले. सुदैवानं घर सांभाळायची सवय असल्यामुळं गोंधळ उडाला नाही; पण माझ्या मुख्य संगीताच्या कामावरून चित्त भरकटलेलं राहिलं, हे मात्र खरं.
हळूहळू नेमकेपणा आला, बेअरिंग मिळालं. सुरुवातीला कुणालाच काही अंदाज येत नसल्यामुळं खूप भीतीत नि संभ्रमात दिवस गेले; पण मी मे पासून राहत्या घरापासून काही मिनिटांवर असलेल्या म्युझिक रूममध्ये सकाळचे काही तास संगीतासाठी नियमित वेळ द्यायला लागलो. संध्याकाळी पुन्हा रियाझ. सतत कार्यक्रम नि बाकीच्या रेट्यात बरंच काही ऐकणं, त्यावर विचार करणं, जे येतं आहे त्याची उजळणी करणं राहून जातं. त्या अभ्यासासाठी वेळ मिळाला. मानसिक अस्वास्थ्याची स्थिती ताळ्यावर आली. मे मध्ये दुर्गा जसराजच्या कल्पनेतून आकाराला आलेल्या ‘उत्साह’ या माझ्या पहिल्या ऑनलाइन कार्यक्रमात संतूर वाजवलं. मग आसाम ट्रिब्यूनसाठी ऑगस्टमध्ये. नंतरही अशा अनेक ऑनलाइन मैफलीत सहभागी झालो. मात्र, त्यात रस वाटेना.
अलीकडेच अमेरिकेतील संयोजकांनी फिलाडेल्फियासाठी योजलेल्या कार्यक्रमाकरिता सादरीकरण केलं. तबलावादक विजय घाटेंनी स्टुडिओत बसून उत्तम तांत्रिक सोय सांभाळत पुण्यात रेकॉर्डिंग केलं. उस्ताद अली अकबर खाँ यांचे विद्यार्थी मुजुमदार यांनी 36 कलाकार घेऊन मुंबईत नोव्हेंबरमध्ये शूटिंग केलं. तिथं अक्षरश: मैफलीचं वातावरण त्यांनी तयार केलं होतं. मोजके श्रोतेही होते. त्यावेळी आणि आता तानसेन सन्मानाच्या वेळी ग्वाल्हेरमध्ये जित्याजागत्या श्रोत्यांच्या प्रतिसादानं खूप हुरूप आला. लाइव्ह मैफलीत वाजवायची संधी मिळाली, तेव्हा खरं सांगतो, जिवात जीव आल्यासारखं झालं मला! ऑनलाइन व्यासपीठावर खूप प्रयोगांची शक्यता असते, आहे हे मला मान्यच आहे; पण कुठलीही व्हर्च्युअल व्यासपीठं कितीही शक्तिशाली असली, तरी जिवंत माणसांना ती कशी रिप्लेस करू शकतील, नाही का?
...म्हणजे या ‘न्यू नॉर्मल’ प्रकाराला - ऑनलाइन सादरीकरणाला फारसे रुळला नाहीत का तुम्ही?
खरं सांगू, नाटकातील लोकांची हळहळ मला आता जास्त कळलीय. रंगमंचावर प्रवेश घेताना रसिकाच्या टाळ्यांनी जी नशा येते ती ऑनलाइनमध्ये कुठून आणणार? रागामधली चांगली जागा घेतली किंवा तिहाई घेऊन सुंदर समेवर आलो की जाणकार श्रोते उत्स्फूर्त दाद देतात, ती मजाच और. तिथून सकारात्मक ऊर्जा मिळते आणि स्वत:च्या कलेत नव्या जागा सापडतात. ऑनलाइन पर्याय तात्पुरता ठीक; पण कायमस्वरूपीचा म्हणून उमेद वाटत नाही.
एखाद्या संगीत महोत्सवात तुमच्या सादरीकरणाआधी चार- पाच कलाकार असतात, तुम्ही एखादा राग ठरवलेला असतो नि आधीचे काही तोच सादर करतात. त्यावेळी नियोजनानुसार नाही वाजवता येत. शास्त्रीय संगीतातील संकेत सांभाळून अमुक रागानंतर तमुक व्हावा याला प्रतिसाद देत तुम्हाला निर्णय घ्यावा लागतो. अशा सगळ्यावेळी तुम्ही समाज म्हणून, माणूस म्हणून दर टप्प्यावर प्रत्येकाशी कसे व किती सुसंवादी असता याचा कस लागतो. यासाठी मला माझ्या संख्याशास्त्र नि व्यवस्थापनशास्त्रातील शिक्षणाचा खूप उपयोग होतो. एक शिस्त अंगी बाणवली जाते.
