‘माझा आपल्या न्यायबुद्धीवर विश्वास आहे’
By admin | Published: July 4, 2016 05:36 AM2016-07-04T05:36:25+5:302016-07-04T05:36:25+5:30
यवतमाळ पब्लिक स्कूल या शाळेत ज्या दोन नराधमांनी तेथील अल्पवयीन मुलींशी अतिप्रसंग केला त्यांना शाळेच्या व्यवस्थापनाने तात्काळ बडतर्फ केले.
माझ्या यवतमाळच्या बंधूभगिनींनो,
यवतमाळ पब्लिक स्कूल या शाळेत ज्या दोन नराधमांनी तेथील अल्पवयीन मुलींशी अतिप्रसंग केला त्यांना शाळेच्या व्यवस्थापनाने तात्काळ बडतर्फ केले. त्यासंबंधीची माहितीही पूर्ण हाती येताच पोलिसांना कळविण्यात आली. सरकार, पोलीस यंत्रणा व शिक्षण संस्था, मुख्यमंत्री, पालकमंत्री, खासदार, आमदार व केंद्रीय मंत्री या साऱ्यांनीच या घटनेची गंभीर दखल घेतली. ती तशी घेतली जावी यासाठी मी स्वत: संस्थेच्या इतर संचालकांसह सक्रिय होतो. ही घटना जेवढी घृणास्पद, निंदनीय तेवढीच शिक्षेला पात्र आहे याविषयी आपल्याएवढाच माझ्याही मनात संशय नाही. या अपराधाचा पाठपुरावा आपल्यासोबत मीही केला आहे व यापुढेही तो करीत राहणार आहे. ज्या मुलींवर तो प्रसंग गुदरला त्या मलाही माझ्या मुलीसारख्याच, पूर्वासारख्याच आहेत. एका पित्याच्या मनात अशा घृणित बाबीवर पांघरूण घालण्याचा विचार कसा येईल? (या प्रकरणातील आरोपी त्या संस्थेचे कर्मचारी आहेत ही बाब आम्हाला त्यांच्या अपराधांशी जोडणारी असेल तर यापुढे देशातील साऱ्याच संस्थांना नोकरभरती करणे अडचणीचे ठरणार आहे हे आपण लक्षात घेणे गरजेचे आहे असे मला वाटते.)
आपला माझ्यावर राग असण्याची कारणे वेगळी असतील (व ती तशी आहेत हे मी गृहित धरतो) तर त्याचे निराकरण मी आपल्याजवळ मोकळेपणाने करीन. मी दीर्घकाळ सार्वजनिक जीवनात आहे. त्यातील १८ वर्षे मी राज्यसभेत काढली. त्याहूनही अधिक काळ मी लोकमत या माझ्या वडिलांनी स्थापन केलेल्या वृत्तपत्रात घालविला. आज मी या वृत्तपत्र समूहाचा अध्यक्ष आहे. राजकारण आणि वृत्तकारण ही दोन्ही क्षेत्रे जेवढी माणसे जोडणारी तेवढीच माणसांना नाराज करणारीही आहेत. राजकारणात एका पक्षाला साथ दिली वा त्याचे सदस्यत्व स्वीकारले की बाकीचे पक्ष व त्यांचे पुढारी आपल्याकडे शत्रूभावनेने पाहू लागतात. (एकेकाळी ही स्थिती एवढी कडवी नव्हती. आता मात्र राजकीय शत्रुत्वाला विषाची किनार आली आहे) मात्र याही स्थितीत मी काँग्रेसएवढेच अन्य पक्षांतील नेत्यांशी व कार्यकर्त्यांशी आत्मीयतेचे संबंध ठेवले. एवढी वर्षे मला त्या साऱ्यांशी आपलेपणाने बोलता-वागता आले व त्यांनीही तसाच विश्वास माझ्याबाबत राखला. थेट वाजपेयी आणि अडवाणींपासून बाळासाहेब ठाकरे यांच्यापर्यंत आणि सीताराम येचुरींपासून ममता बॅनर्जींपर्यंतचे सारे नेते मला आपले मानत आले. नितीशजी आणि लालूप्रसाद ही माणसे मला घरच्यासारखी आहेत आणि पवारांशीही माझे संबंध आत्मीयतेचे आहेत. काँग्रेस हा तर माझाच पक्ष आहे. तरीही राजकारणात विरोध गृहित असतो. त्यात विरोधक निर्माण करावे लागत नाहीत. ते त्यात असतातच. त्यामुळे प्रसंगविशेषी वा एखाद्या प्रश्नाखातर टीका करणे हे राजकारणाचेच काम ठरते. त्यातून अनेकांचा व त्यांच्या अनुयायी-स्नेह्यांचा राग ओढवून घ्यावा लागतो.
वृत्तपत्राचे क्षेत्रही तसेच आहे. त्यात एखाद्याला चांगले म्हटले तरी दुसरे नाराज होतात. वाईट म्हटले की हा नाराज होतो. काहीच म्हटले नाही तर वृत्तपत्राविषयीच लोकांच्या मनात संशय उत्पन्न होतो. याही अडचणीत लोकमत वाढले आणि जनतेच्या विश्वासाला पात्र होत मराठीतील पहिल्या क्रमांकाचे अग्रणी दैनिक बनले. लोकमतच्या या यशामागे यवतमाळकर जनतेचा पाठिंबा व आशीर्वाद यांचा वाटा मोठा आहे व तो मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी सदैव शिरोधार्य मानला आहे.
