मनुष्यधर्माचा विसर... माणसे मारायची यात कोणती संवेदनशीलता वा अनुकंपेची भावना असते?
By ऑनलाइन लोकमत | Published: May 17, 2019 05:32 AM2019-05-17T05:32:57+5:302019-05-17T05:34:29+5:30
अमेरिकेच्या ट्रम्पला त्यांच्या देशात नव्याने येणारे मेक्सिकन नकोत आणि आधी आलेले मेक्सिकनही देशाबाहेर घालवायचे आहे.
माणसे आपली भूमी वा देश सहजासहजी सोडायला तयार होत नाहीत. पण आपला देश वा भूमी आपल्याला न्याय देत नसेल वा जगवायलाच अकार्यक्षम असेल तर माणसांनी काय करायचे असते? कोरड्या व निपजाऊ जमिनी आणि रोजगार न देणारे देश त्यांनी सोडायचे की देशभक्तीच्या नावाने त्यातच पाय घासून मरायचे? त्यातून आपले समाज दिवसेंदिवस जास्तीचे एकारलेले धर्मांध, जात्यंध व वर्णांध होत असतील आणि त्यातील बहुसंख्यांक लोक अल्पसंख्याकांना देशाबाहेर घालवायला तयार झाले असतील तर दुबळ्या वर्गाने कुठे जायचे असते? म. गांधी म्हणत शक्तिशाली वर्गाने, देशाने, सरकारने व राजकारणाने नेहमी दुबळ्यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. परंतु आताचे जगभराचे राज्यकर्ते या शिकवणीच्या नेमके उलट वागत आहेत आणि त्यात पूर्व-पश्चिम असा भेद करण्यातही अर्थ उरला नाही.
अमेरिकेच्या ट्रम्पला त्यांच्या देशात नव्याने येणारे मेक्सिकन नकोत आणि आधी आलेले मेक्सिकनही देशाबाहेर घालवायचे आहे. त्यांची झळ लागली तर ते अमेरिकेत आलेल्या चिनी, भारतीय, पाकिस्तानी व इतर देशातील विद्यार्थी व नोकरदारांनाही हाकलतील व त्यांच्या जागा स्वदेशी लोकांना देतील. वर त्याचे समर्थन ते ‘भूमिपुत्रांचे हक्क’ म्हणूनही करू शकतील. फ्रान्स, जर्मनी, कॅनडा या देशांतही आता कृष्णवर्णीय नागरिकांना देशाबाहेर घालविण्याची चळवळ सुरू झाली आहे. तेथील हिंसाचार व हाणामाऱ्यांमध्ये मुख्य कारणही तेच आहे. इकडे म्यानमारच्या बौद्धांना रोहिंगे घालवायचे किंवा मारायचे आहेत.
याआधी श्रीलंकेच्या सिंहली बहुसंख्येने तेथील तामीळ अल्पसंख्याकांविरुद्ध हेच केले. सगळ्या दक्षिण मध्य आशियात शिया विरुद्ध सुन्नी किंवा कडवे विरुद्ध उदारमतवादी यांच्यात सुरू असलेली युद्धे याच पातळीवर आली आहेत. भारतातील अरुणाचल व आसामात फार पूर्वी आलेल्या अल्पसंख्य मुस्लिमांना देशाबाहेर घालविण्याची प्रतिज्ञाच अमित शहा यांनी केली आहे. मुंबईत हिंदी भाषिक नकोत, बिहारी नकोत, दक्षिण भारतीय नकोत या चळवळी होऊन गेल्या. त्या संपल्या मात्र नाहीत. भूमिपुत्रांना न्याय ही बाब खरी आहे. मात्र, माणुसकीला न्याय ही त्याहून मोठी व श्रेष्ठ बाब आहे. देश म्हणजे सर्वसमावेशकता असे जे म्हटले जाते ते सा-या जगाबाबतही खरे आहे. यातला मुख्य प्रश्न घालवून दिलेल्या दरिद्री व उपाशी स्त्री-पुरुषांनी जायचे कुठे हा आहे.
संयुक्त राष्ट्र संघटनेने त्यासाठी उभारलेल्या निर्वासितांच्या छावण्या भरल्या आहेत. त्यात प्राथमिक सोयीही नाहीत, अन्न अपुरे व पाण्याचा अभाव आहे. स्वदेश आश्रय देत नाही आणि विदेश जागा देत नाही, अशा या मोठ्या जनसंख्येच्या विश्वात आपल्याकडील फूटपाथवर जगणाऱ्यांचे जीणे असे आहे. निर्वासितांच्या अशा छावण्यांची जी चित्रे दूरचित्रवाहिन्यांवर दाखविली जातात ती अंत:करणाचा ठाव घेणारी आहेत. रस्त्यात, समुद्राकाठी व जंगलात मरून पडलेली मुले एकविसाव्या जगाला पाहावी लागणे हा काळाचा विकास दाखविणारा प्रकार नसून माणुसकीचा -हास दाखविणारे वास्तव आहे. समृद्धी व संपत्ती असणारे देशही असे वागत असतील आणि ‘माणूस’ या प्राण्याला अन्नपाण्यावाचून तडफडत मरायला लावीत असतील तर दरिद्री देशांनी काय करायचे असते? त्यातून ज्यांना हाकलायचे त्यांनी, या संपन्नांची व समृद्ध वर्गांची वर्षानुवर्षे सेवा केली असते.
अमेरिकेची समृद्धी कृष्णवर्णीय गुलामांच्या श्रमातून आली आहे. फ्रान्स व युरोपही आशिया व आफ्रिका खंडावर वसाहतवाद लादून श्रीमंत झाला आहे. ज्यांनी समृद्धी दिली व ज्यांनी ख-या अर्थाने समाजाला श्रीमंती दिली त्यांच्याबाबत समाज असे अमानुष वागत असतील तर तो साधा कृतघ्नपणा नाही, ते माणुसकीचे विस्मरण आहे. बुद्ध, येशू, महावीर, गांधी, लिंकन यांच्या शिकवणीकडे आपण पाठ फिरविली असल्याचे सांगणारे हे चित्र आहे आणि ते जागतिक आहे. जनावरे पोसायची आणि पाळायची आणि माणसे मारायची यात कोणती संवेदनशीलता वा अनुकंपेची भावना असते? माणसांविषयीचा दुष्टावा हा समाजाच्या सुसंस्कृत होण्याचे लक्षण बनला काय? की त्या सा-या चांगल्या प्रवृतींशी आपण आपले नातेच तोडून घेतले आहेत?