जमाअत-ए-इस्लामी हिंदचा शांती मार्ग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:41 AM2018-01-24T00:41:49+5:302018-01-24T00:41:55+5:30
सर्व जाती-धर्मातील बांधवांना सोबत घेत जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रने १२ ते २१ जानेवारी दरम्यान राज्यात सुमारे ६०० लहान-मोठ्या शहरांमध्ये शांतीचा संदेश दिला़ सर्व धर्मातील सुजाण लोकांनी एकत्र आले पाहिजे,सर्व धर्म मानव कल्याणाचीच शिकवण देतात़ आपण एकाच विधात्याची लेकरे आहोत, भाऊ-बहीण आहोत, असे मंथन करीत जमाअत-ए- इस्लामी हिंदने सर्व धर्मगुरूंना एका मंचावर आणले़ प्रत्येक धर्माची शिकवण आणि त्यातील साधर्म्य याची चर्चा केली़
सर्व जाती-धर्मातील बांधवांना सोबत घेत जमाअत-ए-इस्लामी हिंद महाराष्ट्रने १२ ते २१ जानेवारी दरम्यान राज्यात सुमारे ६०० लहान-मोठ्या शहरांमध्ये शांतीचा संदेश दिला़ सर्व धर्मातील सुजाण लोकांनी एकत्र आले पाहिजे,सर्व धर्म मानव कल्याणाचीच शिकवण देतात़ आपण एकाच विधात्याची लेकरे आहोत, भाऊ-बहीण आहोत, असे मंथन करीत जमाअत-ए- इस्लामी हिंदने सर्व धर्मगुरूंना एका मंचावर आणले़ प्रत्येक धर्माची शिकवण आणि त्यातील साधर्म्य याची चर्चा केली़
समाजात सभोवार डोळे दिपवून टाकणारी प्रगती आणि विकास दिसत आहे़ त्याचवेळी अन्याय, अत्याचार आणि शोषणही सुरू आहे. या पार्श्वभूमीवर ‘इस्लाम : शांती, प्रगती आणि मुक्ती’ हे ब्रीद घेऊन सुरू असलेल्या अभियानाची प्रदेशाध्यक्ष तौफिक असलम खान यांनी मौलिक माहिती दिली़ सुमारे चार कोटी लोकांपर्यंत ही मोहीम पोहोचविली़ जात आणि धर्म भेद हा मानवी कल्याणाच्या आड येतो़ कोणी कुठल्याही जाती-धर्माचा असो, त्याने सद्विचार आणि आचार केला पाहिजे़ त्यासाठी जमाअते इस्लामी हिंदने या अभियानादरम्यान सर्व धर्मगुरूंना एका मंचावर स्थान दिले़ त्यांच्याकडून शांती, प्रगती आणि मुक्तीचा मार्ग जनसामान्यांपर्यंत पोहोचविला़ सरकार काय करीत आहे, यापेक्षा मी समाजासाठी काय करतो हे अधिक महत्त्वाचे आहे़ एकात्मतेचा विचार घेऊन भारत देश साºया जगाला दिशा देऊ शकतो, हा विश्वास या अभियानाने पेरला आहे़ एकीकडे प्रगतीची शिखरे दिसत असली तरी मोठी संख्या दारिद्र्यरेषेखाली जगत आहे़ दोन वेळचे पोटभर अन्न मिळत नाही, असेही लोक आपल्या अवतीभोवती आहेत़ ते कोणत्याही जाती-धर्माचे असोत त्यांना प्रवाहात आणणे व त्यांच्यासाठी प्रगतीची दारे खुली करणे हेही धार्मिक विचार असलेल्या, सद्वर्तनी प्रत्येक व्यक्तीचे कर्तव्य आहे़ जिथे शांतता आहे, तिथेच प्रगती होऊ शकते़ जे लोक चुकीच्या मार्गाने जात आहेत, त्यांना योग्य मार्गावर आणावे लागेल, हे सद्भावना सभांमधील चिंतन खºया अर्थाने प्रगतीकडे नेणारे ठरणार आहे़ आज बुलेट ट्रेनची चर्चा होते, दळणवळणाची चौफेर प्रगती सांगितली जाते़ परंतु, उंच इमारती, देखण्या वास्तू ही सर्व आभासी प्रगती आहे़ समाजा-समाजात विश्वासाचे नाते निर्माण करणे, सामाजिक सौहार्द टिकविणे आणि शांतता अबाधित ठेवणे हे प्रगतीसाठीचे पहिले पाऊल आहे़
जमाअत-ए-इस्लामी हिंदने राबविलेल्या सद्भावना अभियानात मुस्लीम बांधवांनी विशेषत: तरूणांनी नोंदविलेला सहभाग अनुकरणीय आहे़ याच मोहिमेचा एक भाग म्हणून लातुरातील अन्य धर्मीय बांधवांना ‘मस्जिद परिचय’ करून देण्यात आला़ सद्भावना सभांमध्ये हिंदू, बौद्ध, ख्रिश्चन, शीख, जैन या धर्मातील धर्मगुरूंनीही विचार मंथन केले़ विश्वास वाढविणारी ही प्रक्रिया निरंतर चालविणे ही यापुढे सर्वांची जबाबदारी आहे़ त्यात बहुसंख्य असलेल्या समाज बांधवांचे उत्तरदायित्व अधिक आहे़ सोशल मीडियामधून, विविध घटनांच्या संदर्भाने समाजात तेढ निर्माण करणा-या प्रवृत्तींना सद्भावना मोहिमेने पायबंद घातला आहे़ विशिष्ट जात, धर्म वा समूहाला समोर ठेवून केला जाणारा विषारी प्रचार रोखण्याची ताकदही सद्भावनेतच आहे़ त्याचे सूत्र विणण्याचे काम जमाअत-ए-इस्लामी हिंदने केले़
- धर्मराज हल्लाळे (dharmraj.hallale@lokmat.com)