प्रणवदांचा संघवर्गात दिसला वैचारिक ठामपणा

By विजय दर्डा | Published: June 11, 2018 12:29 AM2018-06-11T00:29:35+5:302018-06-11T00:29:35+5:30

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात सन्मान्य अतिथी म्हणून उपस्थित राहून भाषण देण्याचे निमंत्रण स्वीकारण्यावरून माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यावेळी या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया न देता मुखर्जी फक्त एवढेच म्हणाले होते की, मला जे काही सांगायचे आहे ते मी नागपूरमध्ये सांगेन.

Ideological solidarity in Pranab Mukherjee's speech at RSS event | प्रणवदांचा संघवर्गात दिसला वैचारिक ठामपणा

प्रणवदांचा संघवर्गात दिसला वैचारिक ठामपणा

Next

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघशिक्षा वर्गाच्या समारोप कार्यक्रमात सन्मान्य अतिथी म्हणून उपस्थित राहून भाषण देण्याचे निमंत्रण स्वीकारण्यावरून माजी राष्ट्रपती डॉ. प्रणव मुखर्जी यांच्यावर जोरदार टीका झाली. त्यावेळी या टीकेवर कोणतीही प्रतिक्रिया न देता मुखर्जी फक्त एवढेच म्हणाले होते की, मला जे काही सांगायचे आहे ते मी नागपूरमध्ये सांगेन. विशेष म्हणजे नागपूरच्या या भाषणात या वादाचा उल्लेखही न करता त्यांनी टीकाकारांना उत्तर दिले. प्रणव मुखर्जी यांनी आपली मते स्पष्टपणे मांडली व त्यांना जे सत्य वाटते ते बोलून दाखविले. सहिष्णुता हीच आपली खरी ओळख आहे आणि भेदभाव व असूयेने वागलो तर भारताची खरी ओळख संकटात येईल, हे सत्य आपण चांगलेच जाणतो. परंतु संघाच्या व्यासपीठावर उभे राहून या गोष्टी खंबीरपणे मांडण्याचे धाडस प्रणवदांसारखी प्रखर बुद्धिमान व्यक्तीच दाखवू शकली असती व त्यांनी ते दाखविलेही.
मुळात प्रणव मुखर्जी संघाच्या कार्यक्रमाला गेलेच कशाला? बरं, गेले तर तेथे संघ संस्थापक हेडगेवार गुरुजींना त्यांनी देश्भक्त म्हणण्याची काय गरज होती?, असे प्रश्न मनात ठेवून धर्मनिरपेक्षतेवर विश्वास असणाऱ्याची नाराजी अजूनही दूर झाली नसेल. काँग्रेसमधील अनेकांनी हे प्रश्न उपस्थित केले. अहमद पटेल यांनीही हा मुद्दा मांडला. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांच्यासह इतर काही जणांना महात्मा गांधींच्या रक्ताचे डाग ज्या संघटनेवर पडले आहेत तेथे प्रणवदांनी जाणेच मुळात अनाकलनीय वाटते. असो. हा दृष्टिकोनाचा भाग आहे आणि व्यक्तिगणिक मते वेगळी असू शकतात. प्रणव मुखर्जी देशातील प्रतिष्ठित राजकीय नेते आहेत. त्यांना सार्वजनिक जीवनाचा दांडगा अनुभव आहे. त्यामुळे त्यांनी कोणताही विचार न करता हा निर्णय नक्कीच घेतला नसणार.
प्रणवदांना मी अगदी जवळून ओळखतो. त्यांना जे योग्य वाटते तेच ते बोलतात. यासंबंधात मी तुम्हाला एक घटना सांगू इच्छितो. अटलबिहारी वाजपेयी पंतप्रधान होते तेव्हाचा हा प्रसंग आहे. वाजपेयी सभागृहात कोणत्या तरी विषयावर बोलत होते. मीही त्यावेळी सभागृहात हजर होतो. अचानक प्रणव मुखर्जी जागेवरून उठून वाजपेयी यांच्याजवळ गेले. विरोधी बाकांवरून उत्साहाने आरडाओरड सुरू झाली. प्रणवदांनी हातानेच गोंधळ थांबविण्याची खूण केली. त्यांनी हलक्या आवाजात वाजपेयी यांच्या कानात काही तरी सांगितले. त्यानंतर अटलजींनी त्यांचे भाषण थांबविले व आपले विधान आपण मागे घेत आहोत, यावर आपण उद्या बोलू, असे त्यांनी सांगितले. खरं तर अटलजी ज्या विषयावर बोलत होते त्यासंबंधी त्यांना योग्य माहिती देण्यात आली नव्हती. त्या चुकीच्या माहितीच्या आधारे अटलजींना बोलू द्यायला हवे होते म्हणजे दुसºया दिवशी त्यावरून सभागृहात त्यांना अडचणीत आणता आले असते, असे काँग्रेसमधील अनेकांचे मत होते. प्रणवदांचे मात्र म्हणणे होते की, काहीही झाले तरी पंतप्रधानांकडून चुकीचे कथन केले जाता कामा नये. यावरून सोनिया गांधींनी प्रणव मुखर्जींना बोलावले तेव्हाही काँग्रेसवाल्यांना वाटले की त्या नाराज होतील. पण झाले नेमके उलटे. सोनियाजींनी प्रणवदांची प्रशंसा केली. एकदा काँग्रेसच्या अधिवेशनात इंदिराजी बोलत असतानाही प्रणवदांनी त्या जे सांगत आहेत तसे नाही तर असे आहे, हे हळूच त्यांच्या कानात सांगितले होते. तर असे आहेत प्रणव मुखर्जी, अगदी स्पष्ट वक्ते.
