Hyderabad Encounter: म्हातारी मेल्याचे दु:ख नाही...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 7, 2019 03:10 AM2019-12-07T03:10:24+5:302019-12-07T03:10:35+5:30
अशा मंडळींची सुटका होताच कामा नये, अशीच देशभरातील सुजाण नागरिकांची भावना आहे.
हैदराबादच्या बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी पोलिसांशी झालेल्या चकमकीमध्ये ठार झाल्याचे वृत्त येताच देशभर अनेकांनी आनंद व्यक्त केला आहे. हैदराबाद, तेलंगणासह देशात अनेक ठिकाणी मिठाई वाटण्यात आली, पोलिसांवर फुलेही उधळण्यात आली. बलात्कारातील आरोपींना अशीच शिक्षा व्हायला हवी, असे अनेकांनी बोलून दखविले आहे. त्यात संसदेचे अनेक सदस्य म्हणजेच कायदे तयार करणारेही आहेत. बलात्कारातील दोषींना याच स्वरूपाची शिक्षा व्हायला हवी, याबाबत दुमत असण्याचे कारणच नाही. कोणत्याही महिलेवर जबरदस्ती करणे, तिचा विनयभंग करणे वा बलात्कार करणे हे अत्यंत घृणास्पदच कृत्य आहे.
अशा मंडळींची सुटका होताच कामा नये, अशीच देशभरातील सुजाण नागरिकांची भावना आहे. त्यामुळेच या चार जणांना पोलिसांनी ठार मारले, याचे कोणालाच दु:ख झालेले नाही आणि होणारही नाही. आतापर्यंत अनेकदा बलात्कारातील आरोपी पुराव्याअभावी सुटले आहेत, पोलीस तपास नीट न झाल्याने आरोपींना कमी शिक्षा झाल्याचेही प्रकार आहेत. शिवाय न्यायालयात प्रकरणे अनेक वर्षे चालत राहतात. त्यामुळे आरोपींना जामीन मिळतो आणि बाहेर आलेले आरोपी त्या महिलेला, तिच्या नातेवाइकांना धमक्या देतात. उनाव बलात्कारपीडितेला आरोपींनी पेटवून दिल्याचा प्रकार कालचाच आहे. या प्रकारांमुळे जनक्षोभ उसळतो आणि आरोपींना भर चौकात वा रस्त्यांवर आणून ठार करा, अशी मागणी येते. खासदार जया बच्चन यांनीही राज्यसभेत अशीच मागणी केली. त्यातून बलात्काऱ्यांविषयी लोकांत किती संताप आहे, हेच दिसते.
हे खरे असले तरी आरोप सिद्ध होण्याआधीच संशयितांना गोळ्या घालून पोलीस ठार मारत असतील, तर ते योग्य आहे का? याचाही विचार सुज्ञपणे करायला हवा. या चारही संशयितांनी त्या तरुणीवर बलात्कार केला असला तरी तो आरोप सिद्ध होण्याआधी त्यांना ठार केले, ही वस्तुस्थिती आहे. अशा चकमकी खºया असतात का, हाही प्रश्न आहे. मुंबईत एके काळी नेहमी चकमकी होत. त्याच्या बातम्याही ठरावीक प्रकारच्या असत. आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला म्हणून वा त्यांनी हल्ला केल्याने पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात अमुक गुन्हेगार मेला, त्याचा एक सहकारी अंधाराचा फायदा घेऊ न पळून गेला, अशा त्या बातम्या असायच्या. हैदराबाद प्रकरणातही पोलिसांनी याच प्रकारे चकमक झाल्याचे आणि त्यात चारही आरोपी मेल्याचे म्हटले आहे. देशातील न्यायालयांनी अनेक पोलीस चकमकींविषयी शंका घेतल्या आहेत. काही प्रकरणांत पोलिसांना शिक्षाही झाली आहे.
त्यामुळे मुंबईतील चकमकी पूर्णत: बंद झाल्या आहेत. मात्र अनेक एन्काउंटर स्पेशालिस्ट तुरुंगात गेले, तर काहींचे गुन्हेगारांशी संबंध असल्याचे सिद्ध झाले होते. त्यामुळे पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था सांभाळायची असली तरी आरोपी वा गुन्हेगारांना ठार करण्याचा अधिकार त्यांना असावा का, याचाही अतिशय शांतपणे विचार करायला हवा. हैदराबाद प्रकरणीही काहींनी नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्याबद्दल मानवाधिकार आयोग, महिला आयोग तसेच अनेक कायदेतज्ज्ञ यांनी तेलंगणा सरकार व पोलिसांकडून अहवाल मागविला आहे.
खरेतर, बलात्काराच्या प्रकरणांचा लवकर निकाल लागावा, पीडितेला न्याय मिळावा आणि आरोपींना लगेच शिक्षा व्हावी, यादृष्टीने कायद्यात काही दुरुस्त्या व्हायला हव्यात. निर्भया प्रकरणातील दोषींची फाशीला माफी देण्याची विनंती राष्ट्रपतींनी फेटाळून लावतील असे दिसते. तशी शिफारस गृह मंत्रालयाने केली आहे. त्या फाशींमध्ये विलंब झाल्याबद्दल संताप व्यक्त करणाºया निर्भयाच्या पालकांनी हैदराबादच्या चौघांना ठार केल्याबद्दल समाधान व्यक्त केले आहे. संशयितांना ठार केल्याने हैदराबादमधील युवतींच्या कुटुंबीयांनाही न्याय मिळाला, असेच वाटत आहे. त्यांचे म्हणणे समजण्यासारखे आहे. पण याला न्याय म्हणायचे का? म्हातारी मेल्याचे दु:ख नाही, पण काळ सोकावण्याची भीती लक्षात ठेवायला हवी