कृषी महोत्सवाचे औचित्य!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 21, 2018 05:25 AM2018-02-21T05:25:33+5:302018-02-21T05:25:36+5:30
भारताची कृषी संस्कृती फार प्राचीन आहे. अनुभवातून निर्माण झालेले कृषिविषयक ज्ञान परंपरागतरीत्या एका पिढीकडून दुसºया पिढीकडे हस्तांतरित होत गेले.
भारताची कृषी संस्कृती फार प्राचीन आहे. अनुभवातून निर्माण झालेले कृषिविषयक ज्ञान परंपरागतरीत्या एका पिढीकडून दुसºया पिढीकडे हस्तांतरित होत गेले. पिढी दर पिढीगणिक ते अधिकाधिक समृद्ध होत गेले. परिणामी भारतीय कृषी क्षेत्रही खूप समृद्ध झाले. त्यामुळेच अगदी गत शतकाच्या प्रारंभापर्यंत, भारतात ‘उत्तम शेती, मध्यम व्यापार, कनिष्ठ नोकरी’ हा विचार प्रबळ होता. पुढे निसर्गाचा लहरीपणा वाढत गेला, लोकसंख्यावाढीमुळे शेतीचे छोटे तुकडे होऊ लागले, पाश्चात्त्य देशांमध्ये तेथील परिस्थितीनुरूप विकसित झालेले तंत्रज्ञान थोपल्याने पारंपरिक ज्ञानाकडे दुर्लक्ष होऊ लागले आणि पावसावर अवलंबून असलेली शेती दिवसेंदिवस तोट्याची ठरू लागली. उत्पादन अन् उत्पन्नाचे गणित हुकले आणि शेतकºयांचा कर्जबाजारीपणा वाढू लागला. त्यावर मात करण्यासाठी देशात कृषी विद्यापीठे सुरू झाली, तिथे संशोधन होऊ लागले, नवनवे वाण शोधल्या जाऊ लागले, शेतीपयोगी अवजारे वाढली. हे सर्व ज्ञान, तंत्रज्ञान शेतकºयांपर्यंत पोहोचविण्यासाठी नवनवीन व्यवस्था निर्माण झाल्या. कृषी महोत्सव हा त्याच व्यवस्थेचा एक भाग! राज्यात आजवर कृषी महोत्सव प्रामुख्याने कृषी विद्यापीठांच्या पातळीवरच होत असत. विद्यापीठांची भौगोलिक कार्यक्षेत्रे मोठी असल्याने सर्वच शेतकरी अशा महोत्सवापर्यंत पोहचू शकत नव्हते. ही बाब हेरून आता राज्य शासनाने कृषी महोत्सव जिल्हा पातळीवर घेऊन जाण्याचा निर्णय घेतला आहे. जिल्हा पातळीवरील राज्यातील पहिला कृषी महोत्सव नुकताच बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव येथे पार पडला. या महोत्सवात विविध शासकीय व निमशासकीय संस्था, खासगी कंपन्या, कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्रे, शेतकरी कंपन्या, बचत गट यांची तब्बल ४०० दालने होती. विविध निविष्ठांसंदर्भातील माहितीसोबतच, शेतीतील नावीन्यपूर्ण प्रयोगांची माहिती घेण्याची संधी या निमित्ताने शेतकºयांना मिळाली. शेती प्रक्रिया उद्योग व जलव्यवस्थापन, यावर अशा महोत्सवातून भर दिला जाणार असल्याने शेतीविषयक साक्षरता वाढविण्यास मोलाची मदत होणार आहे. आपल्यासारखाच पाच-दहा एकराचा मालक आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भरघोस उत्पादन घेतो, ही अनुभूती पारंपरिक शेती करणाºया शेतकºयांसाठी नवी उमेद देणारी ठरणार आहे. यापुढे नव्या तंत्रज्ञानाचा आधार घेऊन शेती केली तरच, ‘समृद्ध शेती व उन्नत शेतकरी’ हा संकल्प प्रत्यक्षात येईल. त्यासाठी असे महोत्सव निश्चितपणे उपयुक्त आहेत. फक्त त्याची अंमलबजावणी शेतकºयाला केंद्रस्थानी ठेवूनच झाली पाहिजे. महोत्सवाचा ‘इव्हेंट’ होता कामा नये!