लोकमत 'वसंतोत्सव'... जनमानस जिंकलेले वसंतदादा पाटील

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2018 06:36 PM2018-03-13T18:36:17+5:302018-03-14T10:55:23+5:30

लोकनेत्याला मोठेपणा लाभतो. कारण त्याने पैशापेक्षा माणसे पेरण्याचे काम केले म्हणून त्यांना `माणसांच्या बँके'चा श्रीमंत मॅनेजर म्हणत. एवढा हा श्रीमंत माणूस. लोकनेत्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावे लागते. त्याला लोकमताचा आदर करावा लागतो.

lokmat vasantotsav popular former Maharashtra chief minister vasantdada patil  | लोकमत 'वसंतोत्सव'... जनमानस जिंकलेले वसंतदादा पाटील

लोकमत 'वसंतोत्सव'... जनमानस जिंकलेले वसंतदादा पाटील

googlenewsNext

- रवींद्र वासुदेव गाडगीळ

लोकनेत्याला मोठेपणा लाभतो. कारण त्याने पैशापेक्षा माणसे पेरण्याचे काम केले म्हणून त्यांना `माणसांच्या बँके'चा श्रीमंत मॅनेजर म्हणत. एवढा हा श्रीमंत माणूस. लोकनेत्याला सगळ्यांना बरोबर घेऊन काम करावे लागते. त्याला लोकमताचा आदर करावा लागतो. पक्षकार्यकर्ते व विरोधी पक्षनेत्यांचे प्रश्न, त्यांच्या अडचणी, त्यांच्या सूचना समजावून घ्याव्या लागतात. दादांनी विधायक कामासाठी सहकार्याचा हात नेहमीच पुढे केला. लोकनेता आश्वासनांवर किंवा  घोषणेवर जगत नाही. तो जगतो तो जनसामान्यांच्या प्रेमावर व त्यांच्याच हृदयसिंहासनावर विराजमान होतो. त्याचे कारण त्याने कार्य करून जनमानस जिंकलेले असते. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातले महान योद्धे, संघटना, कुशल नेते, कृषी-औद्योगिक क्रांतीचे प्रवर्तक, राजकारण धुरंधर, सहकार महर्षी इतक्या पदव्या-बिरुदावल्या त्यांना त्यांच्या चाहत्यांच्या `जनपीठा'कडून मिळाल्या आहेत त्या केवळ त्यांच्या स्वकर्तृत्वावर व त्यांच्या एकनिष्ठ कार्यकर्त्यांमुळे. कारण त्यांनी सतत `माणूस' हा केंद्रबिंदू मानून त्याच्यासाठीच कार्यरत राहीले. 

जनसामान्यातून वर आलेले असल्याने त्यांनी `वरं जनहितम्' हे सूत्र समोर ठेवून राज्यकारभार केला. त्यामुळे जनतेचे अलोट प्रेम त्यांना मिळत गेले. कार्यकर्त्यांनीही मतभेद विसरून एकमेकांच्या सहकार्याने, एकजुटीने कार्य करावे व पक्ष तसेच राष्ट्र मजबूत करावे यावर त्यांचा कटाक्ष होता. कोणताही पक्ष मजबूत होतो तो समर्पित भावनेने काम करणार्‍या  सामान्य कार्यकर्त्यांच्या बळावर आणि निरपेक्ष बुद्धीच्या नेत्यांमुळे. आपण काय काम करतो याचे विश्लेषण प्रत्येकाने करावयास हवे. पक्षातील प्रत्येक कार्यकर्ता आत्मशोध करेल, नव्हे कठोर आत्मनिरीक्षण करेल, तरच पक्षसंघटना मजबूत होईल. कार्यकर्ते व नेते यांना जनतेचे प्रश्न समजावून घेऊन ते सोडविण्याचे भान हवे आणि पक्षाच्या कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यासाठी नेते व कार्यकर्ते एकदिलाने काम करू शकले पाहिजेत, असा आग्रह दादांचा असे. नेत्यांनी कार्यकर्त्यांना सांभाळले पाहिजे. त्यांना चुकेल तेथे कठोरपणे बजावले पाहिजे. त्यांना सतत मार्गदर्शन केले पाहिजे. दादा नेहमी निर्भयपणे बोलत, पण नेमके सत्य बोलून जात. 

