लोकमत संपादकीय - प्रतिक्रिया थंड का?
By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 06:44 AM2019-02-22T06:44:25+5:302019-02-22T06:45:06+5:30
दहशतवाद कधी जिंकत नाही आणि तो कधी हरतही नाही.
पुलवामातील हल्ल्यानंतर मोजक्या देशांनी माफक निषेध केला. बडी राष्ट्रे ठामपणे पाठीशी असल्याचे दिसले नाही. बहुतांश शेजारी देश सोयीस्कर मौन बाळगून असल्याने जगात भारताचे मित्र किती, असा प्रश्न पडतो. या निषेधानंतरही पाकिस्तान शांत नाही. उलट त्या देशाची कृती दहशतवादाचे बळ वाढवणारी आहे.
दहशतवाद कधी जिंकत नाही आणि तो कधी हरतही नाही. मरणाच्या तयारीने येणारी माणसे परततानाही ती तयारी मनात घेऊनच परततात. दहशतवादातला अखेरचा माणूस पडेपर्यंत बहुदा ती लढाई सुरू राहते. तशी नसेल तर ती भूमिगत राहते. त्यामुळे दहशतवादाला तोंड देणाऱ्यांना सदैव सावध राहून त्याच्यावर नजर ठेवावी लागते. नक्षलवाद्यांना अत्याधुनिक शस्त्रे वापरताना आपण भारतात पाहिले आहे. काश्मिरातील तरुण स्त्री-पुरुषांनी दगडफेक करणे हाही या प्रकाराचा दुसरा भाग आहे. आज या घटनांची अशी आठवण काढण्याचे मुख्य कारण, ४४ जवानांची हत्या केल्यानंतर व त्या हत्याकांडाचा निषेध साºया जगाने केल्यानंतरही पाकिस्तान शांत नाही. त्यानंतरही एका लष्करी अधिकाºयासह चार भारतीयांची हत्या पुन्हा पुलवामा क्षेत्रातच झाली. मरणाºयांत एक साधा नागरिक आहे हे लक्षणीय. हत्याकांडाच्या या सर्वात भीषण प्रकारानंतर भारताचे सरकार फार सावधपणे व सजगपणे वागले असे मात्र नाही. मुळात अडीच हजार जवानांची ने-आण तांत्रिकदृष्ट्या योग्य पद्धतीने न झाल्याने आता ती हवाई मार्गे करण्याचे ठरले. सारा देश, सरकार व विरोधी पक्ष पाकिस्तानच्या निषेधात गुंतले असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी जणू फारसे काही घडले नसावे अशा थाटात विदर्भातील पांढरकवडा व धुळे क्षेत्रातील त्यांच्या प्रचार दौºयावर गेले. त्यावेळच्या सभांमधून त्यांनी निवडणुकीचा प्रचार केला व ‘तुम्ही आम्हाला मते देणार की नाही’ हा प्रश्न उपस्थितांना जाहीरपणे विचारला. देशाचे ४४ जवान शहीद झाल्यानंतरची पंतप्रधानांची ही कृती जगालाही बरेच काही सांगणारी व त्यांच्या बेदरकारपणावर प्रकाश टाकणारी आहे. त्यानंतर लगेचच चौघांची हत्या झाली. या घटनाक्रमात जग कसे वागले हेही लक्षात घेण्याजोगे आहे. रशियाचे पुतीन म्हणाले, ‘सरकारने या हल्ल्याला सडेतोड उत्तर दिले पाहिजे.’ मात्र त्याबाबत भारताचे एकेकाळचे स्नेही म्हणून आपलीही काही जबाबदारी आहे याची वाच्यता त्यांनी केली नाही. चीन प्रेक्षक होता. त्याला या घटनेचे साधे दु:खही झाल्याचे दिसले नाही. त्या देशाच्या अध्यक्षाने गांधीजींचा चरखा साबरमतीत चालविला. पण त्याचाही त्यांच्यावर कोणता परिणाम झालेला दिसला नाही. अफगाणिस्तानातूून अमेरिकेचा पाय निघत नाही तोवर पाकची मर्जी सांभाळणे भाग असल्यासारखी ट्रम्प यांची प्रतिक्रिया होती. अन्य पाश्चात्त्य देशांनाही भारताशी काही घेणे-देणे राहिले नाही, असेही या घटनाक्रमाने दाखवून दिले. सगळे देश आपापल्या सोयीनुसार या हल्ल्याबाबत मौन बाळगून आहेत. त्यांची तटस्थता बरेच काही सांगून जाते. एकट्या संयुक्त राष्ट्रसंघाने या घटनेचा निषेध केला. पण तो त्यांच्या कर्तव्याचा भाग होता. बड्या राष्टÑांचे सोडा; पण या घटनेविषयी म्यानमार, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका वा मॉरिशस या शेजारी देशांनीही त्यांचे तोंड उघडल्याचे कुठे दिसत नाही. भारताचे जगातले मित्र कोण, हा प्रश्न पडावा असे हे वास्तव आहे. पाकिस्ताननेही या घटनेबाबत खंत किंवा खेद व्यक्त केला नाही. उलट भारतावर आरोप केले आणि आत्मघाती हल्ल्यात मरण्यास काश्मिरी तरूण का तयार होतो, असा प्रश्न विचारून काश्मीर प्रश्नाची अफगाणिस्तानशी तुलना केली. हा प्रकार दहशतवाद्यांचे बळ व साहस यांना बळकटी देणारा आहे आणि भारताचे जगातले एकाकी असणे उघड करणाराही आहे. जवान मारले जातात, दहशतवादी कारवाया थांबत नाहीत, बडी राष्टÑे गप्प असतात, शेजाºयांना बोलता येत नाही, देश निषेधासाठी एक होतो आणि पंतप्रधान मात्र मते मागत फिरतात. याही परिस्थितीत देशातले त्यांचे प्रचारी कार्यक्रम व्यवस्थित पार पडतात ही स्थितीच एखाद्याला विचित्र व अस्वस्थ वाटायला लावणारी आहे. संसदेत सर्वपक्षीय निषेधसभा झाली. तिला झाडून साºया पक्षांचे नेते हजर होते. त्यातील अनेकांच्या डोळ्यात अश्रूही होते. नव्हते ते फक्त पंतप्रधान. ‘माझ्याही मनात शोक आहे’ असे ते म्हणाले. ‘आम्ही पाकिस्तानला धडा शिकवू’ अशी भाषाही त्यांनी केली. माध्यमांनी तशा कारवाईचे मुहूर्तही देशाला सांगितले. प्रत्यक्षात मात्र आमच्या प्रतिक्रिया थंडच राहिल्या आहेत हे वास्तव आहे.