आधी वंदू तुज मोरया - चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती!
By दा. कृ. सोमण | Published: August 23, 2017 01:29 PM2017-08-23T13:29:42+5:302017-08-28T11:39:37+5:30
श्रीगणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती होता. आज आपण त्या चौदा विद्या व चौसष्ट कला कोणत्या होत्या ते जाणून घेऊया.
श्री गणेश स्थापना केल्याचा आज चौथा दिवस आहे. श्रीगणेशमूर्ती घरात आल्यावर आपल्या घरात आनंदाचे व चैतन्याचे वातावरण निर्माण झाले आहे. घरात प्रसन्नता निर्माण झाली आहे. आप्तेष्ट मित्र यांच्या भेटी झाल्याने आनंद द्विगुणित झाला आहे. श्रीगणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती होता. आज आपण त्या चौदा विद्या व चौसष्ट कला कोणत्या होत्या ते जाणून घेऊया. प्रथम विद्या म्हणजे काय ते पाहूया. विशिष्ट अध्ययन सामग्रीच्या द्वारे प्राप्त होणारे ज्ञान याला विद्या म्हणतात. ज्ञान हे पवित्रतम असल्यामुळे भारतीय संस्कृतींत विद्येला देवता मानले आहे. मानवी संस्कृतीच्या विकासात ज्ञानोपासनेला फार महत्व आहे. ज्ञानासारखी दुसरी पवित्र गोष्ट नाही असे भगवद्गीतेमध्ये म्हटले आहे. श्रीगणपतीला चौदा विद्या अवगत होत्या. त्याकाळी चौदा प्रकारच्या विद्या होत्या. आता कालांतराने त्यामध्ये खूप वाढ झालेली आहे. थोडक्यात सांगावयाचे तर गणपतीला सर्व विद्या ज्ञात होत्या. सर्व ज्ञात विद्या म्हणजेच गणपती ! थोडक्यात सांगायचे तर गणपती हा सर्वज्ञ आहे असेही म्हणता येईल.
प्राचीन ग्रंथात चौदा विद्या कोणत्या ते सांगितले आहे. परंतु त्यामध्ये मतैक्य आढळत नाही. काही पंडितांनी १ रुग्वेद , २यजुर्वेद, ३सामवेद, ४ अथर्ववेद, ५ छंद, ६ शिक्षा, ७. व्याकरण, ८ निरुक्त, ९ ज्योतिष,१० कल्प, ११ न्याय, १२ मीमांसा, १३ पुराणे आणि १४ धर्मशास्त्र असे सांगितले आहे.
काही संशोधकांनी १ आत्मज्ञान, २ वेदपठण, ३ धनुर्विद्या ४ लिहीणे ,५ गणित,६ पोहणे, ७ विकणे ८ शस्त्र धरणे, ९ वैद्यक , १० ज्योतिष ११ रमल विद्या १२ सूपशास्त्र, १३ गायन आणि १४ गारूड या चौदा विद्या असल्याचे सांगितले आहे.
काही विद्वानानी १ ब्रह्मज्ञान २ रसायन, ३ श्रुतिकथा, ४ वैद्यक ५ नाट्य ६ ज्योतिष ७ व्याकरण ८ धनुर्विद्या, ९ जलतरण,१० कामशास्त्र, ११ सामुद्रिक शास्त्र , १२ तंत्र शास्त्र , १३ मंत्रशास्त्र आणि १४ परस्त्रहरण अशा प्रकारच्या चौदा विद्या असल्याचे म्हटले आहे.
अलौकिक पुराणोक्त चौदा विद्या पुढील प्रमाणे असल्याचे म्हटले आहे. १ अनुलेप विद्या, २ स्वेच्छारूप- धारिणी विद्या ३ अस्त्र- ग्राम- ह्रदय- विद्या,४ सर्वभूत विद्या ५ पद्मिनी विद्या ६ रथोहन विद्या,७ जालंधरी विद्या,८ पराबाला विद्या ९ पुष्परूपप्रमोदिनी विद्या, १० उल्लापन विधान विद्या, ११ देवदूती विद्या ,१२ युवकरण विद्या, १३ वज्रवाहिनिका विद्या आणि १४ गोपाळ मंत्र विद्या अशा प्रकारच्या चौदा विद्या असल्याचे सांगण्यात आले आहे.
प्राचीन कालच्या या चौदा विद्यांची नावे पाहिली तर आपणास आश्चर्य वाटते आणि ज्या काळात हे सर्व लिहीले गेले त्या काळाची कल्पना येते. सध्याच्या काळातील विद्या सांगायच्या तर त्यांची संख्या खूप मोठी होईल. आणि सध्याच्या कालातील चौदाच विद्या सांगायच्या म्हटल्या तर त्यांची यादी खूप वेगळी होईल. आपण त्यांची यादी करावयास हरकत नाही.
यावरून आपण एक म्हणू शकतो की श्रीगणपती हा पूर्वींच्या व सध्यांच्या सर्व विद्यांचा अधिपती आहे. तो सर्वज्ञ आहे. म्हणून त्याचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवण्यासाठी आपण त्याची उपासना केली पाहिजे. त्याची उपासना म्हणजे ज्ञानाची उपासना होय. अर्थात या कलियुगात केवळ उपासना आपल्यास मदत करणार नाही. त्याच्या उपासने बरोबरच योग्य मार्गाने खूप मेहनत घेऊन आपण एकातरी विद्येत प्रविण्य मिळविले पाहिजे. तरच गजानन आपल्यावर प्रसन्न होईल.
