- प्रा. डॉ. जे.एफ. पाटीलदेशांतर्गत घटक, आंतरराष्ट्रीय घटक व धोरणात्मक घटक यांच्या संमिश्रणामुळे व्याजदर व विनिमय दर यांच्यातील संबंधावर महत्त्वपूर्ण प्रभाव पडतो. अंतर्गत प्रभावाची शक्ती जितकी अधिक तितक्या अधिक प्रमाणात तटस्थता व्याजदर व विनिमय बाजार यांच्यातील संबंध अधिक घनिष्ट होतात.२० व्या शतकातील सर्वश्रेष्ठ अर्थतज्ज्ञ जॉन मेनार्ड केन्स यांनी आपल्या सर्वांत महत्त्वाच्या व ख्यातकीर्त ग्रंथाचे नाव ‘जनरल थिअरी आॅफ एम्प्लॉयमेंट, इंटरेस्ट अँड मनी’ असे ठेवले. कारण कोणत्याही काळात राष्ट्रात व परिस्थितीत सामान्य माणसासाठी रोजगार हा प्रधान विचार असतो. रोजगार निर्माण करण्यासाठी गुंतवणूक (वित्तीय भांडवल) पैसा आवश्यक असतो. त्याचा पुरवठा व मागणी मूलत: व्याजदरावर अवलंबून असते. जास्त बचतीसाठी जादा व्याजदर, जास्त बचतीमुळे कमी व्याजदर, तर जास्त गुंतवणुकीसाठी कमी व्याजदर, तर गुंतवणूक कमी होण्यामुळे व्याजदर घट असा अत्यंत नाजूक, प्रभावी व मानवी जीवनावर व पर्यायाने राष्ट्राच्या आर्थिक विकासावर हमखास, भला-बुरा परिणाम करणारा महत्त्वाचा घटक म्हणजे व्याजदर. साधारणत: नैसर्गिक व्याजदर व बाजार व्याजदर हे सर्वांचे परिचयाचे शब्द आहेत.ज्या व्याजदराला व्यवस्थेची बचत व गुंतवणूक यांच्यात संतुलन साध्य होईल तो नैसर्गिक व्याजदर. याउलट प्रत्यक्ष बाजारात कर्जावर आकारला जाणारा व्याजदर म्हणजे बाजार व्याजदर. तो नेहमीच नैसर्गिक व्याजदराच्या बरोबर असतोच असे नाही.अलीकडच्या साहित्यात तटस्थ व्याजदर ही संकल्पना रूढ झाली आहे. ज्या व्याजदराला अर्थव्यवस्था क्षमतेनुसार वाढते व भाववाढ नियंत्रित असते, त्या व्याजदरास तटस्थ व्याजदर असे म्हणावे. काही वेळेस तटस्थ व्याजदराची व्याख्या असा व्याजदर की, ज्यामुळे वित्तीय बाजार संतुलित केला जातो व भाववाढीचा दर नियंत्रित व स्थिर असतो.सैद्धांतिक पातळीवर, पुढील दोन विधाने केली जातात.अ. तटस्थ व्याजदरापेक्षा अधिक व्याजदर ठेवण्याचा प्रयत्न मध्यवर्ती बँकेने केल्यास-वृद्धिदरावर प्रतिकूल परिणाम होईल, मंदी व भावघट निर्माण होण्याची भीती निर्माण होईल व समाजावर टाळता येऊ शकणारे खर्च (दुष्परिणाम) लादले जातील.ब. तटस्थ व्याजदरापेक्षा कमी व्याजदर ठेवण्याचा प्रयत्न मध्यवर्ती बँकेने केल्यास-अर्थव्यवस्था अतिरिक्तगरम (गतिमान) होईल व संभाव्य भाववाढीमुळे लोकांची खरेदी शक्ती घटत जाईल. त्यातून वित्तीय बाजार अस्थिर होईल.भाववाढ व मंदीच्या या शक्यतांच्या ताणलेल्या दोरीवर चालत राहणे कठीण असल्यामुळे, तटस्थ व्याजदराची संकल्पना समजून घेणे महत्त्वाचे आहे. क्रमश: मंदपणे धोरण व्याजदर (मध्यवर्ती बँकेने ठरविलेला) व तटस्थ व्याजदर यांच्यात एकपातळी निर्माण होणे, ही अर्थव्यवस्था साधारणत: करण्याची व चलन धोरणाचे सादरीकरण करण्याची मोठी सुंदर प्रक्रिया आहे, असे रे डॅलिओ या तज्ज्ञांचे मत आहे. कारण अशी एकपातळी अस्तित्वात येणे हे बाजाराचे स्थिरीकरण व निरोगीपणा प्राप्त करण्यासाठी आवश्यक/ पूरक आहे.मध्यवर्ती बँकेने ठरविलेला व्याजदर (धोरणदर) तटस्थ व्याजदरापेक्षा कमी पडल्यास अर्थव्यवस्थेचे मूलभूत घटक सुधारण्याची प्रक्रिया अडखळते. प्रचलित मत्ता किमतीचे सर्मथन करता येत नाही. बाजार अस्थिर होतो. याउलट धोरणदर, तटस्थ व्याजदरापेक्षा अधिक झाल्यास, भांडवल बाजारात बुडबुडे व खळखळाट निर्माण होतो व मत्ता किमती टिकावू राहत नाहीत. वास्तव, अर्थव्यवस्था अडचणीत येते. बाजार एकदम कोसळतो व घोटाळ्याची आर्थिक परिस्थिती निर्माण होते. तटस्थ व्याजदर स्थिरीकरणाची दिशा दाखवितो. त्याच्यामुळे बाजार अपेक्षांची झेप ठरते. मत्तांच्या लाभाचे वक्र, त्यांची दिशा यांचा अंदाज मिळतो.तटस्थ व्याजदराचे नियमन करणारे घटक मुख्यत: देशांतर्गत असतात. त्यात, रचनात्मक व दीर्घकालीन घटक असतात. मुख्यत: उत्पादकता, लोकसंख्या रचना बदल, वित्तीय नियमन व खोली यांचा उल्लेख करावा लागेल. अर्थात वित्तीय जागतिकीकरणामुळे आंतरराष्ट्रीय घटकांचा प्रभावही वाढत आहे.(लेखक ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ आहेत.)
देशांतर्गत घटक, आंतरराष्ट्रीय घटक व धोरणात्मक घटक यांच्या संमिश्रणाचा व्याजदर व विनिमय दर यांच्यावर प्रभाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 12:10 AM