अरुण साधू... राजकीय कादंब-या लिहिणारा मातब्बर पत्रकार व लेखक महाराष्ट्राने गमावला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 03:52 AM2017-09-26T03:52:39+5:302017-09-26T03:52:43+5:30
अरुण मार्तंड साधू यांच्या निधनाने एक समर्थ लेखणी चालविणारा व अतिशय प्रगल्भ स्वरुपाच्या राजकीय कादंब-या लिहिणारा मातब्बर पत्रकार व लेखक महाराष्ट्राने गमावला आहे.
अरुण मार्तंड साधू यांच्या निधनाने एक समर्थ लेखणी चालविणारा व अतिशय प्रगल्भ स्वरुपाच्या राजकीय कादंब-या लिहिणारा मातब्बर पत्रकार व लेखक महाराष्ट्राने गमावला आहे. अमरावती जिल्ह्याच्या परतवाडा येथून (जन्म १७ जून १९४१) आलेल्या साधूंनी प्रथम अमरावतीला व पुढे पुण्यात शिक्षण घेऊन विज्ञान शाखेची पदवी प्राप्त केली. त्याच काळात त्यांनी केसरीत वार्ताहर म्हणून पत्रकारितेच्या कामालाही सुरुवात केली. नंतरच्या काळात माणूस, इंडियन एक्स्प्रेस, टाइम्स आॅफ इंडिया, स्टेट््समन आणि टाइम्स या वृत्तपत्रात व नियतकालिकात विविध पदांवर राहून त्यांनी आपल्या लिखाणाचा व अभ्यासूपणाचा ठसा साºयांवर उमटविला. याच काळात त्यांनी त्यांच्या वैचारिक लेखनालाही सुरुवात केली. लेखक म्हणून मान्यता पावलेल्या साधूंची नागपूरला झालेल्या अ.भा. मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली. मात्र या व्यासपीठावर राजकारणातील माणसांनी येऊ नये, हा आपला आग्रह कायम राखत त्यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणानंतर त्या संमेलनासह नागपूरचाही निरोप घेतला. दुर्गा भागवतांनी याविषयाचा आग्रह प्रथम धरला तेव्हा त्यांना साथ द्यायला अनेक लेखक पुढे आले. मात्र त्यांच्या भूमिकेचा वसा प्रत्यक्षात धारण करणारे अरुण साधू हे एकमेव लेखक होते हेही येथे उल्लेखनीय. त्यावेळी संमेलनाला आलेल्या अनेकांनी त्यांच्यावर टीकाही केली मात्र तिची फारशी पर्वा न करता साधू आपल्या भूमिकेशी एकनिष्ठ राहिले. पत्रकारिता आणि साहित्य या दोन्ही क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटविणाºया अरुण साधूंच्या कादंबºयांवर गाजलेले मराठी राजकीय चित्रपट त्याकाळात निर्माण झाले. एवढी सारी वर्तमानपत्रे व साहित्यलेखन नावावर असलेले साधू हे स्वत:च्या जीवनात कमालीचे विनम्र व स्वच्छ राहिले. अतिशय तुटपुंजी कामगिरी करून अकारण मान उंचावून मिरवणाºया अनेक आधुनिक लेखक, कवी व पत्रकारांनी त्यांच्याकडून अतिशय नम्रपणे घ्यावा असा हा गुण आहे. पत्रकार असेल आणि तोही नामवंत इंग्रजी वृत्तपत्रात काम करणारा असेल तर त्याचे सत्ताधाºयांशी निकटचे संबंध येणारच. शिवाय मुंबईसारख्या शहरात वास्तव्य करणाºया व स्वत:च्या नावाने मोठ्या झालेल्या अशा पत्रकाराचे त्या मायानगरीतील धनवंतांशीही संबंध येणार. अरुण साधू या साºयात राहूनही त्यांच्या नावाप्रमाणे साधू राहिले. त्यांच्या अंगावर कधी श्रीमंती दिसली नाही आणि त्यांच्या वागण्यात कुणाला तोराही दिसला नाही. आपल्या चुका प्रांजळपणे कबूल करण्याची त्यांची वृत्ती त्यांना फार मोठ्या चाहत्यांचा वर्ग मिळवून देणारी होती. फिडेल कॅस्ट्रो आणि चे गव्हेरा या दोन क्रांतिकारकांविषयी एकेकाळी पुण्यामुंबईच्या अनेक बड्या पत्रकारांना कमालीचे आकर्षण होते. त्यांच्यावर लिहिण्याची अहमहमिकाही त्यांच्यात होती. साधूंनीही त्यांच्यावर लिहिले. मात्र पुढे फिडेल कॅस्ट्रोने स्वत:विषयी सांगताना ‘आपण आयुष्यात ३५ हजार स्त्रियांचा भोग घेतला’ हे मान्य केले. त्यावर लोकमतने याच स्तंभात अग्रलेख लिहिला. तो वाचून व्यथित झालेल्या साधूंनी, जेव्हा मी कॅस्ट्रोवर लिहिले तेव्हा त्याच्या या ‘गुण’ वैशिष्ट्याची आपल्याला माहिती नव्हती, हे त्यांनी प्रांजळपणे मान्य केले. मराठी वाङ्मयात राजकीय कादंबरी अजूनही परिपूर्ण अवस्थेत आली नाही, अशी टीका समीक्षकांकडून आजही होते. अरुण साधू यांच्या व्यक्तिमत्त्वात आणि प्रतिभेत या टीकेला उत्तर देण्याचे पुरेपूर सामर्थ्य होते. मात्र त्यांच्या आजाराने त्यांना हे आव्हान पेलू दिले नाही. अरुण साधूंची ही प्रेरणा नव्या लेखकांना अशा लिखाणासाठी प्रवृत्त करील ही अपेक्षा.