चौसष्ट कला
श्रीगणपती हा चौदा विद्यांप्रमाणेच चौसष्ट कलांचा अधिपती आहे. स्थापत्य, शिल्प, नाट्य,संगीत इत्यादीला कला असे संबोधण्यात आले आहे.संस्कृत पंडितांनी ' कला ' या शब्दाची व्युत्पत्ती वेगवेगळ्याप्रकारे केली आहे. १ ) कल म्हणजे सुंदर , कोमल, मधुर व सुख देणारे आणि त्याला अनुकूल असेल ती कला होय. २ ) कल् म्हणजे शब्द करणे, वाजविणे,या संबंध ती कला ३) मदमस्त करणे, प्रसन्न करणे याला अनुकूल ती कला होय. ४) आनंद देणारी ती कला असेही सांगण्यात आले आहे.
इसवी सन दहाव्या शतकातील ग्रंथकारांनी म्हटले आहे की कलावंत एखाद्या वस्तूच्या ठिकाणी आपल्या आत्मस्वरूपाचा जो अविष्कार करतो त्याला कला म्हणावे. भोजराज यांनी म्हटले आहे की ईश्वराच्या कर्तृत्वशक्तीचा जो अविष्कार आपल्याला पहायला मिळतो तीच कला होय. डॉ. आनंद कुमारस्वामी यांनी म्हटले आहे की कलाकार हा नवीन काही निर्मिती करीत नाही. तर तो अस्तित्वात असलेल्याचाच शोध घेतो. रविंद्रनाथ टागोर यांनी म्हटले आहे की माणूस आपले प्रतिबिंबच कलेच्याद्वारे व्यक्त करीत असतो.कला म्हणजे अभिव्यक्ती ! अभिव्यक्ती ही प्रथम माणसाच्या मनांत असते. व नंतर तिचा बाह्य अविष्कार होतो.
प्राचीन ग्रंथांमध्ये चौसष्ट कलांची नावे देण्यात आली आहेत. त्यावेळच्या कला खूप वेगळ्या होत्या .त्यांची नावे पाहून गंमत वाटते.. त्यांची यादीच मी लोकमतच्या वाचकांसाठी देत आहे. १ गीत, २ वाद्य, ३ नृत्य,४ नाट्य, ५ चित्रे काढणे ६ तिलक लावण्यासाठी यांचे बनविणे,७ तांदूळ व फुले यांच्या साहाय्याने रांगोळी किंवा नक्षी काढणे,८ फुलांची शय्या तयार करणे, ९ दात,वस्त्र व शरीराची विविध अंगे यांना रंगविणे किंवा कलापूर्ण ढंगाने सजविणे, १० रुतुमानानुसार घर शृंगारणे, ११ शयन रचना,१२ जलतरंग वाजविणे, १३ जलक्रीडा करणे, पिचकारी मारणे,१४ वृद्ध माणसाला तरूण करणे म्हणजे अवस्थेतूनच परिवर्तन करणे, १५ माळा गुंफणे, १६ केसात फुले गुंफणे , मुकुट बनविणे,१७ देशकालानुसार कपडे किंवा दागिने अंगावर घालणे, १८ पाने व फुले यांच्या साहाय्याने कर्णफुले तयार करणे,१९ सुगंधी द्रव्ये तयार करणे, २० अलंकार घालणे, २१ इंद्रजाल, २२ कुरुपाला सुरूप बनविणे, २३ हस्तलाघव , २४ सूपकर्म ,२५ पेढे तयार करणे, २६ सूचिकर्म , २७ वेलबुट्टी काढणे किंवा रफू करणे, २८ उखाणे व कोडी घालणे, २९ अंत्याक्षराची योग्यता ठेवणे ,३० कठीण शब्दाचाअर्थ लावणे ३१ पुस्तक वाचन, ३२ नाटिकाख्यादर्शन ३३ काव्यसमस्यापूर्ती ३४ वेत वापरून बाज विणणे ३५ चरख्याचे किंवा तकली यांनी सूत काढणे ३६ लाकडावरील कोरीव काम ३७ वास्तुकला ३८ रौप्य रत्न परिक्षा ३९ कच्ची धातू पंक्तीत करणे ४० रत्नांचे रंग ओळखणे ४१ खाणीचे ज्ञान ४२ उपवन तयार करणे ४३ मेंढ्यांना झुंजवण्याची कला ४४ शुकसारिका प्रलापन ४५ मालिश करणे ४६ केशमार्जनकौशल ४७ करपल्लवी ४८ विदेशी भाषाज्ञान ४९ देशी बोलू जाणणे ५० प्राकृतिक लक्षणांच्या आधारे भविष्य वर्तविणे, ५१ यंत्रनिर्माण , ५२ स्मरणशक्ती वाढविणे, ५३ दुसर्याचे ऐकून जसेच्या तसे बोलणे ५४ शीघ्रकाव्य करणे, ५५ एखाद्या वस्तूच्या क्रियेचा प्रभाव पालटणे ५६ चलाखी करणे ५७ शब्द व छंद यांचे ज्ञान, ५८ शिवण दिसणार नाही अशा कौशल्याचे शिकवणे, ५९ द्यूत ६० आकर्षणक्रीडा ६१ लहान मुलांना खेळवणे ६२ विनय व शिष्टाचार यांचे ज्ञान ६३ दुसर्यावर विजय मिळवणे, ६४ व्यायामकला. अशा कला प्राचीन ग्रंथात सांगण्यात आल्या आहेत.
श्रीगणेशाला चौदा विद्या चौसष्ट कला अवगत होत्या याचा अर्थ तो सर्वज्ञानी होता.त्याचा आदर्श पुढे ठेवून आपण विद्याकलासाधना केली तर आपणही जीवनात यशस्वी होऊ शकतो.
(दा. कृ. सोमण, पंचांगकर्ते व खगोल अभ्यासक आहेत. त्यांचा ई-मेल आयडी dakrusoman@gmail.com )