ऑनलाइन कार्यक्रमांचा फायदा मी पुरता अमान्य करत नाही. ठराविक कलावंतच जनमानसात दिसत राहायचे. त्याला या कार्यक्रमांनी छेद दिला. बरेच नवे कलाकार समोर आले. सुरुवातीला प्रतिसादही मिळाला; पण नंतर या कार्यक्रमाचं अजीर्ण होऊ लागलं. कुणी मित्र आजकाल म्हणतो, ‘यार, अरे मैंने कितनी मेहनत से ‘इस’ ऑनलाइन कॉन्सर्ट का आयोजन किया था. काम कुछ बना नही.’ तेव्हा मी विचारतो, ‘तुमने कितनों का प्रोग्राम सिरिअस्ली देखा है?’ तो चाचरतो. हेच घडतं आहे सध्या! थेट आयोजित केलेल्या कार्यक्रमात श्रोते खास तिकीट काढून गंभीरपणे येऊन बसतात, कलाकारही एकाग्रपणे आपली कला सादर करतो. जाणकार रसिक नि कलावंत यांचं एक अव्यक्त नातं तयार होतं, सर्जनाला, समीक्षेला वाव असतो. ऑनलाइनच्या तांत्रिकतेत हे सगळं हरवतं हे मी अनुभवून सांगतो आहे.
या काळात संगीतामध्ये फ्यूजनच्या प्रयोगांना अधिक गती मिळाली. विविध गायन-वादन प्रकार एकत्र आले. तुम्ही या मिश्रणात रमता का?
मी भारतीय संगीत परंपरेचा अनुयायी आहे. संतूरकडेच माझा ओढा होता तरी त्यापूर्वी वडिलांकडे मी गायकीचे मूलभूत धडे गिरवले आहेत. मी जे फ्यूजन केलं ते हेतूपूर्वक नव्हे, अपघातानं. टाइम्स म्युझिककडून आलेल्या ‘शाश्वत’ नावाच्या थिमॅटिक अल्बमसाठी इतर अनेक वाद्यांसह ‘होमवर्ड जर्नी’ नावाचा ट्रॅक मी वाजवला होता, तो अचानक ऑस्लोच्या भारतीय हॉटेलात गेल्यावर ऐकला तेव्हा खुश झालो होते. संतूरसारख्या वाद्यातून रागाचा भाव व्यक्त करत त्याचं स्वरूप कसं साकारायचं याचा बाज आम्हाला गुरू शिवजींनी दिला. माझ्या करिअरच्या सुरुवातीच्या काळात आलेल्या अल्बमसाठी शिवजींनी हस्तलिखित नोट दिली होती, ती त्या सीडीबरोबर मिळते. “रागभाव व्यक्त करण्यासाठी संतूर हे सगळ्यात कठीण वाद्य आहे. सतीशनं अतिशय कौशल्यानं ते यशस्वी करून दाखवलं याचा मला आनंद आहे.” असं ते म्हणाले. नवा प्रयोग करताना आपला अभ्यास खुलला पाहिजे, तर खरं!
...पूर्ण शिस्त नि ‘होमवर्क’ असेेल तर असे प्रयोग करता येतात. मात्र, मूलभूत अभ्यासाशिवाय ती जादू गवसत नाही.
कोविडबाबतीतही मला नेमकं हेच वाटतं. शास्त्रीय संगीतात फ्यूजन करताना सर्वांना मिळून समन्वयाची एक शिस्त पाळावी लागते. कोविडनेही आपल्याला हेच तर शिकवलं आहे! समन्वयाची शिस्त पाळून नव्यानं सगळं सुरू करता येईल. ‘चलता है!’ अॅटिट्यूड नाही ठेवला तर जगण्याचं हे नवं आणि अपरिहार्य फ्यूजन आपल्याला सहज जमून जाईल.
मुलाखत : सोनाली नवांगूळ