तर्कदुष्ट मांडणी
By admin | Published: February 18, 2016 06:47 AM2016-02-18T06:47:52+5:302016-02-18T06:47:52+5:30
शरद पवार तार्किक बोलतात अशी त्यांची ख्याती आहे. पण मुस्लीम तरुणांबाबत त्यांनी मांडलेले विचार केवळ अतार्किकच नव्हे तर तर्कदुष्ट म्हणावे असेच आहेत.
सामान्यत: शरद पवार तार्किक बोलतात अशी त्यांची ख्याती आहे. पण मुस्लीम तरुणांबाबत त्यांनी मांडलेले विचार केवळ अतार्किकच नव्हे तर तर्कदुष्ट म्हणावे असेच आहेत. शैक्षणिक सुविधांअभावी मुस्लीम तरुण इसीससारख्या दहशतवादी संघटनांकडे आकर्षित होत असल्याचे विधान त्यांनी केले आहे. शिक्षण आणि त्याच्या माध्यमातून प्राप्त होणारा रोजगार यापासून मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणावर वंचित राहिला किंवा ठेवला गेला हे तर सर्वझातच आहे. त्यात नवे असे काही नाही. परिणामी या वास्तवावर व त्यामागील कारणांवर सातत्याने ऊहापोहदेखील होतच असतो. पण केवळ मुस्लीम समाजच शिक्षणापासून वंचित राहिला आहे असे नव्हे. अनुसूचित जमाती आणि भटक्या-विमुक्त जाती-जमाती यादेखील तितक्याच वंचित आहेत. मुस्लीम समाजाच्या तुलनेत त्यांचे देशाच्या लोकसंख्येतील प्रमाण कमी असल्याने त्याचा फार गवगवा होत नाही इतकेच. पण त्या वर्गातील तरुण दहशतवादाकडे झुकल्याचे अद्याप तरी दिसून आलेले नाही. मुळात संपूर्ण मुस्लीम समाजातील युवक दहशतवादाकडे झुकत असल्याचेही कोणाच्या निदर्शनास आलेले नाही. त्याबाबत सामाजिक माध्यमेच अधिक उथळपणा करीत असल्याचे मध्यंतरी प्रसिद्ध झाले होते. त्यातून देशातील काही गुप्तहेर संघटनांनी इसीसच्या जाळ्यात अडकलेल्या किंवा अडकू पाहाणाऱ्या ज्या मोजक्या मुस्लीम युवकाना ताब्यात घेतले ते केवळ शिक्षितच नव्हे तर उच्च आणि तांत्रिक शिक्षण घेतलेले असल्याचे दिसून आले. म्हणजे येथेच पवारांचा तर्क ढासळून पडतो. परिणामी पवारांच्या तर्कानुसार शिक्षणाच्या अभावी का होईना मुस्लीम युवक दहशतवादी होत आहेत असे विधान करण्यात त्या समाजातील युवकांवर एक गर्भित आरोप आहे. त्यामुळे शिक्षणाचा अभाव आणि दहशतवादाचे आकर्षण यात संबंध नाही. तरीही पवार म्हणतात त्याप्रमाणे त्या समाजात शिक्षणाचा अभाव आहे हे खरेच. पण तो केन्द्र आणि राज्य सरकारांनी जाणीवपूर्वक निर्माण केला आहे वा त्याकडे डोळेझाक केली आहे असा जो आरोप, आक्षेप वा निष्कर्ष पवार नोंदवितात त्यातील सरकार म्हणजे नेमके कोण? खुद्द शरद पवार दीर्घकाळ महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले आहेत व केन्द्रातही ते मंत्री होतेच. मग त्यांनी याबाबत काय केले? की काही केले नाही म्हणून ही पश्चातबुद्धी?