`महाराष्ट्रात मुंबई आहे, परंतु मुंबईत महारष्ट्र नाही', हे प्रखर सत्य सांगितले आणि शिवशाहीचे राज्य येण्यास मार्ग सुकर झाला. दादा सत्यच बोलत. पदापेक्षा पक्षकार्य मोठे व महत्त्वाचे असल्याने येईल त्याचे लक्षपूर्वक ऐकत राहिले. सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन काम करीत राहीले आणि पुढारीपणाचा वाद व सत्तास्पर्धा यापासून चार हात दूर राहू शकले. वसंतदादांनी सहकारी तत्वावर साखर कारखान्यांची निर्मिती केली. त्यातून त्यांनी ग्रामीण भागाचा कायापालट करून कृषी औद्योगिक क्रांतीची मेढ रोवली. त्याद्वारे जनतेचे आर्थिक व सामाजिक प्रश्न सोडवले. आर्थिक पिळवणुकीतून शेतकर्‍यांची सुटका करण्यासाठी अन्न-धान्य पिकवण्याबरोबर रोख पैसा देऊ शकणारी पिके घ्यावसाय लावली. शेती किफायतशीर झाली तरच देशाचे आर्थिक स्थैर्य टिकेल, उद्योगाची सांगड शेतीशी घातली पाहिजे, ही दादांची दृष्टी होती. एक साखर धंदा उभा राहिला, तर ग्रामीण भागांच्या अनेक समस्या सुटून नवनवीन सुधारणा होऊन प्रत्येक क्षेत्राच्या विकासाला अनेक दिशा लाभू शकतात. त्याला पूरक उद्योग, लघुद्योग, कुटिरोद्योग, गृहोद्योग सुरू होतात. नोकर्‍यांचा प्रश्न सुटून बेकारी नष्ट होते. सामान्य माणसासाठी समृद्धीच्या वाटा मोकळ्या होतात. हे त्यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले. विकास व संशोधन यांचे अतूट नाते यातून निर्माण होते. 

ग्रामीण जनतेच्या विकासाची चिंता सतत बाळगणारा लोकाभिमुख कार्यकर्त्यांला व नेत्याला नवनव्या प्रश्नांचे भान सतत बाळगावे लागते. म्हणून त्यांनी शेती, संशोधन, सहकार, शिक्षण, प्रशिक्षण, उद्योग यांच्यात परस्पर संबंध निर्माण करण्याचा सतत प्रयत्न केला. आज सांगली जिल्हा हा विकासाचा आदर्श नमुना म्हणून राष्ट्राला प्रख्यात व अनुकरणीय आहे.

राज्यकर्ते जे भलेबुरे निर्णय घेतात, त्याचे दूरगामी परिणाम समाजजीवनावर होत असतात. काही अडचणींचे तर काही सामाजिक विकासासाठी फलद्रूप होतात. नव्या प्रश्नांना सामोरे जावे लागते. प्रश्नातून प्रश्न निर्माण होऊन निर्णय घेण्याची प्रक्रिया गुंतागुंतीची होते. निर्णय घेताना `जनकल्याण' समोर ठेवावे लागते आणि  ते जनतेला विश्वासात घेऊन नीट अमलात आणावे लागते. त्यांनी विनाअनुदान तत्त्वावर तंत्रनिकेतन व अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू करण्याचा निर्णय घेतल्याने शिक्षण व्यवस्थेवर त्याचा दूरगामी सकारात्मक परिणाम झाला. मुलींना दहावीपर्यंत मोफत शिक्षण, मुक्त विद्यापीठांची स्थापना अशा निर्णयामुळे राज्याची पावले प्रगतीच्या आणि समृद्धीच्या दिशेने पडू लागली.

माणूस हेच दादांचे कधी न संपणारे भांडवल. तरुणांनी बदलत्या काळात पावले ओळखून नेहमी नूतन आव्हाने स्वीकारली पाहिजेत, असे ते तरुणांना सांगत. कारण तरुणच हा देश `सुजलाम सुफलाम' करतील. सद्यस्थितीत राजकारण व समाजकारण करण्यासाठी उपयुक्त मार्गदर्शक ठरेल असे हे `वसंत वैभव'. एकदा तरी वाचावेच!

ravigadgil12@gmail.com

Web Title: lokmat vasantotsav popular former Maharashtra chief minister vasantdada patil 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.