इंदिरा गांधी-नरेंद्र मोदी : एक अपरिहार्य तुलना

By admin | Published: February 13, 2015 11:05 PM2015-02-13T23:05:29+5:302015-02-13T23:05:29+5:30

वर्तमानकाळ आणि भूतकाळ यामधील राजकारण्यांची तुलना करता, गुजरातचा हा मुख्यमंत्री १९७१-७७ या काळातल्या इंदिरा गांधींशी साम्य दर्शवतो,

Indira Gandhi-Narendra Modi: An indispensable comparison | इंदिरा गांधी-नरेंद्र मोदी : एक अपरिहार्य तुलना

इंदिरा गांधी-नरेंद्र मोदी : एक अपरिहार्य तुलना

Next

रामचंद्र गुहा ,(ज्येष्ठ स्तंभलेखक, इतिहासकार ) -

वर्तमानकाळ आणि भूतकाळ यामधील राजकारण्यांची तुलना करता, गुजरातचा हा मुख्यमंत्री १९७१-७७ या काळातल्या इंदिरा गांधींशी साम्य दर्शवतो, असे मी या आधीच्या एका लेखात म्हटले होते. अर्थात नरेंद्र मोदींच्या चाहत्यांना किंवा टीकाकारांना हे वास्तव कधीच मान्य होणार नाही. इंदिरा गांधींनी ज्या प्रमाणे एकेकाळी आपल्या व्यक्तिमत्त्वाला पक्ष, सरकार, प्रशासन आणि देश यांच्या पलीकडे नेण्याचा प्रयत्न केला, तसाच प्रयत्न मोदींकडून सुरू असल्याचेही मी म्हटले होते.
१९६९ पूर्वी भारतीय राष्ट्रीय कॉँग्रेसच्या राज्य आणि जिल्हा शाखांमध्ये प्रभावी नेतृत्वाची भरभराट होती. पण कॉँग्रेस दुभंगल्यानंतर पक्षच इंदिरा गांधींंच्या इच्छांच्या (आणि विक्षिप्त सवयींच्या) अधीन होत गेला.
अधीनतेचे हे प्रमाण पक्षाच्या नावातसुद्धा प्रतिबिंबित होत होते. पक्ष तेव्हा कॉँग्रेस (आय) या नावाने परिचित झाला होता व यातील ‘आय’ म्हणजे स्वाभाविकच इंदिरा गांधी होय.
भारतीय जनता पार्टी आपली ओळख, पार्टी विथ डिफरन्स अशी करून देत होती. कॉँग्रेसमध्ये लालबहादूर शास्त्री यांच्यानंतरच्या काळात प्रकर्षाने उभारून आलेल्या व्यक्तिकेंद्रित राजकीय शक्तीला तिने कायम विरोधच केला होता. दीर्घकाळ या पक्षाला अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी आणि मुरली मनोहर जोशी या समर्थ त्रिमूर्तींचे नेतृत्व लाभले. भाजपा केंद्रात सत्तेवर आली, तेव्हा तिचे नेतृत्व वाजपेयी आणि अडवाणी यांच्या हाती होते. दोघांनाही अनुक्र मे विकास पुरु ष आणि लोहपुरु ष म्हणून ओळखले जाऊ लागले होते. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या वर्षातील नेहरू-पटेल यांच्या नेतृत्व भागीदारीचे हे प्रतिबिंबच होते.
इंदिरा काँग्रेसच्या पूर्वीच्या काळाप्रमाणेच भाजपातसुद्धा राज्य शाखा, संलग्न कामगार संघटना आणि महिला संघटनांच्या माध्यमातून आलेल्या प्रभावी नेतृत्वाची भरभराट होत होती. शिवाय राष्ट्रीय स्वयंसेवक संघ पाठीशी होताच. भाजपाच्या धोरण निश्चिती आणि निर्णय प्रक्रियेमध्ये सरसंघचालक आणि संघाच्या सरचिटणिसांची महत्त्वाची भूमिका होती. नेतृत्वातील वैविध्य आणि संघटनेचा प्रबळ पाया याच दोन कारणांमुळे भाजपा स्वत:ला कॉँग्रेसपेक्षा वेगळे म्हणवून घेत होती. उलटपक्षी कॉँग्रेस केविलवाण्या पद्धतीने इंदिरा गांधी, राजीव गांधी आणि नंतर सोनिया गांधी यांच्या एकेरी नेतृत्वावर विसंबून राहिली.
संघ आणि भाजपा यांनी बऱ्याच काळपर्यंत व्यक्तिपूजेला विरोध केला, आणि हेच नेमके त्यांच्या विरोधाचे वैशिष्ट्य होते. कॉँग्रेस आणि इतर प्रादेशिक पक्ष व्यक्ति-प्रभावाखाली होते. आताही तीच व्यक्तिपूजा आपल्यासमोर दिसते आहे. मागील वर्षी नरेंद्र मोदी यांनी आपल्या इच्छा आणि आकांक्षा भाजपावर लादल्या, मोदींचा आज पक्षावर असलेला प्रभाव इंदिरा गांधींच्या १९७१ सालच्या विजयानंतर कॉँग्रेसवर तयार झालेल्या प्रभावासारखाच आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली चाललेल्या सरकारी यंत्रणेच्या बाबतीतसुद्धा हेच म्हणता येईल.