संघाच्या कार्यक्रमात प्रणवदांनी जाण्याच्या बाबतीत मला असे वाटते की, संघाहून विपरीत विचारधारेच्या लोकांनी अशी मिळणारी एकही संधी दवडता कामा नये. संघाच्या व्यासपीठावर जाऊनच आपली मते ठामपणे सांगितली पाहिजेत. प्रत्येक संघटनेची एक वैचारिक बैठक असते, तात्विक विचार असतो. डाव्या पक्षांची स्वत:ची एक विचारसरणी आहे. उजव्यांहून ती पार भिन्न आहे. डाव्यांमध्येही वैचारिक मतभेद आहेत. मला वाटते की, विचारांमध्ये लवचिकता असायला हवी. कठोरता असेल तर संवाद होण्याऐवजी संबंध तुटण्याची भीती असते. तुटले की सगळेच संपले. याचे उदाहरण आपल्यासमोर आहे. आज चीन बदलला, रशिया बदलली, पण भारतामधील कम्युनिस्ट बदलण्यास तयार नाहीत. भारतातील कम्युनिस्टांनीही काळानुरूप बदल स्वीकारले असते तर आज झाली तशी त्यांची दुर्दशा झाली नसती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघही या बदलण्याच्या प्रक्रियेपासून अलिप्त नाही, असे मला वाटते. अर्थात सरसंघचालक मोहन भागवत यांचा हा बदलाचा पवित्रा संघातील कट्टर लोकांच्या कितपत पचनी पडेल, हे मात्र लगेच सांगता येणार नाही. देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात संघाची भूमिका नेमकी काय होती आणि त्यांच्या कट्टर विचारांचे काय दुष्परिणाम झाले, यावर वाद होऊ शकतो. परंतु संघही हिंदुस्तानवर प्रेम करतो, पाकिस्तानवर नाही, हे प्रणवदांचे म्हणणे अगदी खरेच आहे.
...आणि धर्म आणि संप्रदायाच्या बाबतीत संघाच्या विचारांविषयी बोलायचे तर त्याला प्रणव मुखर्जींनी संघाच्याच व्यासपीठावरून स्पष्टपणे उत्तर दिले आहे. या देशात राहणारी प्रत्येक संप्रदायाची, प्रत्येक जातीची व्यक्ती ही भारताची ओळख आहे. केवळ एकाच धर्माच्या प्रभुत्वाचा विचारही केला जाऊ शकत नाही. प्रत्येक धर्माच्या, प्रत्येक संप्रदायाच्या, प्रत्येक जातीच्या, प्रत्येक भाषा व बोलीभाषेच्या तसेच प्रत्येक प्रांताच्या लोकांचा सन्मान हेच भारताचे खरे सौंदर्य आहे. परस्परांशी समन्वय व ममत्वच आपल्याला एका सूत्रात बांधून ठेवू शकते. भारतात सात प्रमुख धर्माचे लोक राहतात. येथे १२२ भाषा व १६०० बोलीभाषा आहेत. या प्रत्येकाने एकमेकाचा दुस्वास सुरू केला तर भारत एक देश म्हणून टिकून कसा राहील?
जात, धर्म आणि भाषेच्या नावे समाजात फूट पाडू पाहणाºया प्रत्येकाने प्रणवदांचे हे विचार मनात बिंबविण्याची गरज आहे. समाजात वैमनस्याची भावना निर्माण झाली की त्यातून हिंसाचार सुरू होतो. प्रणवदांनी अगदी बरोबर सांगितले की, आपल्या समाजात संताप व हिंसा वाढत आहे. हे थांबायला हवे. प्रणवदांचे हे विचार केवळ भाषण म्हणून ऐकून सोडून न देता प्रत्येकाने काळाची गरज म्हणून स्वीकार करण्याची आवश्यकता आहे. त्यानेच आपण उज्ज्वल भविष्याकडे जाऊ शकू. आपण सर्व भारतीयांनी परस्परांविषयी सहिष्णुता व सौहार्दता बाळगायला हवी. आज देशाच्या अनेक भागात माओवाद व नक्षलवाद ही सरकारची डोकेदुखी झाली आहे, तरीही त्यांच्याविरुद्ध लष्करी कारवाई केली जात नाही. यामागेही शेवटी तीही माणसेच आहेत, हा माणुसकीचा विचार आहे. ज्याने संघर्ष होईल असा प्रत्येक विचार आपल्याला टाळायला हवा. भारतात राहणारा प्रत्येक जण भारतीय आहे, हे मनोमन मान्य करायला हवे. जात, धर्म, रंग, भाषा आणि वेशभूषा यावरून कुणाचाही भेदभाव करता कामा नये. हे आपण करू शकलो तर भारताचे भविष्य नक्कीच उज्ज्वल होईल.
...हे लिखाण संपविण्यापूर्वी
आपली सैन्यदले जे काही पराक्रम करीत असते त्याची माहिती अनेक लोकांपर्यंत पोहोचतच नाही. गेल्या आठवड्यात येमेनच्या सोक्रोता बेटावर भीषण वादळात ३८ भारतीय अडकले. त्यांचे प्राण संकटात होते. भारतीय नौदलाच्या ‘सुनयना’ युद्धनौकेने तातडीने तेथे पोहोचून त्या सर्वांचे प्राण वाचविले. या सर्वांना घेऊन हे जहाज पोरबंदरला पोहोचले आहे. भारतीय नौदलाच्या बहाद्दर सैनिकांना माझा सलाम!

Web Title: Ideological solidarity in Pranab Mukherjee's speech at RSS event

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.