कोणत्याही प्रदेशाचा विकास सक्षम नेतृत्वावरच अवलंबून असतो. जेव्हा एखादा प्रदेश नेतृत्वविहीन होतो, तेव्हा त्या प्रदेशाची सर्वच बाबतीत अधोगती होते. पश्चिम विदर्भाला ही बाब तंतोतंत लागू पडते. महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीनंतर वसंतराव नाईक आणि सुधाकरराव नाईक ही काका-पुतण्यांची जोडी वगळली, तर खऱ्या अर्थाने राज्यव्यापी म्हणता येईल, असे नेतृत्व पश्चिम विदर्भात बहरलेच नाही. प्रतिभाताई पाटील यांनी थेट राष्ट्रपती पदापर्यंत मजल मारली खरी; पण त्या रुढार्थाने लोकनेत्या नव्हत्या, हेदेखील तेवढेच खरे! गत काही वर्षात तर पश्चिम विदर्भातील नेतृत्व खुरटतच गेले, असे खेदाने म्हणावे लागते. आज सर्वच राजकीय पक्षांमधील पश्चिम विदर्भातील नेते आपापल्या जिल्ह्यांपुरते, मतदारसंघांपुरतेच मर्यादित आहेत, ही वस्तुस्थिती आहे. राजकीय नेतृत्वाच्या अधोगतीसोबतच, विकासाच्या बाबतीतही पश्चिम विदर्भाची अधोगती होत गेली. आज विकासाच्या कोणत्याही निकषावर पश्चिम विदर्भ राज्याच्या इतर कोणत्याही भागाच्या तुलनेत प्रचंड माघारला आहे. सक्षम व दमदार नेतृत्वाअभावी पश्चिम विदर्भाचा आवाज राज्याच्या आणि देशाच्या राजधानीत उमटत नाही, हेच त्यामागचे कारण आहे. नेतृत्वाची ही पोकळी भरून काढण्यासाठी हल्ली पश्चिम विदर्भात नेतृत्वाचीही आयात सुरू झाली आहे. काही दिवसांपूर्वी भारतीय जनता पक्षाचे झारखंडमधील नेते यशवंत सिन्हा यांनी अकोल्यात येऊन शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व केले. त्यांच्या आंदोलनाचे फलित काय, हा प्रश्न सर्वसामान्य जनतेच्या मनात घर करून असतानाच, कालपरवा गुजरातमधील युवा नेते हार्दिक पटेल यांनीही अकोल्यात पायधूळ झाडली. यशवंत सिन्हा आणि हार्दिक पटेल हे दोघेही राष्ट्रीय चेहरे आहेत. दोघांचीही गृह राज्ये पश्चिम विदर्भापासून दूर आहेत. या प्रदेशाशी त्यांचा काहीही संबंध नाही. ते या भागात राजकीय अवकाश शोधत आहेत, असेही नाही. असे असतानाही महाराष्ट्राच्या इतर कोणत्याही भागात न जाता, ते पश्चिम विदर्भातच का पायधूळ झाडतात? या भागात निर्माण झालेली नेतृत्वाची पोकळीच त्यासाठी कारणीभूत म्हणावी लागेल. स्थानिक नेतृत्वाच्या क्षमतेवरील विश्वास उडाल्याने, काही स्थानिक मंडळीच बाहेरील नेत्यांना निमंत्रण देत आहे. आपल्या भागातील मुद्दे चव्हाट्यावर आणण्यासाठी, आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचविण्यासाठी जर बाहेरून नेतृत्वाची आयात करावी लागत असेल, तर सत्ताधारी पक्षाच्या नेतृत्वाच्या क्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणाºया विरोधी पक्षांच्या नेत्यांनीही आत्मपरीक्षण करायला हवे!
नेतृत्वाची आयात सुरूच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 4:22 AM