अंतर्युद्ध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2018 12:55 AM2018-04-03T00:55:58+5:302018-04-03T00:55:58+5:30
प्राचीन काळापासून मानव युद्धामध्ये गुंतलेला आहे. अशी आशा होती की जस-जसा सभ्यतेचा विकास होईल तसतशा युद्धाच्या घटना कमी होतील व मानव शांततेचे जीवन जगेल. परंतु असे घडले नाही. मानव जसजसा प्रगतिपथावर जाऊ लागला तसतशी त्याची युद्धाबाबतची मानसिकता वाढत गेली. मानवाने युद्धात वापरली जाणारी अत्यंत घातक शस्त्रे व अस्त्रांची निर्मिती केली.
- डॉ भूषण कुमार उपाध्याय
प्राचीन काळापासून मानव युद्धामध्ये गुंतलेला आहे. अशी आशा होती की जस-जसा सभ्यतेचा विकास होईल तसतशा युद्धाच्या घटना कमी होतील व मानव शांततेचे जीवन जगेल. परंतु असे घडले नाही. मानव जसजसा प्रगतिपथावर जाऊ लागला तसतशी त्याची युद्धाबाबतची मानसिकता वाढत गेली. मानवाने युद्धात वापरली जाणारी अत्यंत घातक शस्त्रे व अस्त्रांची निर्मिती केली. आज संपूर्ण जग हे या धोक्याचा सामना करीत आहे, जर परमाणु हत्यारांचा वापर झाला तर संपूर्ण जग नष्ट होईल. बाहेरचे युद्ध हे मानवाच्या मनात चालणाऱ्या युद्धाचा प्रतिध्वनी आहे. सर्वात प्रथम हे युद्ध मानवाच्या मनात उत्पन्न होते व नंतर ते भौतिक जगामध्ये प्रकट होते. शेवटी जर बाहेरच्या युद्धाला नियंत्रित करावयाचे असेल तर सर्वप्रथम मनामध्ये चालणाºया युद्धाला नियंत्रित करणे आवश्यक आहे. हेच कारण आहे की भारतीय तत्त्वज्ञांनी बाहेरील युद्ध व हिंसेला मनाच्या वृत्तीचे प्रतिरूप म्हटले आहे. भारतीय योग व अध्यात्मशास्त्रामध्ये मनाच्या या वृत्तीची अतिशय खोलवर चर्चा झालेली आहे. या तत्त्वज्ञांचे असे म्हणणे आहे की मनामध्ये सात्विक वृत्ती असेल तर मानवाची वाणी व त्याचे कर्म सात्विक व चांगले असतात. मनाच्या वृत्तीला कसे शुद्ध बनविले पाहिजे व त्याला कसे नियंत्रित करून रंजनात्मक कार्यामध्ये गुंतविले गेले पाहिजे यासाठी भारत वर्षामध्ये विचारवंतानी एक महत्त्वपूर्ण शास्त्र विकसित केले आहे त्याला योगशास्त्र या नावाने ओळखले जाते. चित्ताच्या वृत्तीचा निरोध व मानवाची चेतना त्या परमचेतनेशी जोडणे हा योगाचा प्रमुख उद्देश आहे. जेव्हा मानवाची चेतना विस्तृत होऊन त्या परमचेतनेशी जोडली जाते, तेव्हा मानवाच्या मनात एकत्वाचा भाव निर्माण होतो. सध्या योगासंदर्भात अनेक वैज्ञानिक प्रयोग झाले आहेत, या प्रयोगातून असे निष्पन्न झाले आहे की शारीरिक व मानसिक स्वास्थ्याबरोबरच मानवाच्या मनात एक वैश्विक भाव निर्माण होतो. जर आपल्याला मानव समाजातील हिंसेला कमी करावयाचे आहे व युद्धाला थांबवायचे आहे तर मानवाच्या मनाचे शुद्धीकरण होणे आवश्यक आहे व त्यासाठी योग हा एक सशक्त उपाय आहे.