भाऊंच्या दुधात लातूरचे पाणी

By admin | Published: July 4, 2016 05:38 AM2016-07-04T05:38:54+5:302016-07-04T05:38:54+5:30

काही योजना पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राबवायच्या असतात. वृक्षलागवडीच्या कामात हे दिसून आले. ज्यांनी ज्यांनी वृक्षारोपण केले त्या सगळ्यांचे खूप अभिनंदन!!

Latur water in brother's milk | भाऊंच्या दुधात लातूरचे पाणी

भाऊंच्या दुधात लातूरचे पाणी

Next


काही योजना पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून राबवायच्या असतात. वृक्षलागवडीच्या कामात हे दिसून आले. ज्यांनी ज्यांनी वृक्षारोपण केले त्या सगळ्यांचे खूप अभिनंदन!!
राज्यात दोन कोटी झाडे लावण्याचा उत्तम उपक्रम शनिवार-रविवार उत्साहात पार पडला. एखादी सरकारी योजना मनापासून राबवली तर त्याला किती चांगले स्वरुप येऊ शकते याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्यासाठी राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांना शंभर पैकी शंभर मार्क दिले पाहिजेत. एकाच दिवसात दोन कोटी झाडे लावण्याचा उपक्रम पहिल्यांदाच घडत आहे. याआधी वनमंत्री पतंगराव कदम यांनी १०० कोटी झाडे लावण्याची घोषणा केली. मात्र त्याचे पुढे काय झाले कोणालाही ठाऊक नाही. मात्र एक झाड लावण्यासाठी खड्डा खोदण्याचे किती, मातीचे किती, रोपट्याचे किती गुणीले १०० कोटी म्हणजे किती असे हिशोब करण्यात अधिकारी व्यस्त राहिले. परिणामी चांगल्या कल्पनेचे मातेरे झाले.
याउलट काम मुनगंटीवार यांनी केले. ते वित्त मंत्रीही आहेत. दोन कोटी झाडांसाठी दहा पाच कोटी खर्च करणे आणि त्यातून झाडे लावणे त्यांना अशक्य नव्हते. पण तसे न करता हा विषय जनतेच्या घरात नेऊन ठेवण्याचे मोठे काम त्यांनी केले. त्या आधी गेल्या वर्षीच्या बजेटमध्ये त्यांनी आधुनिक नर्सरीसाठी अठरा कोटींची तरतूद केली. ५० कोटी झाडांचे मिशन ठरवून बजेटमध्ये निधी ठेवला. त्यानंतर ते जनतेत गेले. २१ समाजाचे धर्मगुरु, विविध बँकांचे अधिकारी, उद्योग जगातले धुरीण, आर्ट आॅफ लिव्हींग ते रामदेवबाबा, पंतप्रधान ते शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे; त्यांनी भेटीगाठीचा सपाटा लावला. मंत्रिमंडळ कामाला लावले. पालक सचिव ते शाळेची मुलं, प्रत्येकाला झाडं का लावली गेली पाहिजेत हे पटवून देण्यासाठी हा माणूस मंत्रिपदाची झूल बाजूला सारुन राज्यभर दिवसरात्र फिरला. जो ज्या जाती धर्माचा आहे आणि त्या धर्मात ज्या झाडाचे महत्व आहे ते झाड लावा असे सांगण्यासही त्यांनी मागे पुढे पाहिले नाही. मनापासून केलेल्या कामानेच लोकांना ही योजना आपली वाटू लागली. टक्केवारीत रमणाऱ्या मंत्री अधिकाऱ्यांना तुम्ही किती झाडे लावली तेवढेच सांगा असे विचारणारे सुधीरभाऊ वेडे वाटले असतीलही पण अशा वेडेपणातच क्रांतीची बिजे रोवली जातात हा इतिहास आहे.
महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्र ३.७ लाख चौरस मीटर आहे. पैकी केवळ ६० हजार चौरस मीटरवर झाडे आहेत. शासकीय नियमानुसार ३३ टक्के वनक्षेत्र निर्माण होण्यासाठी ४०० कोटी झाडे लावण्याची गरज आहे. हे काम सरकार नावाच्या यंत्रणेकडून करायचे ठरवले तर पुढच्या कैक पिढ्या जाव्या लागतील. मराठवाड्यात भीषण दुष्काळ आहे व फक्त ४.६५ टक्के जंगल शिल्लक आहे पण ज्या लातूरला रेल्वेने पाणी देण्याची वेळ आली तेथे तर फक्त ०.०७ टक्के एवढीच वृक्षसंपदा उरलेली आहे. जमिनीत पोषक द्रव्येच उरलेली नाहीत. एक हजार वर्षापूर्वीच्या पाण्याचा उपसा तरी किती करणार? ओसाड माळरानांमध्ये साधी चिमणी फिरकत नाही तेथे माणसं कशी राहाणार? पण याचा विचार लातूरच्या अधिकाऱ्यांना राहिला नाही. महानगरपालिकेने झाडांसाठी खड्डे केले पण त्यात रोपं नुसतीच ठेवून दिली. दुपारी ती रोपं झोपून गेली. लातूरच्या रविंद्र जगतापने हा प्रकार उघड केला. पाण्यासाठी दारोदार भटकण्याची वेळ आलेल्या या शहरात झाडं लावण्यातही असा करंटेपणा उघड व्हावा यासारखे दुर्देव नाही. बंद मंदिराचा गाभारा दुधाने भरण्याचा पण करणाऱ्या राज्यात दुसरा दूध टाकेल, मी पाणी टाकले तर काय बिघडले असा विचार करत सगळ्यांनी पाणी टाकल्याची कथा लहानपणी वाचली होती. पण आजही त्या वृत्तीचे अधिकारी जर राज्यात चांगल्या दुधात मिठाचा खडा टाकत असतील आणि त्याचे पातक येणाऱ्या अनेक पिढ्यांना भोगावे लागणार असेल तर असे वागणाऱ्या अधिकाऱ्यांना जनतेनेच भर चौकात फटके दिले पाहिजेत.
सगळे काही सरकारनेच केले पाहिजे या वृत्तीतून कधीतरी बाहेर पडले पाहिजे. आज जर आम्ही या अशा योजनांमध्ये सक्रीय सहभागी झालो नाही, तर येणाऱ्या पिढ्या कधीही माफ करणार नाहीत. युती सरकारने योजना आणली असली तरी यात राजकारण न आणता शरद पवार आणि धनंजय मुंडे यांनी वृक्षारोपणात सहभाग घेतला, त्यांचेही अभिनंदन! चला आता झाडं जोपासूया...
- अतुल कुलकर्णी

Web Title: Latur water in brother's milk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.