निदान क्रिकेटला (तरी) धर्मापासून दूर राहू द्या !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 07:06 AM2021-02-15T07:06:52+5:302021-02-15T07:08:10+5:30
cricket : जे कधीही देशात घडलं नाही, ते आता घडतं आहे. धार्मिक विखाराच्या वणव्यात देशाला एकतेच्या सूत्रात जोडणारा क्रिकेट नावाचा धागा जळता कामा नये!
- मेघना ढोके
(मुख्य उपसंपादक,लोकमत)
‘मुझे स्टेट के नाम ना सुनाई देते है, ना दिखाई देते है... सिर्फ एक मुल्क का नाम सुनाई देता है... इं-डि-या!’
‘चक दे इंडिया’ सिनेमातलं प्रशिक्षक कबीर खानच्या तोंडचं हे वाक्य. हे वाक्य सिनेमातच; एरव्ही भारतीय संघराज्यात राज्य, धर्म, जात, पोटजात, भाषा असे अनेक भेद. मात्र, या साऱ्याला या देशात जर काही अपवाद असेल तर ते म्हणजे ‘क्रिकेट’.
या खेळात मैदानावर कामगिरी करायची, भारतीय संघात अंतिम किमान १६ जणांत स्थान मिळवायचं तर ना भाईभतीजा राजकारण चालतं, ना घराणेशाही, ना धन आणि बलसत्तेचा जोर. तिथं चालते फक्त कामगिरी. त्याच कामगिरीच्या जोरावर एका प्राध्यापकाचा मुलगा तेंडुलकर नावाचा देव होतो, पंपमॅनचा मुलगा द ग्रेट धोनी होतो आणि रिक्षाचालकाचा मुलगा, आपले वडील निवर्तले तरी आपण राष्ट्रीय कामगिरीवर आहोत याचं भान् ठेवून मैदानात उतरतो आणि देशासाठी खेळण्याचं वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं म्हणून राष्ट्रगीताला उभं असताना साऱ्या दुनियेसमोर अभिमानानं डोळ्यातल्या अश्रूंना वाट करुन देतो.
भारत नावाच्या या देशाला जर कुठल्या सुत्रानं बांधलं असेल, तर ते सूत्र आहे - क्रिकेट. हातात बॅट घेऊन क्रिकेटर व्हायचं स्वप्न पाहणारा कुठल्याही जात-धर्म-पंथ-भाषेतला मुलगा आणि मुलीचं ध्येय एकच असतं - ‘मला देशासाठी खेळायचंय!’
भारतीय क्रिकेटचा स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आज स्वातंत्र्योत्तर सत्तर वर्षांचा इतिहास सांगतो की, बीसीसीआयचा संघ म्हणून कुणी, कितीही नाकं मुरडली तरी क्रिकेटने या देशाला जोडून ठेवलं. भारतीय संघ खेळतो तेव्हा त्यांचा विजय-पराजय साऱ्या देशाचा असतो.
सन १९४७ ते २०२१ या दरम्यान हे वास्तव बदललं नाही. हे असं असताना या देशाच्या क्रिकेट वर्तुळात ‘धर्म’ कधी आणि कसा पोहोचला?
निमित्त आहे वसीम जाफरला द्याव्या लागलेल्या राजीनाम्याचं. देशभरातल्या क्रिकेट वर्तुळाला जाफरचं क्रिकेट पॅशन, त्याची निष्ठा, त्याचं कमबॅक करणं हे सारं माहितीच आहे. त्या जाफरवर आरोप झाले की, त्याने उत्तराखंड क्रिकेट संघात धार्मिक भेदभाव करत मुस्लिम खेळाडूंना पुढे केलं, धर्माच्या आधारावर संघ निवड करण्याचा प्रयत्न केला.
उत्तराखंड क्रिकेट संघटनेचे सचिव माहिम वर्मा यांनी तसा आरोप केला. त्यावर राजीनामा देताना जाफरने स्पष्ट केलं की, आपण धार्मिक भेदभाव केला नाही तर उत्तराखंड संघटनेतल्या पदाधिकाऱ्यांनीच ‘लायक’ नसलेल्या खेळाडूंना संघात स्थान देत संघ निवडीत हस्तक्षेप केला! - आता हा वाद पेटलेला आहे. माध्यमं ते समाजमाध्यमं यावर आपापले कंपू करत लोक लिहीत सुटले आहेत. मात्र, या वादाने जे आजवर कधी घडलं नव्हतं ते केलं. ते जास्त गंभीर, घातक, भयप्रद आहे. ती धोक्याची सूचना सांगते की, पदाधिकाऱ्यांसह प्रेक्षकांनीही वेळीच भानावर येत क्रिकेटच्या ड्रेसिंग रुमपासून तरी धर्म-भेद लांब ठेवले पाहिजेत. ते इतकी वर्षे लांबच होते, म्हणून तर क्रिकेट हा ‘भारताचा’ खेळ झाला.
आजवरचा इतिहास पहा, भारतानं स्वातंत्र्योत्तर पहिला कसोटी सामना खेळला तेव्हा कप्तान होते नवाब इफ्तीकार पतौडी. भारत-पाकिस्तान फाळणी नुकतीच झालेली होती, हिंदू-मुस्लिम भेदाची जखम भळभळतच होती, पण म्हणून पतौडी कप्तान असण्याला कुणी धार्मिक रंग दिले नाहीत. (हे पतौडी म्हणजे तैमूर सैफ अली खानचे पणजोबा, माहितीस्तव!) त्यांच्यानंतर नवाब मन्सूर अली खान पतौडी भारताचा कप्तान झाला. सलीम दुराणी, दिलावर हुसेन, सय्यद किरमाणी, फारुक इंजिनिअर, अब्बास अली बेग ते झहीर खान, कैफ, मुनाफ पटेल, युसुफ आणि इरफान पठाण, मोहंमद शामी ते मोहंमद सिराज इथपर्यंत अनेक नामांकित मु्स्लीम खेळाडू भारतीय संघात खेळले आणि भारताचे नाव त्यांनी उज्ज्वल केले.
सगळ्यात महत्त्वाचं नाव म्हणजे मोहंमद अझरुद्दीन. नव्वदच्या भयानक अस्वस्थ दशकात अझर कप्तान होता. त्याच्यावर सामना निश्चितीचे आरोप झाले. पण अत्यंत धार्मिक असलेल्या अझरवर कधीही धार्मिक भेदभावाचे आरोप झाले नाहीत. धर्म कधीही क्रिकेटपेक्षा मोठे झाले नाहीत. जे कधीही देशात घडलं नाही, ते आता घडतं आहे. वेळीच सावरलं नाही तर धार्मिक विखाराचा हा वणवा देशाला एकतेच्या सुत्रात जोडणाऱ्या क्रिकेट नावाच्या धाग्यालाही जाळून टाकेल. तात्कालिक वादापेक्षा हे भय मोठं आहे.