पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात प्रचंड प्रतिकूलतेत, प्रतिस्पर्धी तिन्ही पक्ष साधनसंपत्तीसह एकजूट असताना आणि राष्ट्रवादीच्या अनेक बड्या नेत्यांनी या मतदारसंघात तळ ठोकलेला असताना भाजपने संपादित केलेला विजय हा अनेक अर्थांनी महत्त्वपूर्ण आहे. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या विठुमाउलीचा हा आशीर्वाद आम्ही विनम्रपणे स्वीकारतो. येथून पुढे साऱ्या निवडणुका आम्ही एकत्रित लढू आणि जिंकू, असा फाजील आत्मविश्वास महाविकास आघाडीचे नेते दाखवीत होते. मतदारांनी मग्रुरी नाकारली. संत ज्ञानेश्वरांच्या हरिपाठातील ओवी मला आज आवर्जून आठवत आहे - अनंत वाचाळ बरळती बरळ । त्यां कैसेनि गोपाळ पावे हरि ।
सत्तेत आल्यापासून महाविकास आघाडीने एकापाठोपाठ जनतेच्या विश्वासघातांची जणू मालिकाच सुरू केली. बांधांवरचे आश्वासन बासनात गुंडाळून ठेवले. शेतकरी, कामगार, गोरगरीब घटकांवर सातत्याने अन्याय करण्याचे धोरणच या सरकारने ठेवले. कोरोनाने डोके वर काढताच ही अत्याचारांची मालिका आणखी तीव्र बनली. सर्व राज्ये त्यांच्या राज्यात प्रत्येक घटकास मदत करीत असताना महाराष्ट्रात मात्र कोणतीही मदत दिली जात नव्हती. कोरोनाच्या हाताळणीतसुद्धा जी हयगय महाराष्ट्राने दाखविली, तितकी कोणत्याच राज्याने दाखविली नसेल. त्यामुळे आता महाराष्ट्र होरपळत असताना कोणतीही मदत सरकारतर्फे केली जात नाही. अशा संकटात राज्यातील नेते पोलिसांकडून वसुली करीत होते, तर शासनाचे विभाग जनतेकडून. पाच हजार कोटी रुपये अधिकची वीज बिल वसुली होऊनसुद्धा शेतकरी आणि गरिबांची वीज मोठ्या प्रमाणात कापली गेली. या संतापाचा उद्रेक पंढरपूर मतदारसंघात आम्ही जागोजागी अनुभवला. त्याचीच प्रतिक्रिया मतदारांनी व्यक्त केली. भाजपच्या प्रत्येक कार्यकर्त्याने अतिशय शिस्तीने केलेले नियोजन, परिश्रमसुद्धा महत्त्वाचे! प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यासह परिचारक बंधूंनी संपूर्ण ताकद पणाला लावली. हे सर्वांच्या एकजुटीचे आणि अचूक नियोजनाचे यश आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जनतेचा ठाम विश्वास पुन्हा एकदा अधोरेखित झाला आणि वाचाळवीरांना चपराक मिळाली. पंढरीतून एका नव्या लढाईचा प्रारंभ झाला आहे, त्याचा शेवट हा महाविकास आघाडीच्या पतनाचा असेल. आज म्हणूनच पंढरपूरच्या पराभवावर कुणी बोलणार नाही. त्यांना बंगालमध्ये ममतादीदींविरोधातील एकवटणं दिसेल; पण पंढरपुरातील तिन्ही पक्षांची एकजूट दिसणार नाही. असो, मी पंढरपूर-मंगळवेढ्यातील प्रत्येक मतदाराला मनापासून धन्यवाद देतो. भाजप तुमच्या विश्वासाला पात्र ठरला आहे आणि भविष्यातसुद्धा ठरेल, याची ग्वाही देतो.
(लेखक विधानसभा विरोधी पक्षनेते आहेत)