त्या मंडी टोळीचा बंदोबस्त कराच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2018 01:22 AM2018-03-26T01:22:29+5:302018-03-26T01:22:29+5:30

विनाकारण आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही.

The Karachi group arranged for the cot | त्या मंडी टोळीचा बंदोबस्त कराच

त्या मंडी टोळीचा बंदोबस्त कराच

Next

राधाकृष्ण विखे पाटील ज्येष्ठ नेते आहेत. विनाकारण आरोप करून सनसनाटी निर्माण करणे हा त्यांचा स्वभाव नाही. त्यामुळे त्यांनी विधानसभेत एका मंत्र्यावर गुंडांना पाठीशी घालत असल्याच्या केलेल्या गंभीर आरोपाची सरकारने तेवढ्याच तातडीने चौकशी करण्याची गरज आहे. ज्या टोळीचा विखे पाटील यांनी विधानसभेत उल्लेख केला, ती गुंडांची ‘मंडी टोळी’ निश्चितच यवतमाळची आहे. या टोळीकडे चार हजार शस्त्रे आहेत. जागा-घरे खाली करणे, खंडणी वसुली करणे, अवैध सावकारी, सुपारी घेणे असे सर्व उद्योग करणाऱ्या या कुख्यात टोळीला एका मंत्र्याचे पाठबळ आहे, असा गंभीर आरोप विखे पाटील यांनी प्रत्यक्ष सभागृहातच केला. ठोस पुरावे असल्याशिवाय विखेंसारखा ज्येष्ठ नेता असा खळबळजनक आरोप करणार नाही हे सरकारनेही लक्षात घेतले पाहिजे. विशेष म्हणजे त्यांनी ज्या मंत्र्याचा उल्लेख केला त्याचे नाव उघड करण्याचीही तयारी दर्शविली आहे. त्यामुळे यातले सत्य बाहेर काढण्याची आणि योग्य ती कारवाई करण्याची जबाबदारी आपसूकच सरकारवर येऊन पडली आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आणि शालीन राजकारणी म्हणून ओळखले जातात. तेव्हा त्यांनी विखेंच्या आरोपांकडे राजकीय दृष्टिकोनातून पाहू नये. सामान्य माणसाच्या मनात दहशत निर्माण करणाºया गुंडांच्या या टोळीचा बंदोबस्त करायला हवा. शिवाय त्यांच्या मंत्रिमंडळातील सदस्य असलेल्या त्या मंत्र्याचे गुंडांना असलेले पाठबळ खुद्द मुख्यमंत्र्यांनीच मोडून काढायला हवे. यवतमाळकरांनीही या गुंडांच्या दहशतीला बळी न पडता निर्भीडपणे समोर आले पाहिजे. प्रसंगी पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या पाहिजे. विशेष म्हणजे ज्या श्याम जयस्वाल आणि बंटी जयस्वालच्या नावांचा विखे पाटलांनी उल्लेख केला. त्यापैकी श्याम जयस्वाल हे यवतमाळ जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष असून त्यांच्यावर कोणतेच गंभीर गुन्हे नसल्याचे सांगत भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र डांगे यांनी जयस्वालांचे जणू वकीलपत्रच घेतले की काय, असे वाटायला लागले आहे. बंटी जयस्वाल यांचा भाजपशी कुठलाही संबंध नसल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. विखे पाटलांनी आपल्या भाषणात ‘या’ मंत्र्याचे नाव उघड केले नसतानाही डांगे यांनी तातडीने पत्रपरिषद बोलावून यवतमाळचे पालकमंत्री मदन येरावार यांचा मंडी टोळीशी संबंध नसल्याचे सांगत संशयाला वाट मोकळी करून दिली आहे. विखे पाटलांनी याबाबतचे पुरावे असल्याचा दावा केला आहे. तेव्हा त्यांनी ते पुरावे खरोखरच जाहीर करायला हवे. लोकांपुढे या दहशतीची लख्तरे टांगायला हवी. तसे झाले नाही तर विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेतेदेखील त्या गुंडांना घाबरतात की काय, असा संदेश जनतेत जाऊ शकतो. लोकशाहीत विरोधी पक्ष नेतेपद हे अतिशय महत्त्वाचे मानले जाते. त्यामुळे आता विखे पाटलांची जबाबदारी स्वाभाविकच वाढली आहे.

Web Title: The Karachi group arranged for the cot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.