अन्न हे परब्रह्म अशी शिकवण लहानपणापासून घोकतच आपण सर्रास आपल्याच हाताने अन्नात विष कालवतो आणि हे करताना एक प्रकारचा निर्ढावलेपणा आपल्या रोमारोमात भिनला आहे. याचे परिणाम काय होत आहेत हा विचारही करीत नाही. परवा विधानसभेत पतंगराव कदमांवरील शोकसभेत विरोधी पक्षनेते जयंत पाटील जे काही बोलले त्यावरून हे आठवले. अन्नधान्य, फळे, भाज्यांवरील रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या अतिवापरामुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे, असे सांगत त्यांनी या रोगाच्या वाढत्या विळख्याविषयी चिंता व्यक्त केली. हरितक्रांतीच्या झाडाला ही लागलेली विषारी फळे असेच याचे वर्णन करता येईल. याचे भयावह परिणाम तर पंजाबात पाहायला मिळतात. अन्नधान्य उत्पादनाचे विक्रम मोडण्याच्या नादात पंजाबात रासायनिक खते आणि कीटकनाशकांच्या वापराचा अतिरेक झाला आणि कालांतराने राज्यात कर्करुग्णांंची वाढती संख्या हा एक प्रश्नच उद्भवला. आज अमृतसरहून जयपूरला जाणाºया रेल्वेला ‘कॅन्सर एक्स्प्रेस’ असे नावच पडले. या गाडीने कॅन्सर रुग्ण उपचारासाठी जयपुरात जातात, एवढे हे भयानक चित्र आहे. अधिक उत्पादन घेण्याच्या नादात या पदार्थांचा अतिरेक एवढा वाढला की, पिकाची पुढची पिढी अधिक कमकुवत आणि कीटकांची पुढची पिढी विष पचवणारी, अशी परिस्थिती निर्माण झाल्याने कीटकनाशकांचा वापर दिवसेंदिवस वाढत गेला. आज स्वयंपाकघरात येणारी कोणतीही भाजी ही शुद्ध, सकस राहिली नाही. तणनाशक, बुरशीनाशक आणि कीटकनाशक अशा तीन प्रकारच्या वेगवेगळ्या विषारी फवारण्यांतून ती तुमच्या घरात येते. डायफेथेरॉन, सायपरनेट्रीन, प्रोफेनोफॉस, अशी या विषांची ओळख आहे. मूत्राशयावर आघात, श्वसनाचे आजार तर नेहमीची गोष्ट, कॅन्सरचा उद्भव हमखास. याशिवाय वंध्यत्वाचा प्रश्नही गंभीर आकार घेत आहे. फार काय १५-२० वर्षांपूर्वी कॅन्सरचा रुग्ण इतका सहज आढळत नसे. आज उपचारासाठी दवाखान्यात जागा नाही, अशी अवस्था आहे. उदाहरण द्यायचे, तर मेथीच्या भाजीवर देशीदारूत जिब्रालिक अॅसिड मिसळून सर्रास फवारले जाते. यामुळे भाजीची अनैसर्गिक वाढ होऊन ती एक आठवडा अगोदरच बाजारात पाठवता येते. ही अनैसर्गिक वाढ संप्रेरकाची साखळी बिघडवते, तीच भाजी आपल्या आहारात असल्याने त्याचा परिणाम हमखास होणार, यात शंका नाही. भेंडी, हिरवी, ताजी, लुसलुशीत दिसण्यासाठी त्यावर ह्यूमिक अॅसिड फवारतात. खतांच्या बाबतीत तर १०० किलो युरियाच्या पोत्यात ४६ किलो नत्र आणि ५४ किलो रसायन असते. हे रसायन जमिनीला घातक, म्हणजे फायद्यापेक्षा तोटा. यामुळे जमीन कडक, नापीक होते. ती भुसभुशीत करण्यासाठी दुसरे रसायन अशा विषाच्या विळख्यात आपली शेती सापडली आहे. या सर्व अतिवापराने जसा मानवावर परिणाम झाला तसा नैसर्गिक समतोलही ढासळत आहे. हे उत्पादन करणाºया बहुराष्टÑीय कंपन्यांचा विळखा एवढा जबरदस्त आहे की, त्यांनी शेतीचे स्वातंत्र्यच नष्ट केले. भारतीय शेती आज या कंपन्यांवर अवलंबून आहे. उत्पादन खर्च दिवसेंदिवस वाढत आहे. किफायतशीर शेतीसाठी रासायनिक खते आणि कीटकनाशकांचा वापर आवश्यक आहे; परंतु याचा वापर किती करावा, कसा करावा, याचे प्रशिक्षण शेतकºयांना नाही आणि सरकारचे कृषी खाते ते काम करीत नाही. त्यामुळे हेच आजच्या भीषण प्रश्नाचे मूळ कारण आहे. कीटकनाशकाची फवारणी केल्यानंतर किती दिवसांनी पिकाची काढणी करावी, याचे काही नियम आहेत. ३० दिवस, ६० दिवस, पण त्याऐवजी फवारणीनंतर ३० तासांत भाजी, फळे स्वयंपाकघरात पोहोचतात. अशा गोष्टीवर नियंत्रण आणण्यासाठी जागृती आणि यंत्रणा उभी करणे आवश्यक आहे. सेंद्रिय शेतीची चळवळ नव्याने उभी राहत असली तरी एवढ्या प्रचंड लोकसंख्येचे भरणपोषण केवळ सेंद्रिय शेतीने होणार नाही. त्याला रासायनिक पदार्थांची जोड लागणार आहेच. शुद्ध हवा, शुद्ध पाणी आणि सकस अन्न या तिन्ही मूलभूत गोष्टी दुरापास्त झाल्या. हवा दूषित झाली, पाणी प्रदूषित झाले आणि अन्नात विष आपल्याच हातांनी कालवले गेले. हा गंभीर प्रश्न सभागृहात चर्चेला आलाच आहे. यावर सरकारकडून तातडीने काही हालचाल अपेक्षित आहे, नाही तर हे सगळेच काय, पण आयुष्यच नासले आहे.
अन्नात कालवले विष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 1:39 AM