केवळ अन्यायातून झालीत का बंड ?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 9, 2019 04:48 PM2019-10-09T16:48:35+5:302019-10-09T16:49:30+5:30
मिलिंद कुलकर्णी महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीत सर्वत्र बंडखोरांचे पेव फुटले आहे. अन्यायाचे गाणे गात इच्छुक उमेदवारांनी बंडाचे झेंडे उभारले आहेत. ...
मिलिंद कुलकर्णी
महाराष्टÑातील विधानसभा निवडणुकीत सर्वत्र बंडखोरांचे पेव फुटले आहे. अन्यायाचे गाणे गात इच्छुक उमेदवारांनी बंडाचे झेंडे उभारले आहेत. पण खरोखरच अन्याय झालेला आहे का? पक्षाने यापूर्वी संधी दिलेली नव्हती का? पक्षहित लक्षात घेऊन दोन पावले मागे घेण्याची मानसिकता का उरलेली नाही? अगदी विचारसरणीच्या विरुध्द जाऊन दुसऱ्या पक्षाचा झेंडा हाती घेतल्याचे प्रकारही घडले आहेत. काही ठिकाणी पक्षशिस्त, श्रेष्ठींचे आदेश, आश्वासन यावर भिस्त ठेवत निष्ठावंतांनी माघार घेतल्याची उदाहरणेदेखील आहेत. पण यंदा बंडखोरीचा विक्रम झाला, असेच म्हणावे लागेल. इतिहासात डोकावून पाहिले तर बंड अनेकदा झाले. ते गाजलेसुध्दा. पण यंदा त्याचे पेव फुटले, त्यामागील कारणांविषयी चर्चा करायला हवी. पहिले कारण जे जाणवते ते म्हणजे, २०१४ मध्ये सर्वच राजकीय पक्ष हे स्वबळावर निवडणूक लढवत होते. त्यामुळे उमेदवारीसाठी अनेकांना संधी मिळाली. त्यापैकी मोजके निवडून आले, पण पराभूतांमागे विधानसभा निवडणूक लढविण्याचा अनुभव जमा झाला. पाच वर्षे भाजप-शिवसेना युतीची सत्ता असल्याने युतीतील पराभूत आणि अन्य कार्यकर्त्यांनाही ‘आमदारकी’चे वेध लागले. लोकसभा निवडणुकीत काही उमेदवार अल्पतयारीवर जिंकून आले. त्यामुळे काही उमेदवारांच्या आशा जागृत झाल्या.
दुसरे कारण म्हणजे, राजकीय पक्षांना सत्ता संपादनासाठी दुसºया पक्षातील तुल्यबळ उमेदवार ‘आपलासा’ करुन हमखास विजय हवा आहे. त्यामुळे गेला महिनाभर ‘आयाराम-गयाराम’ नाटक गाजले. स्वाभाविकपणे पाच वर्षे मतदारसंघाची मशागत करणाºया इच्छुक उमेदवारांच्या इच्छेवर पाणी फिरले. त्याला बंडखोरीसाठी पर्याय उरला नाही. पाच वर्षे कुणीही थांबायला तयार नाही. त्यामुळे ‘श्रध्दा, सबुरी’ ही तत्त्वे कागदावर राहिली.
खान्देशातील बंडखोरीचा विचार केला तर सर्वच पक्षांमध्ये बंडखोरीची लागण झालेली आहे. भाजपचे बंडखोर शिवसेनेच्या उमेदवाराविरुध्द उभे असल्याचा प्रकार चोपडा, जळगाव ग्रामीण, पाचोरा व अक्कलकुवा, भाजपविरुध्द शिवसेनेचे बंडखोर शिंदखेडा आणि मुक्ताईनगर, काँग्रेसविरुध्द राष्टÑवादीचे बंडखोर नवापूर, भाजप विरुध्द भाजप अशी लढत शिरपूर व साक्री, शिवसेना विरुध्द शिवसेना अशी जळगाव ग्रामीण, राष्टÑवादी विरुध्द राष्टÑवादी अशी लढत चोपडा व जळगाव ग्रामीण
या मतदारसंघात होत आहे.
प्रभाकर सोनवणे (चोपडा), चंद्रशेखर अत्तरदे (जळगाव ग्रामीण), अमोल शिंदे (पाचोरा), नागेश पाडवी (अक्कलकुवा) हे भाजपचे चार बंडखोर शिवसेनेविरुध्द बंडाचे निशाण घेऊन उभे आहेत.
शिवसेनेचे शानाभाऊ कोळी (शिंदखेडा) व चंद्रकांत पाटील (मुक्ताईनगर) यांनी भाजपविरुध्द दंड थोपटले आहेत.
राष्टÑवादीला अलिकडे सोडचिठ्ठी दिलेले शरद गावीत यांनी नवापुरात काँग्रेसच्या उमेदवाराला आव्हान दिले आहे.
भाजपात अंतर्गत बंडखोरी करणाऱ्यांमध्ये डॉ.जितेंद्र ठाकूर (शिरपूर) व मंजुळा गावीत (साक्री) यांचा समावेश आहे. जळगाव ग्रामीणमध्ये शिवसेनेच्या लकी टेलर यांनी सहकार राज्यमंत्र्यांना आव्हान दिले आहे.
माधुरी किशोर पाटील (चोपडा) व रवी देशमुख (जळगाव ग्रामीण) यांनी राष्टÑवादीच्या अधिकृत उमेदवाराविरुध्द बंड केले आहे.
सर्वच पक्षांचे परस्परांविरुध्द आणि अंतर्गत बंडखोरी झाली असल्याने कोण कुणाला बोल लावू शकत नाही. मतदारसंघ निहाय परिस्थिती वेगवेगळी आहे. परंतु, यात चुका पक्ष आणि उमेदवार अशा दोघांच्या आहेत. पाच वर्षे मेहनत करणाºया उमेदवाराला ऐनवेळी उमेदवारी नाकारुन ‘आयारामा’ला संधी देणे चुकीचे आहे. तसेच पक्षाने वेळोवेळी संधी दिली, पदे दिली, मानसन्मान दिला, असे असताना एकदा थांबायला सांगितले तर पक्षादेश मोठ्या मनाने मान्य करायला हरकत काय आहे. प्रथम देश, नंतर पक्ष आणि शेवटी स्वत: असे तत्त्व सगळेच प्रमाण मानतात, असे नाही. त्यामुळे बंड घडून येतात. काही यशस्वी ठरतात तर काही फसतात. फसलेल्यांना उगाच ‘तोतयांचे बंड’असे म्हणून हिणवले जाते, ते वेगळेच. या बंडाचे काय होते, हे २४ तारखेला कळेल.