इंदिरा गांधींच्या एका अमेरिका दौऱ्याच्या आधी तेव्हाचे अमेरिकी राष्ट्राध्यक्ष लिंडन जॉन्सन यांनी भारतीय राजदूताला विचारले की, इंदिरा गांधींना कसे संबोधायचे, मॅडम की मिसेस गांधी? ही शंका इंदिरा गांधींपर्यंत पोहोचवण्यात आली आणि उत्तरादाखल असे सांगण्यात आले की, मंत्रिमंडळातले बरेचसे सहकारी त्यांना ‘सर’ म्हणतात ! हा प्रसंग शंकास्पद असला तरी अन्वयार्थाने तो सत्यच वर्तवतो.
गांधींच्या मंत्रिमंडळातले सहकारी त्यांच्या जरबेखाली होते, तसेच आज मोदींच्या जरबेखाली त्यांचे सहकारी आहेत. आपल्या आजच्या पंतप्रधानांचा निश्चयीपणा आणि अधिकारवृत्ती त्यांच्या पूर्वसुरीच्या असमर्थनीय कचखाऊपणाचा विरोधाभास आहे. सत्तेचे केंद्र त्यांच्या हाती एकवटले आहे व सरकारची ओळखसुद्धा त्यांनी स्वत:शी निगडित ठेवली आहे. लोकनियुक्त मंत्रिमंडळ पद्धतीच्या गाभ्याशी हे कदाचित विसंगत आहे. याच कारणामुळे मला या दोन्ही पंतप्रधानांची तुलना करावीशी वाटते. कॉँग्रेसचे अध्यक्ष देवकांत बरुआ यांनी इंदिरा म्हणजे इंडिया आणि इंडिया म्हणजेच इंदिरा असे उद्गार काढले होते. भाजपाचे नेतेसुद्धा हेच करीत आहेत.
ओबामांनी आपल्या भाषणात भारताच्या प्रगतीसंदर्भात मोदींकडून व्यक्त केलेल्या अपेक्षांसारखीच अपेक्षा इंदिरा गांधींच्या काळातसुद्धा व्यक्त करण्यात आली होती. इंदिरा गांधींच्या भाषणातसुद्धा आपणच कसे देशाचे नेतृत्व करतो आहोत आणि आपणच कसे देशाच्या वर्तमान आणि भविष्याचे प्रतिनिधित्व करतो आहोत, हेच असायचे.
दोघांमधील शेवटचे साम्य म्हणजे दोघांच्याही सोबत कुणीतरी एक विश्वासू व्यक्ती असते. या व्यक्तीने दिलेले सल्ले मंत्रिमंडळाच्या सल्ला मसलतीचा भाग नसतानासुद्धा अमलात आणले जातात. १९६९ ते १९७४ या काळात इंदिरा गांधींच्या अशा सहकाऱ्याची भूमिका पी.एन. हक्सर यांनी बजावली. १९७४ ते १९८० दरम्यान याच भूमिकेत संजय गांधी आणि १९८१ नंतर राजीव गांधी होते. नरेंद्र मोदींच्या बाबतीत या जागेवर सध्या अमित शहा आहेत. स्वभाव आणि पात्रतेचा विचार करता, अमित शहा हे हक्सर आणि संजय गांधी यांचे मिश्रण भासतात.
काही ठिकाणी मात्र इंदिरा गांधी आणि नरेंद्र मोदी यांची तुलना अवघड होऊन जाते. इंदिरा गांधी यांचा जन्म एका राजकीय दृष्ट्या प्रभावशाली कुटुंबात झाला होता, तर मोदींचे नेतृत्व पूर्णपणे स्वनिर्मित आहे. इंदिरा गांधींना सत्तेच्या अर्थकारणावरील पकडीवर विश्वास होता तर नरेंद्र मोदी खासगीकरणावर विश्वास ठेवणारे आहेत. इंदिरा गांधींना भारताच्या सांस्कृतिक आणि धार्मिक वैविध्याची जाणीव होती तर मोदींचे नेतृत्व एकांगी हिंदुत्वाच्या प्रयोगशाळेतून उभारलेले आहे.
नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले, त्याला आताशी फक्त नऊ महिने झाले आहेत. त्यांची राजकीय क्रांती त्यांना नव्या आणि आश्चर्यकारक दिशांना घेऊन जाईलसुद्धा पण लोकशाहीवादी म्हणून व्यक्तिश: माझी मात्र हीच अपेक्षा राहील की, अन्य बाबींपेक्षा मोदींच्या या क्रांकीने त्यांना इंदिरा गांधींच्या सामाजिक बहुत्ववादाकडे आणि त्याचवेळी इंदिरा गांधींच्याच अधिकारवादापासून दूर घेऊन जावे.

Web Title: Indira Gandhi-Narendra Modi: An indispensable comparison

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.