संप, बंदचाही हंगाम असतो तर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2018 02:43 AM2018-08-11T02:43:48+5:302018-08-11T02:43:54+5:30

सध्या हंगाम असल्यासारखे संप, बंद चालू आहेत. नुसता वैताग आणला या बंद आणि संपांनी.

If there is an offense, a clandestine season ... | संप, बंदचाही हंगाम असतो तर...

संप, बंदचाही हंगाम असतो तर...

Next

- दिलीप तिखिले
सध्या हंगाम असल्यासारखे संप, बंद चालू आहेत. नुसता वैताग आणला या बंद आणि संपांनी. हिंमतरावांच्या सौभाग्यवती जाम भडकल्या आहेत. किचनमध्ये आदळआपट सुरू आहे. हिंमतरावांना रोज फैलावर घेतले जात आहे. हिंमतराव बिचारे मवाळ. गुपचून ऐकून घेतात. तसंही बाजारात जाऊन भाजीपाला आण, किराण्याचे ओझे घेऊन ये, दळण आण ही रोजची कटकटीची कामं करण्यापेक्षा बायकोची बौद्धिक कटकट ऐकलेली बरी, असा माफक विचारही ते करतात.
आजही नेहमीप्रमाणे सौ.चा पट्टा सुरू झाला.
अहो... ऐकलंय का! ...आठ दिवसांपासून घरात ना भाजीपाला आला ना किराणा भरला. दळणही एक दिवसाचंच आहे. भाजी आणा म्हटलं तर सांगता वाहतूकदारांचा संप आहे. किराणा आणा म्हटलं तर मराठ्यांच्या बंदची सबब पुढे करता. कधी दूध उत्पादकांचे तर कधी ऊस उत्पादकांचे आंदोलन. ते संपत नाही तर आता तुम्हा राज्य कर्मचाऱ्यांचा संप. आम्ही करावे तरी काय? घर चालवायचं कसं? त्यातच हे कार्टं (आपल्या १० वर्षांच्या बंड्याला उद्देशून) दिवसभर उनाडक्या करीत राहतं. शाळेत जा म्हटलं तर म्हणतो संप आहे. मास्तरांनीच आम्हाला सुटी दिली. काय होईल या पोरांच्या शिक्षणाचे!
अहो...ऐकताय ना...?
पेपरात खुपसलेले हिमंतरावांचे डोके बायकोच्या या हाकेने बाहेर डोकावते.
ऐकतो ना...! असे म्हणत असतानाच आपल्याला एका सरळ रेषेत दोन कान दिल्याबद्दल ते देवाचे आभार मानतात. आजवरच्या शिरस्त्याप्रमाणे बायकोचे आतापर्यंत झालेले बौध्दिक त्यांनी या कानाने ऐकून त्या कानाने सोडून दिलेले असते. पण यावेळी सौ.ची चिडचिड जरा जास्तच वाढल्याचे हिंमतरावांच्या लक्षात आले. रोज होणारे संप, बंद याबद्दलचा तिचा संताप अकारण नाही हेही त्यांना पटले.
सौ.ने आता खरंच बौद्धिक सुरू केले.
... मला मान्य आहे...लोकशाहीत आपल्या हक्कासाठी लढण्याचा प्रत्येकाला अधिकार आहे. पण हे बंद, तोडफोड, जाळपोळ करण्याचे हक्क यांना कुणी दिले? दुकानदाराला आपले दुकान उघडे ठेवण्याचा हक्क आहे. हातावर पोट असणाºयांना आपला रोजचा रोजगार मिळवण्याचा हक्क आहे. मला माझे किचन चालविण्याचा हक्क आहे. हे यावेळी का विसरले जाते? जाळपोळ, तोडफोडीत कोट्यवधींचे नुकसान होते. मी तर म्हणते एवढ्या पैशात कितीतरी बेरोजगारांना रोजगार देता येऊ शकतो.
हिंमतरावांनी सौ.कडे अभिमानाने पाहिले...तू म्हणते, ते शंभर टक्के खरं आहे. संप शांततेच व्हावा अशीच संपकºयांची भावना असते, पण ऐनवेळी त्यात राजकारण शिरते आणि असा उत्पात होतो. उदाहरण म्हणून सांगतो. आता काही लोकांना देवेंद्रबाबू नको असतील (मग हे लोक त्यांच्याही पक्षातील असू शकतात) तर नेतृत्वबदलासाठी आंदोलकांना हाताशी धरून मग ते असले प्रयोग करतात.
हे प्रयोग यशस्वी होतात का? सौ.ची पृच्छा
हिंमतराव : कधी होतात, कधी नाही.
आता एक गंमत सांगतो...राज्य कर्मचाºयांचे एक शिष्टमंडळ म्हणे दिल्लीला मोदी साहेबांना भेटायले गेले. त्यांनी मुख्यमंत्र्यांविरुद्ध तक्रार केली. मोदी साहेब म्हणाले, देवेंद्रबाबू तुमचे ऐकत नसतील तर मी असं करतो...त्यांना येथे बोलावतो आणि मुख्यमंत्री म्हणून मी महाराष्टÑात येतो.
मग काय झाले -सौ.चा उत्सुक प्रश्न.
मग काय...शिष्टमंडळाने नको..नको म्हणतच तेथून धूम ठोकली आणि तीन दिवसांचा संप अडीच दिवसातच मागे घेतला.
याला म्हणतात, राजकारण..!

Web Title: If there is an offense, a clandestine season ...

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.