- मिलिंद कुलकर्णी
भूक लागलेले बाळ रडून आईचे लक्ष आपल्याकडे वेधते. त्याचा आक्रोश ऐकून आई हातातली कामे सोडून बाळाकडे धाव घेते. त्याची भूक भागवते. मूल थोडे मोठे झाल्यावर इच्छित वस्तू मिळविण्यासाठी आधी आर्जवे करतं, तरीही पालकांचे दुर्लक्ष कायम राहिल्यास आदळआपट करुन लक्ष वेधून घेते. हीच स्थिती मायबाप सरकार आणि समाजाविषयी म्हणता येईल. आपल्या मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी समाजातील विविध घटक निवेदने देतात. सरकारदरबारी निवेदनांचे काय होते, हा संशोधनाचा विषय झाला आहे. पण त्या निवेदनांचा काही फारसा उपयोग होत नाही. मग आंदोलनाचे हत्यार उपसले जाते. महात्मा गांधी यांनी दाखविलेल्या मार्गानुसार धरणे आंदोलन, निदर्शने, रस्ता रोको, जेलभरो, घेराव आंदोलन, बंद अशी सामूहिक आंदोलने केली जातात. लाक्षणिक उपोषण, आमरण उपोषणासारखे वैयक्तिक वा सामूहिक रीत्या क्लेश करून घेणारी आंदोलने केली जातात. अधिकाऱ्यांच्या आश्वासनांतर या आंदोलनांची सांगता होते. विधिमंडळ वा संसदीय अधिवेशन काळात आंदोलनांची संख्या अधिक असते. या काळातील आंदोलनाने सरकार हलते, दखल घेते असा समज रुढ झाला आहे. त्यासोबतच विकेंद्रीकरणाचे दावे होत असले तरी मुंबई व दिल्लीत अधिकार केंद्रित झाले असल्यामुळे आंदोलनकर्ते तेथे जमतात, हा सार्वत्रिक अनुभव आहे. त्यामुळे अधिवेशन काळात मुंबई, नागपूर व नवी दिल्ली येथे मोठ्या संख्येने आंदोलने होताना दिसतात. राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना अलिकडे मोर्चा वा बंद सारखे आंदोलन करीत असताना सामान्य माणसाला त्रास होणार नाही, याची काटेकोर काळजी घेताना दिसू लागले आहेत. आंदोलनाची वेळ येणे म्हणजे, सर्व मार्ग खुंटल्याने समाज यासाठी सज्ज होतो, असेच म्हणावे लागेल. आंदोलनातील सहभागी घटकांमध्ये आक्रोश असतो. परंतु हा आक्रोश नियंत्रित करून त्याचा समाजाला त्रास होऊ दिला जात नाही. मोर्चा सुरू असताना वाहतूक सुरळीत राहील, रुग्णवाहिका, अग्निशामक दलाच्या गाडीला वाट करून दिली जाईल, हे आवर्जून पाहिले जाते. आंदोलनकर्त्यांच्या या सहृदयतेचे जनसामान्यांकडून स्वागत होते. आंदोलनादरम्यान, एस.टी.च्या गाड्या, दुकाने यांच्यावर दगडफेक, जाळपोळ असे समीकरण रुढ झालेले असताना या नवीन बदलाची समाजाकडून नोंद घेतली जात आहे. आंदोलनकर्त्यांना पाणी, जेवण देण्याची व्यवस्था आता समाजातील विविध घटकांकडून केली जात आहे. मोर्चा मार्गस्थ झाल्यावर तेथील रस्ता वा परिसराची स्वच्छता आयोजक स्वत: करू लागले आहेत. वाद समाजाशी नव्हे तर सरकारशी आहे, हे लक्षात घेऊन आंदोलनकर्ते स्वयंशिस्तीचे पालन करीत आहे. त्यामुळे समाजातदेखील आंदोलनाविषयी विश्वासार्हता आणि स्वीकारार्हता वाढत चालली आहे. आंदोलनामधील हा नवीन आयाम सज्जनशक्ती व सकारात्मकतेला बळ देणारा ठरत आहे.