माझी खासदारकी आणि लोकमत हे वृत्तपत्र यांचा सर्वाधिक उपयोग मी यवतमाळकरांच्या व विदर्भातील जनतेच्या सेवेसाठी केला. माझ्या वडिलांनी व मी यवतमाळात शिक्षण संस्था उघडल्या आणि त्या नावारुपाला आणल्या. शासकीय संस्थांना लोकाभिमुख राखण्यासाठी प्रयत्न केले. विमानतळासारख्या सोयी येथे आणल्या. येथील मुलामुलींना पायलट वा एअर होस्टेस होता यावे यासाठीचे माझे प्रयत्न अद्याप सुरू आहेत. यवतमाळ हे शहर रेल्वेने देशाला जोडले जावे यासाठीचे माझे प्रयत्नही साऱ्यांना ठाऊक आहेत. येथील विद्यार्थी-विद्यार्थिनींना मी जमेल तेवढे साहाय्य केले व आजही करतो. खासदार व संपादक असल्याने आणि वडिलांची पुण्याई पाठिशी असल्यानेच मला हे करता आले. यातील कोणत्याही सेवाभावी कार्याचा मी व्यक्तिगत लाभासाठी वापर केला नाही हेही मला येथे नोंदविले पाहिजे. यवतमाळच्या जनतेने या कामाची नेहमी जाण ठेवली हे मी कृतज्ञतापूर्वक नमूद करतो.
मी ज्या संस्था व संघटना काढल्या त्यात आज पाच हजारांवर माणसे काम करीत आहेत. त्यात महिलांची संख्या फार मोठी आहे. त्या शिक्षण संस्थांत आहेत, वृत्तपत्रांत आहेत आणि इतरही व्यावसायिक क्षेत्रांत सन्मानाने आपली कामे करीत आहेत. या कामाचा विस्तार आता विदर्भाएवढाच मराठवाडा, प. महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, दक्षिण महाराष्ट्र आणि गोवा या प्रदेशात झाला आहे. या सर्व जागी असलेल्या वृत्तव्यवसायाच्या केंद्रात महिलांचा सहभाग मोठा आहे.
महिलांना यथोचित न्याय मिळावा या हेतूने मी व माझी पत्नी सौ. ज्योत्स्ना हिने लोकमतच्या जोडीने सखी मंच या नावाची महिलांच्या सबलीकरणासाठी प्रयत्न करणारी तीन लक्ष सदस्य असलेली संस्था उभी केली. तथापि, गेल्या ४०-५० वर्षांत माझ्या संस्थांमध्ये काम करणाऱ्या कुुणा महिलेने वा तिच्या नातेवाईकाने तिचा छळ झाल्याची वा तिला त्रास दिला जात असल्याची तक्रार केली नाही किंवा तसे काही माझ्या वा माझ्या वरिष्ठ सहकाऱ्यांच्या नजरेला कुणी आणून दिले नाही. एवढा सारा काळ अशा आरोपांपासून दूर व मुक्त राहिलेल्या माझ्या कुटुंबाला कोणा अमोल क्षीरसागर व यश बुरुंदिया या सारख्या अपराधी वृत्तीच्या माणसांसाठी वेठीला धरले जाण्याचा प्रकार माझ्या सार्वजनिक जीवनावर मोठा आघात करणारा आहे. माझे व्यक्तिगत जीवनही त्यामुळे उन्मळल्यागत झाले आहे.
राजकारणात व विशेषत: विषाक्त राजकारणात एक स्थिती अशी येते की काही माणसांना एखादा माणूस समाजकारणातच नकोसा होतो. ही माणसे मग कोणत्याही थराला जातात. त्यासाठी संबंधिताविरुद्ध कसेही रान उठवतात... माझे राजकीय, सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील काम नेहमीच साऱ्यांसमोर अग्रक्रमाने राहिले असल्याने मला अशा रोषाचे केंद्र बनविणे काहींना जमणारेही आहे. जी माणसे व कुटुंबे दीर्घकाळ राजकारणात आणि सार्वजनिक जीवनात असतात त्यांना जवळच्यांएवढेच दूर असणारेही आपोआपच लाभत असतात. माझे कुटुंब गेली पाऊणशे वर्षे या क्षेत्रात आहे. आमच्याही वाट्याला असे जवळचे व दूरचे बरेच जण आले आहेत. त्यांच्यातील कुणालाही आमच्याकडून जराही त्रास झाला नसला तरी त्यांचे दूर असणे शक्य असते याची जाणीव मला एवढ्या वर्षांच्या सार्वजनिक आयुष्याने मिळवून दिली आहे. या आयुष्यातील अपयशाएवढेच यशही बलिदान मागत असते ही बाबही मला चांगली ठाऊक आहे. यवतमाळ पब्लिक स्कूलची स्थापना केली. परवा या संस्थेत जे घडले त्याचा माझ्याशी व माझ्या कुटुंबाशी दुरान्वयानेही संबंध नाही. मात्र तो तसा आहेच असे आपल्यातील ज्यांना मनापासून वाटत असेल तर त्याचे योग्य ते प्रायश्चित्त मी घेईनही.
माझा आपल्या न्यायबुद्धीवर पूर्ण विश्वास आहे.
-विजय दर्डा