डॉ. रामचंद्र देखणे|
भारताला संगीत आणि कलेची महान परंपरा लाभली आहे. ही परंपरा वेदांइतकी प्राचीन आहे. संगीताचा प्रथम अविष्कार सामवेदातून प्रकटला. गीतेमध्ये विभूतीयोग सांगताना म्हटले आहे की,वेदांना सामवेदोस्मि। मी वेदांमधील सामवेद आहे. सामवेदाने गायनाने परमात्म्याला जाणले आहे. संगीत हे ईश्वराने माणसाला दिलेले सर्वात मोठे दान आहे तर हिंदुस्थानी संगीत हे भारताने जगाला दिलेले वरदान आहे. हिंदुस्थानचे भाग्य असे की, इथेच अरूपाला रूप देणारे शिल्पकारही आहेत आणि स्वरांना बोलते करणारे संगीतकारही. संगीत श्री श्रेष्ठदर्जाची श्रवणविद्या आहे. प्रत्येक क्रियेत किंवा उपासनेमध्ये साध्य आणि साधन अशा दोन बाबी असतात. साधन हे खडतर असते तर साध्य हे आनंददायी असते.संगीत प्रकारात साधन आणि साध्य हे दोघेही आनंददायी आणि दोघेही एकरूप आहेत. संगीतातील ‘सम’ आणि ‘गीत’ हे दोन शब्द दोन प्रकाराच्या माधुर्यांचे प्रकटीकरण करतात. सम हा शब्द गायनातील श्रुतीमाधुर्य तर गीत हा नादमाधुर्य प्रकट करतो. संगीताचे सामर्थ्य काय आहे? पुल देशपांडे यांनी आकाशवाणीवर पंडित भीमसेन जोशी यांची मुलाखत घेतली होती. त्यात त्यांनी म्हटले आहे की, पंडित भीमसेन जोशी यांची पहिली बैठक पुलंच्याच घरी झाली. त्यांनी त्यावेळी मियामल्हार राग गायिला आणि खरोखरीच बाहेर धो धो पाऊस सुरू झाला.असे म्हटले जाते की, तानसेनच्या गाण्याने दिवे लागत. तानसेनची कथा खरी आहे याची प्रचिती आली. यातला महत्त्त्वाचा भाग असा की, संगीतातले रागही निसर्गाच्या मनोधर्माशी जोडले गेले आहे. त्या त्या वेळेला आणि समयाला समुचित अशी स्वरांची मांडणी त्यात आहे. म्हणूनच मानवी मनाचे सगळे भाव रागातून प्रकटतात. राग हे मानवी मान व्यक्त करणारे सांगितिक सत्य आहे. इथे स्वरातही ओंकार भेटतो आणि स्वरातला ओंकार अनुभूतीला उतरतो. पं. भीमसेन जोशी यांचे जानेवारी २०११ मध्ये दु:खद निधन झाले. त्या वेळी प्रसिद्ध कवी विंदा करंदीकरांनी त्यांच्यावर कविता लिहिली.अमृताचे डोही बुडविले तुम्ही।बुडताना आम्ही धन्य झालो।मी पण संपले झालो विश्वाकार।स्वरात ओंकार भेटला गा।।